मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ६ ते १०

पंचीकरण - अभंग ६ ते १०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥६॥
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चय ।
जया नाहीं लय तोची देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर ।
व्यापूनि अंतर देव राहे ॥२॥
देव राहे सदा सबाह्य अंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीवासी नेणवे ।
म्हणोनियां धांवे नानामतीं ॥४॥
नानामतीं देव पहातां दिसेना ।
जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे ।
अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता ।
हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥७॥
॥७॥
रात्रंदिवस मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें ॥१॥
कांचनाचें ध्यान परस्रीचिंतन ।
जन्माचें कारण हींच दोन्हीं ॥२॥
दोन्हीं नको धरूं निंदा नको करूं ।
तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां ।
सत्येंचि अनंताचेची नामें ॥४॥
नामरूपातींत जाणा तो अनंत ।
दास म्हणे संतसंग धरा ॥५॥
॥८॥
ब्रह्मा विष्णु रुंद्रे जयाचे अवतार ।
तोचि देव थोर जाण बापा ॥१॥
जाण बापा देव देहासी निर्मिता ।
तो देव तत्त्वतां ठाईं पाडीं ॥२॥
ठाईं पाडीं देव साधूचे संगतीं ।
दास म्हणे गति पावशील ॥३॥
॥९॥
चंदनासंगतीं चंदनचि होती ।
होय काळी माती कस्तूरिका ॥१॥
कस्तूरिका होय कस्तुरीच्या योगें ।
साधुच्यानीं संगें साधुजन ॥२॥
साधुजन होती संगाति धरितां ।
मिळवणीं मिळतां गंगाजळीं ॥३॥
जेवितां अमृत अमर होइजे ।
अचळ पाविजे साधुसंगें ॥४॥
साधुसंगे देव आपणचि होय ।
लक्षण अद्वय बाणलिया ॥५॥
बाणलिया तया नि:संगाचा संग ।
होइजे नि:संग आपणचि ॥६॥
आपणचि ध्यानीं बैसला आसनीं ।
जनीं आणि वनीं देव भासे ॥७॥
देव भासे तेणें आपण भुलला ।
तेणें गुणें झाला देव अंभें ॥८॥
देवाचे संगतीं देवचि होइजे ।
चतुर्भुंजराजे वैकुंठींचे ॥९॥
वैकुंठींचे राजे ध्याती अहर्निशीं ।
वंदिती साधूती दास म्हणे ॥१०॥
॥१०॥
दुर्जनसंगति कदा धरूं नये ।
घडती अपाय बहुविध ॥१॥
बहुविध झाले अपाय बहुतां ।
तेचि सांगे आतां सावकाश ॥२॥
कुसंग हे माया धरितां संगति ।
गेले अधोगती नेणों किती ॥३॥
चांडाळासंगतीं होइजे चांडाळ ।
होय पुण्यशीळ साधुसंगें ॥४॥
कुरुंदासंगतीं झिजला चंदन ।
कुसंगे जीवन नासतसे ॥५॥
खाराचेसंगतीं नासे मुक्ताफळ ।
होतसे तात्काळ कळाहीन ॥६॥
लाखेच्या संगतीं सोनें होय उणें ।
दुग्ध हें लवणें नासतसे ॥७॥
दुर्जनासंगतीं सज्जन ढांसळे ।
क्तोध हा प्रबळे अकस्मात ॥८॥
दास म्हणे संगत्याग दुर्जनाचा ।
धरा सज्जनाचा आदरेंसी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP