पंचीकरण - अभंग १३६ ते १४०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१३६॥
श्रवण करावें जें तें ब्रह्मज्ञान ।
ज्ञानेंविण शीण कामा नये ॥१॥
कामा नये येथें सारासार नाहीं ।
कथेच्या प्रवाहीं कोण साध्य ॥२॥
साध्य तेंचि घ्यावें येर तें सोडावें ।
विचाराचे नांवें जेथें शून्य ॥३॥
जेथें शून्य ज्ञान सर्व अनुमान ।
अनुमानें धन्य होईजेल ॥४॥
होइजेना धन्य निरंजनंविण ।
रामदास खूण सांगतसे ॥५॥
॥१३७॥
राम कैसा आहे हें आधीं पाहावें ।
मग सुखें नांवें दास्य करूं ॥१॥
दास्य करूं जन देव ओळखेन ।
देवासि चुकोन दास्प कैसें ॥२॥
दास्य कैसें घडे देवासी नेणतां ।
वाउगें श्रमतां शीण उरे ॥३॥
शीण उरे साध्य तें कांहीं साधेना ।
अंतरीं वसेना समाधान ॥४॥
समाधान देव पाहतां घडेल ।
येर विघडेल रामदास ॥५॥
॥१३८॥
शोधूनि पाहावें देवऋषिमूळ ।
निर्माण सकळ कोठूनियां ॥१॥
कोठूनियां झाली सर्वहि उपाधि ।
वरी घ्यावी शुद्धि शाश्वताची ॥२॥
शाश्वताची शुद्धि घेतां दृढबुद्धि ।
होवोनि समाधी हाता चढे ॥३॥
हाता चढे सर्व वेदशास्राबीज ।
मुख्य गुह्य गूज योगियांचें ॥४॥
योगियांचें गूज सहजीम सहज ।
दास म्हणे निज ठायीं पडे ॥५॥
॥१३९॥
देव तो कळेना राहिला चुकोनी ।
संसारा येऊनि काय केलें ॥१॥
काय केलें बापा आपुलें अनहित ।
देखत देखत चुकलासी ॥२॥
चुकलासी धनी या भूमंडळींचा ।
सर्वहि देवांचा मुख्य देव ॥३॥
मुख्य देव आहे तो तुज कळेना ।
शाहाणा आपणा म्हणविशी ॥४॥
म्हणविशी परी दसर्याचे सोनें ।
उणे कोटिगुणें दास म्हणे ॥५॥
॥१४०॥
शाहणें दिसताम ब्रह्मज्ञानेंविण ।
संसाराचा शीण करोनियां ॥१॥
करोनियां संसार रांत्रदिवस धंदा ।
कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥
चुकलेति वायां तुम्हीं कां बंधे हो ।
अंतरीं संदेहो जन्मवरी ॥३॥
जन्मवरी ओझें वाहिल वाउगें ।
व्यर्थ कामरंगें रंगोनिया ॥४॥
रंगोनिया कामीं अंतरावें रामीं ।
दास म्हणे ऊर्मि कामा नये ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP