पंचीकरण - अभंग ७१ ते ७५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥७१॥
जोडलसि बापा धरिलासी भावें ।
आतां तूज जीवें विसंबेना ॥१॥
विसंबेना देवा नित्य निरंतर ।
मेलिया विसर पडो नेदी ॥२॥
पडों नेदी वाचा रामनामा-विण ।
देव हा सगुण रामदासीं ॥३॥
॥७२॥
ओवीचेनि मिसे देव आठवावा ।
हदयीं धरावा सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ मनीं स्वरूपाचा छंद ।
तेणें भवकंद तुटतील ॥२॥
तुटेल ती व्याधि या जन्मकर्माची ।
जरी राघ वाची भक्ति घडे ॥३॥
भक्ति घडे भावें सगुणा देवाची ।
संगति देवाची जंव आहे ॥४॥
आहे देव तंव सगुणीं भजावें ।
स्वस्वरूपीं व्हावें आपणचि ॥५॥
आपणचि देव आपणचि भक्त ।
संतसंगें मुक्त आपणची ॥६॥
आपणचि सर्व आपणचि वाव ।
मीपणाचा ठाव आप-णचि ॥७॥
आपण तूंपण जयाचे अंतरीं ।
तंव भक्ति करी सगुणाची ॥८॥
सगुणाची भक्ति लोभाची विरक्ति ।
निर्गुणाची भक्ति सायुज्यता ॥९॥
सायुज्यता मुक्ति फिटला संदेहो ।
बंधनचि वावो रामदासीं ॥१०॥
॥७३॥
ओविचेनि मिसें स्वरूपासि जावें ।
सत्वर पावावें समाधान ॥१॥
समाधान नाहीं स्वरूपावांचोनी ।
म्हणोनियां मनीं तेंचि असो ॥२॥
तेंचि असो रूप निर्गुण रामाचें ।
सुख विश्रामाचें समाधानीं ॥३॥
समाधानी योगी तो हें सुख भोगी ।
मनीं वीतिरागी याचि सुखें ॥४॥
याचि सुखें नर जो नाहीं निवाला ।
तोचि आहाळला दु:खशोकें ॥५॥
दु:ख शोक नाहीं राम आठवीतां ।
अमृत सेवितां मृत्यु नाहीं ॥६॥
नाहीं जन्ममृत्यु अभेद भक्तासी ।
रामीं रामदासीं अनुभव ॥७॥
॥७४॥
सगुण हा देव धरावा निश्चित ।
तरी नाशवंत विश्व बोले ॥१॥
विश्व बोले एका भजावें निर्गुणा ।
परी लक्षवेना काय कीजे ॥२॥
काय कीजे आतां निर्गुण दिसेना ।
सगुण असेना सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
कोणे वेळे आतां मोक्ष लाभे ॥४॥
मोक्ष लाभे एका सद्रुरूपासून ।
आत्मनिवेदन रामदासीं ॥५॥
॥७५॥
जें पंचभूतिक तें सर्व मायिक ।
बोलती विवेक संतजन ॥१॥
संतजनीं सर्व मायिक बोलावें ।
तरी कां फिरावें तीर्थाटणा ॥२॥
तीर्थाटणें देव मायिकाचे पोटीं ।
तरी आटाआटी कां करावी ॥३॥
कां करावी पूजा सांडूनि परमात्मा ।
मूर्खस्य प्रतिमा हें वचन ॥४॥
हें वचन मिथ्या कैसें हो करावें ।
काय हो धरावें आतां आम्हीं ॥५॥
आतां आम्हीं वाक्य मिथ्या म्हणों नये ।
देवधर्म काये मोकलावा ॥६॥
मोकलावा देव ऐसें म्हणों नये ।
तरी वाक्य काये मिथ्या आहे ॥७॥
मिथ्या नव्हे वाक्य मिथ्या नव्हे देव ।
पडिला संदेह काय कीजे ॥८॥
कीजे दृढ भाव सगुण देवासी ।
जंव कल्पनेसी उरी आहे ॥९॥
कल्पनेचें रूप विवेके विरालें ।
मग सर्व झालें गंगाजळ ॥१०॥
गंगाजळ झालें निर्विकल्प केलें ।
सगुण राहिलें सहजचि ॥११॥
सहजचि कीजे उपाधि न कीजे ।
एकांतीं बोलिजे गुरुगम्य ॥१२॥
गुरुगम्य आहे कल्पनेवेगळें ।
कल्पनेच्या मुळें वाद उठे ॥१३॥
वाद उठे जनीं ऐसें न करावें ।
त्रिकाळ भजावें वेदवाक्य ॥१४॥
वेदवाक्य बोले कर्म उपासना ।
अंतीं शुद्ध ज्ञाना बोलियेला ॥१५॥
बोलियेला पूर्वक्ष तो सिद्धांत ।
केला निश्चयार्थ संतजनीं ॥१६॥
संतजनीं दृढ विश्र्वास धरावा ।
मग विसरावा संदेह तो ॥१७॥
संदेह धरिते कल्पना आपुली ।
निर्विकल्प केली साधुजनीं ॥१८॥
साधुजनीं केला निश्चयो धरावा ।
तेथें अहंभावा उरी नाहीं ॥१९॥
उरी नाहीं संतसंगें संदेहासी ।
रामीं रामदासीं नि:संदेह ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP