पंचीकरण - अभंग ४६ ते ५०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥४६॥
पांचहि प्रळय सांगईनं आतां ।
जाणिजे तत्त्वतां दोनी पिंडीं ॥१॥
दोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडप्रळय ।
पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥
विवेंकाचा पंथ विवेकें जाणावा ।
योगियांचा ठेवा निरूपण ॥३॥
निरूपणीं निद्राप्रळय बोलिला ।
दुजा मृत्यु झाला प्राणियासि ॥४॥
प्राणियासि पिंडीं हे दोनी प्रळयो ।
ब्रह्मनिद्राक्षयो ब्रह्मयाचा ॥५॥
ब्रह्मयाचा क्षयो तो ब्रह्मप्रळयो ।
व्यतिरेकान्वयो विवेकाचा ॥६॥
विवेकाचा अर्थ माईक सर्वही ।
स्वस्वरूपीम नाहीं चराचर ॥७॥
चराचर मूर्ति मायिक x प्रसिद्ध ।
हा विवेक सिद्ध सज्जनाचा ॥८॥
सज्जनाचा भाव सर्व दृश्य वाव ।
दृश्यातीत देव जैसा ॥९॥
जैसा देव आहे तैसा ओळखावा ।
प्रळ्य पांचवा दास म्हणे ॥१०॥
॥४७॥
कण सांडोनियां घेऊं नये भूस ।
गभविण फणस घेऊं नये ॥१॥
घेऊं नये नारिकेळाची नरोटी ।
सालपटें खोटीं डाळिंबाचीं ॥२॥
डाळिंबाचि त्वचा चवड उसाचा ।
स्तंभ कर्दलीचा कामा नये ॥३॥
खातां नये नाना फळाची आटोळी ।
असो हे वाचाळी वाउगीच ॥४॥
वाउगें सांडोनि सार तेंचि घ्यावें ।
येर तें सांडावें मिथ्याभूत ॥५॥
मिथ्याभूत जें जें तत्त्व दृष्टि पडे ।
म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥
त्याग त्याचा कीजे तें मनीं कल्पावें ।
मग अनुभवें जाणिजेल ॥७॥
जाणिजेल सार त्यागितां असार ।
बोलावा विस्तार काय यासी ॥८॥
काय यासी आतां धरावा संदेहो ।
कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥
नाशिवंत आहे नांव आणि रूप ।
पाहे आपेंआप दास म्हणे ॥१०॥
॥४८॥
खोटें निवडितां खरें नाणें ठरे ।
तैसेंचि विस्तारे तत्त्वज्ञान ॥१॥
तत्त्वज्ञान खोटें जाणोनि सांडावें ।
मग ओळखावें परब्रह्म ॥२॥
परब्रह्म बरवें संतसंगें कळे ।
विवेकें निवळे मार्ग कांहीं ॥३॥
मार्ग कांहीं कळे परीक्षा जाणतां ।
दिशाभूली होतां वाट चुक ॥४॥
वाट चुके मीन ऐसें न करावें ।
सार्थक करावें दास म्हणे ॥५॥
॥४९॥
जें जें कांहीं दिसे तें तें सर्व नासे ।
अविनाश असे आत्मरूप ॥१॥
आत्मरूपीं दृषि घालितां निवळे ।
आपेआप कळे मिथ्या माया ॥२॥
मिथ्या माया वाटे साचाचसारखी ।
स्वरूपा ओळखी जंव नाहीं ॥३॥
जंव नाहीं झाली संदेहनिवृत्ति ।
तंव हे प्रचीति जाणवेना ॥४॥
जाणवेना मनीं निश्चयावांचूनी ।
निश्चयो श्रवणीं दास म्हणे ॥५॥
॥५०॥
देहबुद्धि बहु काळाची जुनाट ।
नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥
सार्थकाची वाट भ्रांतीनें लोपली ।
जवळी चुकली असोनियां ॥२॥
असोनियां देव जवळी चुकला ।
प्राणी भांबावला मायाजाळें ॥३॥
मायाजाळ दृश्य तुटे एकसरें ।
जरी मनीं धरे स्वस्वरूप ॥४॥
स्वरूपनिश्चये समाधान होय ।
रामदासीं सोय स्वरूपाची ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP