पंचीकरण - अभंग ८१ ते ८५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥८१॥
दर्पणी पाहातां दिसे सर्व अंग ।
परी पृष्ठीभाग आढळेना ॥१॥
आपुलाच पाठी आपणा न दिसे ।
ऐसें बोलतसे सर्व जन ॥२
आपशुद्धि नेणे त्या काय करावें ।
म्हणोनि जाणावें आपणासी ॥३॥
आपणासी जाणें संतांचे संगतीं ।
जया अधोगति जन्म नाहीं ॥४॥
जन्म नाहीं मृत्यु नाहीं येणें जाणें ।
स्वरूपीं राहणें दास म्हणे ॥५॥
॥८२॥
भयानक स्वप्र जया वाटे भयें ।
तेणें निजो नये सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ जागा विवेकसंगतीं ।
तयासी कल्पांतीं भय नाहीं ॥२॥
भय उठे देहीं तूं तंव विदेहीं ।
देहातीत पाही आपणासी ॥३॥
आपणा नेणतां वाटे नाना चिंता ।
म्हणोनि दुश्चिता राहु नये ॥४॥
राहूं नये कदा या देहसंबंधीं ।
मनी धरी शुद्धि स्वरूपाची ॥५॥
स्वरूपाची शुद्धि जया ठांई पडे ।
तया नरा घडे समाधान ॥६॥
समाधान घड देवा आठवितां ।
राम-दासीं चिंता दूर ठेली ॥७॥
॥८३॥
जंव आहे तुज हा देहसंबंध ।
तंद नव्हे बोध राघवाचा ॥१॥
राघवाचा बोध या देहावेगळा ।
देह कळवळा तेथें नाहीं ॥२॥
नाहीं सुख दु:ख नाहीं येणें जाणें ।
चिरंजीव होणें रामरूपीं ॥३॥
रामरूपीं होय जन्म मृत्यु वाव ।
विश्रांतीचा ठाव राम एक ॥४॥
राम एकरूपीं सर्वरूपीं आहे ।
अनुभवीं पाहे आपुलिया ॥५॥
आपुल्या अंतरीं बाह्य निरंतरीं ।
सर्वसृष्टिभरी नांदतसे ॥६॥
नांदतसे सदा जवळी कळेना ।
कदा आकळेना साधुविण ॥७॥
साधुविण राम धांडोळितां श्रम ।
नव्हेचि विश्राम साधुविणें ॥८॥
साधुविणें राम कदा आकळेना ।
संदेह तुटेना कांहीं केल्या ॥९॥
कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण ।
रामदासी खूण सांगतसे ॥१०॥
॥८४॥
लागतसे मुळीं हा देहसंबंधु ।
करितसे खेदु अहंभावें ॥१॥
अहंभावें कदा नये पुरवला ।
भवभ्रम झाला दु:खराशी ॥२॥
दु:खराशी झाल्या देहाचे संबंधें ।
सर्व ज्ञानबोधें तुटतील ॥३॥
तुटती संबंध संतांचे राहाणीं ।
होईल झाडणी पंचभूतां ॥४॥
पंचभूतां लयो स्वरूपअन्वयो ।
तुटला संशयो संबंधाचा ॥५॥
॥८५॥
पाहातां दिसेना तेंचि बरें पाहें ।
तेथें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप जाणावें अरूप ।
शुद्ध तत्स्वरूप निराकार ॥२॥
निराकार राम देखतां विश्राम ।
दुरीं ठाके श्रम संसारींचा ॥३॥
संसारींचा श्रम राघवीं असेना ।
परि तो दिसेना राम डोळां ॥४॥
राम डोळां आहे अनुभवें पाहें ।
मीपण न साहे रामरूपीं ॥५॥
रामरूपीं नाम रूप दोनी नाहीं ।
तेथें मना राहीं सर्वकाळ ॥६॥
सर्वकाळ रामदर्शन होतसे ।
निर्गुणीं विश्वासे मन माझें ॥७॥
मन माझें रामस्वरूपीं संचरे ।
तेणें देहीं भरे विदेहता ॥८॥
विदेहता देहीं अलक्ष लक्षावें ।
नि:शब्दा बोलावें संतसंगें ॥९॥
संतसंगें घडे नि:संगाचा संग ।
राघवीं संयोग रामदासीं ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP