मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १९६ ते २००

पंचीकरण - अभंग १९६ ते २००

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१९६॥
राघवाचें नाम राखशील जरी ।
तुज राखे तरी रामराणा ॥१॥
रामराणा माझे जिवींचें जीवन ।
आवडीनें खूण सांगतसें ॥२॥
सांगतसें खूण माझे अंतरींची ।
सर्वहि सुखाची सुखमूर्ति ॥३॥
सुखमूर्ति राम सांडूं नको कदा ।
तुज तो आपदा लागों नेदी ॥४॥
लागों नेदी कष्ट आपुल्या दासासी ।
रामीं रामदासीं साहाकारी ॥५॥
॥१९७॥
रानीं मनीं वनी राम असो द्यावा ।
करील कुडावा सेवकाचा ॥१॥
सेव-काचा भार घेतसे साचार ।
म्हणोनि अंतर पडों नेदीं ॥२॥
पडों नेदी शब्द माझा भूमी-वरी ।
दृढ चित्तीं धरीं देवराणा ॥३॥
देवराणा सर्व देवां सोडविता ।
लागलीसे चिंता त्यास तुझी ॥४॥
तुझी चिंता करी राजा अयोध्येचा ।
कृपाळु दीनाचा दास म्हणे ॥५॥
॥१९८॥
कोणाचें हें घर कोणाचा संसार ।
सांडुनी शरीर जाणें लागे ॥१॥
जाणें लागे अंतीं एकलें एकटें ।
व्यर्थ खटपटें जन्मवरी ॥२॥
जन्मवरी देह संसारीं गोविलें ।
नाहीं कांहीं केलें आत्माहित ॥३॥
आत्महित केलें संसाराचे वोढीं ।
अंतीं कोण सोडी रामाविण ॥४॥
रामाविण कोणी सोडविना अंतीं ।
वायांचि रडती जीवलगें ॥५॥
जीवलग राम दूरी दुरावला ।
विचार आपुला जाणवेना ॥६॥
जाणवेना पूर्व सुकृतावांचुनी ।
पापियाचे मनीं राम कैंचा ॥७॥
राम कैंचा जया लैकिकाची चाड ।
पुरविती कोड संसाराचें ॥८॥
संसाराचें कोड तेंचि वाटे गोड ।
जया नाहीं चाड अनुतापीं ॥९॥
अनुतापीं जाले संसारीं सुटले ।
राजे राज्य गेले सांडोनियां ॥१०॥
सांडोनियां गेले वैभव संपत्ति ।
पुढें यातायातीचेनि भेणें ॥११॥
भेणे ते शरण निघाले देवासी ।
नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥
भक्तराज भावें भेटले देवासी ।
रामीं रामदासीं धन्य वेळ ॥१३॥
॥१९९॥
आपुलीं पारखीं सर्व पारखिलीं ।
नाहीं कामा आलीं रामविणें ॥१॥
रामविणें जाण सर्वहि पिसुण ।
मायेचें कारण नाथिलेची ॥२॥
नाथिलेंचि आहे जनाचें साजणें ।
तृणाचें तापणें तयापरी ॥३॥
तयापरि ऐसा निश्चय जाणावा ।
सतीचा बोलावा लोक आहे ॥४॥
लोक बहु रंग जाणुनि वोरंग ।
रामदास संग सांडियेला ॥५॥
॥२००॥
सुखाचे सांगाती सर्वही मिळती ।
दु:ख होतां जाती निघोनियां ॥१॥
निघोनियां जाती संकटाचे वेळे ।
सुख होतां मिळे समुदाय ॥२॥
समुदाय सर्व देहाचे संबंधीं ।
तुटली अपाधि रामदासीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP