मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग २११ ते २१६

पंचीकरण - अभंग २११ ते २१६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥२११॥
रात्रंदिवस मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें ॥१॥
कांचनाचें ध्यान परस्रीचिंतन ।
जन्मासी कारण हेचि दोनी ॥२॥
दोनी नको धरूं नको निंदा करूं ।
तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां ।
सत्य या अनंताचेचि नामें ॥४॥
नामरूपातीत जाणावा अनंत ।
दास म्हणे संतरांग धरा ॥५॥
॥२१२॥
ब्रह्मा विष्णु रुद्र जयाचे अवतार ।
तोचि देव थोर जाण बापा ॥१॥
जाण बापा देव देवासी निर्मिता ।
देव तो तत्त्वतां ठाइ पाडी ॥२॥
ठांई पाडी देव संताचे संगतीं ।
दास म्हणे गति पावशील ॥३॥
॥२१३॥
मर्यादा सागरा आणि दिनकरा ।
अंतरिक्ष तारा जयाचेनी ॥१॥
जयाचेनी मेघ पडे भूमंडळीं ।
पिके यथाकाळीं वसुंधरा ॥२॥।
वसुंधरा बहु रंग विस्तारिली ।
जीवसृष्टि झाली जयाचेनी ॥३॥
जयाचेनी सर्व सृष्टि चालताहे ।
तयालागीं पाहे शोधूनियां ॥४॥
शोधूनियां पाहे देव सर्व कर्ता ।
तरिजे आवर्ता जयाचेनी ॥५॥
जयाचेनी भक्ति जयाचेनी मुक्ति ।
जयाचेनी युक्ति वाढतसे ॥६॥
संतसंग जया मानवा आवडे ।
तेणें गुणें घडे समाधान ॥७॥
समाधान घडे सज्जनाचे संगें ।
स्वरूपाच्या योंगें रामदासीं ॥८॥
॥२१४॥
ज्याच्या निरूपणें संदेह फिटती ।
त्या गति संगति सज्जनाची ॥१॥
दुर्जनाची कळा सज्जनाचे परी ।
मयिंदाची सरी ब्राह्मणासी ॥२॥
ब्राह्मणासी नाहीं सर्वदा मत्सर ।
शुद्ध निरंतर दास म्हणे ॥३॥
॥२१५॥
जया जैशी गति तया तैसी संगति ।
समागमें रिती सर्व कांहीं ॥१॥
सर्व कांहीं घडे सगतीच्या गुणें ।
साधूंचीं लक्षणें साधुसंगें ॥२॥
साधुसंगें साधु होईजे आपण ।
रामदास खूण सांगतसे ॥३॥
॥२१६॥
दुर्लक्ष हा जन्म विषय नरदेह ।
याहीवरी सोय राघवाची ॥१॥
राघवाची सोय सद्भावें भजन ।
आणि संतजन समागमीं ॥२॥
समागमीं संत श्रवणीं निवांत ।
अनंताचा अंत ठांई पडे ॥३॥
ठांई पडे देव संतसमागमें ।
आपल्या स्वधर्मे पुण्यशीळ ॥४॥
पुण्यशीळ देह ज्ञानी नि:संदेहें ।
सर्वकाळ राहे स्वस्वरूपीं ॥५॥
स्वस्वरूपीं मन गेलिया जन्मन ।
मन मिथ्या भान आढळेना ॥६॥
आढळेना कदा मिथ्या मायाजाळ ।
तोचि तो केवळ समाधानी ॥७॥
समाधानी साधु जेथें ज्ञानबोधू ।
रामदासीं वेधू निर्गुणाचा ॥८॥

पंचीकरण ओवी संख्या ॥१४३८॥


N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP