पंचीकरण - अभंग ९१ ते ९५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥९१॥
तत्त्वमसि जाण अहंब्रह्म ऐसें ।
जाण हें विश्वासें महावाक्यें ॥१॥
अहं आत्मा ब्रह्म आणि ब्रह्मज्ञान ।
दास म्हणे वर्म वेदवाक्यें ॥२॥
वेदवाक्यें रामीं रामदास पाहे ।
मुख्य पद लाहे निवेदनें ॥३॥
॥९२॥
तूंचि ब्रह्म ऐसें वेदाचें वचन ।
तेचि संतजन दृढ करी ॥१॥
दृढ करी साधु तूंचि ब्रह्म ऐसें ।
तरि कां विश्वासेम धरिजेना ॥२॥
धरिजेना मनीं साधूचें वचन ।
विदेही अमान्य कां करावा ॥३॥
कां करावा निश्चय स्वयें स्वरूपाचा ।
तिहीं प्रतीतीचा ऐक्यभाव ॥४॥
ऐक्यभावें जरि संतांचे वचनीं ।
तरी समाधानीं पाविजेल ॥५॥
पाविजेल निजस्वरूप आपुलें ।
जरी विश्वासलें मन तेथें ॥६॥
मनाचा विश्राम तोचि आत्माराम ।
रामदासीं वर्म संतसंगें ॥७॥
॥९३॥
गीताभागवतीं उपदेश केला ।
अर्जुना दाविला देव कृष्णें ॥१॥
कृष्णें दाखविला देव तो वेगळा ।
बोलिजे आगळा सर्वांहूनी ॥२॥
सर्वाहून सार देव तो साचार ।
दास म्हणे पार कल्पनेचा ॥३॥
॥९४॥
कल्पनेचा देव कल्पनेची पूजा ।
तेथें कोणी दुजा आढळेना ॥१॥
आढळेना देव आढळेना भक्त ।
कल्पनेरहित काय आहे ॥२॥
आहे तैसें आहे कल्पना न साहे ।
दास म्हणे पाहे अनुभवें ॥३॥
॥९५॥
अनुभवें वाचें बोलिला न जाय ।
भाव नेंणें काय भावूं आतां ॥१॥
भावूं आतां देव कैसा निरावेव ।
म्हणोनियां भाव सगुणासी ॥२॥
सगुणासी भाव लवितां स्वभाव ।
पालटे अभाव दास म्हणे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP