मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १३१ ते १३५

पंचीकरण - अभंग १३१ ते १३५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१३१॥
तुम्हीं सर्व देवीं मिळोनि पावावें ।
मज वेगीं न्यावें परब्रह्मीं ॥१॥
परब्रह्मीं न्यावें संत अनुभवें ।
मज या वैभवें चाड नाहीं ॥२॥
चाड नाहीं एका निर्गुणावांचुनी ।
माझे ध्यानीं मनी निरंजन ॥३॥
निरंजन माझा मज भेटवावा ।
तेणें होय जीवा समाधान ॥४॥
समाधान माझें करा गा सर्वहो ।
तुम्हांसि देह हो विसरेना ॥५॥
विसरेना देहो चालतो तंववरी ।
बाह्य अभ्यंतरीं दास म्हणे ॥६॥
॥१३२॥
तूं काय झालासी अगा निरंजना ।
आम्हां भक्तजनां सांभाळावें ॥१॥
सांभा-ळावें सदा सबाह्याभ्यंतरीं ।
आम्हां क्षणभरी सोडूं नको ॥२॥
सोडूं नको वायां गुप्त कां झालासी ।
देवा देखलासी संतसंगें ॥३॥
संतसंगें गुप्त होऊनि पाहिला ।
संतत्याग झाला दर्शनेंची ॥४॥
दर्शन जाहलें तेंचि तें जाणलें ।
नसोनि असलें कल्पकोडी ॥५॥
कल्पकोडी जोडी झाली निर्गुणाची ।
दास म्हणे कैंची देहबुद्धी ॥६॥
॥१३३॥
देवेंविण आतां मज कंठवेना ।
कृपाळु तो नाना ठाईं वसे ॥१॥
नाना ठांई देव आहे जेथें तेथें ।
तयाविण रितें स्थळ नाहीं ॥२॥
स्थळ नाहीं रितें ब्रह्म तें पुरतें ।
जेथें जावें तेथें मागें पुढें ॥३॥
मागें पुढें ब्रह्म सर्वत्र व्यापक ।
दास तो नि:शंक तेणें गुणें ॥४॥
॥१३४॥
देव निर्विकार त्या नाहीं आकार ।
तरी हा विस्तार कोणें केला ॥१॥
कोणें केला ऐसा शोधूनि पाहावें ।
पाहोनि राहावें समाधान ॥२॥
समाधान घडे विचारपाहतां ।
बुजोनि राहतां सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ पूर्वपक्ष हो सिद्धांत ।
वेदांत धादांत संप्रचीत ॥४॥
सप्रचीती तरी विकारीं विकार ।
देव निर्विकार जैसा तैसा ॥५॥
जैसा तैसा आहे विवेक पहावा ।
पडों नये गोंवा दास म्हणे ॥६॥
॥१३५॥
नमूं वेदमाता जे कां सर्व सत्ता ।
ब्रह्मज्ञान आतां बोलूं कांहीं ॥१॥
बोलूं कांहीं ब्रह्म जेणें तुटे भ्रम ।
आणि सुखें वर्म ठायीं पडे ॥२॥
ठायीं पडे देव आणि भावा-भाव ।
प्रकृति स्वभाव सर्व कांहीं ॥३॥
सर्व कांहीं कळे संदेह मावळे ।
अंतर निवळे साधकाचें ॥४॥
साधकाचें हित होय निरूपणें ।
श्रवण मननें दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP