पंचीकरण - अभंग ६१ ते ६५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥६१॥
प्रथम नमन संत साधूजना ।
संवादाचे ज्ञाना बोलावया ॥१॥
बोलावया सार वस्तूचा विचार ।
जेणें निरंतर सुख वाटे ॥२॥
सुख वाटे मनीं संवाद सज्जनीं ।
तेणें ध्यानीं मनीं स्वस्वरूप ॥३॥
स्वस्वरूप मना कदा आकळेना ।
सुलभ सज्जनाचेनि संगें ॥४॥
संगें साधूचिया समाधान झालें ।
स्वस्वरूप लाधलें रामदासीं ॥५॥
॥६२॥
सरस्वति विद्या लक्षुमी अविद्या ।
दोहीं अतीत आद्याचें स्वरूप ॥१॥
स्वरूपीं लक्षुमी नाहीं सरस्वति ।
संपत्ति विपत्ति दोनी नाहीं ॥२॥
नाहीं शिव शक्ति नाहीं नर नारी ।
अंतरीं विचारी दास म्हणे ॥३॥
॥६३॥
आमुचे सज्जन संत साधुजन ।
होय समाधान तयांचेनि ॥१॥
तयांचेनि संगें पाविजे विश्रांति ।
साधु आदि अंतीं सारखेची ॥२॥
सारखेची सदा संत समाधानी ।
म्हणोनियां मनीं आवडती ॥३॥
आवडती सदा संत जिवलग ।
सुखरूप संग सज्जनांचा ॥४॥
सज्जनांचा संग पाप तें संहारी ।
म्हणोनियां धरी रामदास ॥५॥
॥६४॥
संतसंगें जन्म चुकती यातना ।
आणि जनार्दना भेटी होय ॥१॥
भेटी होय संतसंगें राघवाची ।
आणिक भवाची शांति होय ॥२॥
शांति होय काळ शांति होय वेळ ।
मन हें निर्मळ जरी राहे ॥३॥
जरी राहे भाव राघवीम सर्वदा ।
संसारा आपदा तया नाहीं ॥४॥
तया नाहीं दु:ख तया नाहीं शोक ।
दास म्हणे एक राम ध्यातां ॥५॥
॥६५॥
संतसंगें तुज काय प्राप्त झालें ।
सांग पां वहिलें मजपाशीं ॥१॥
मजपाशीं सांग कोण मंत्र तुज ।
काय आहे गुज अंतरींचें ॥२॥
अंतरीचें गुज काय समाधान ।
मंत्र जप ध्यान कैसें आहे ॥३॥
कैसें आवाहन कैसेम विसर्जन ।
कैसें पिंडज्ञान सांगें मज ॥४॥
सांगें मज आतां काय उपासनें ।
मुद्रा ते आसनें सांग आतां ॥५॥
सांग पंचीकरण चित्तचतुष्टय ।
कैसे ते अद्वय जीव शिव ॥६॥
जीवशिव ऐक्य झालें कोणे रीतीं ।
सांग मजप्रति अष्ट देह ॥७॥
अष्ट देह पिंडब्रह्मांडरचना ।
तत्त्वविवंचना सांग मज ॥८॥
सांग मज भक्ति कैसी ती विरक्ति ।
सायुज्यतामुक्ति ते कवण ॥९॥
कोणतें साधन कोणाचें भजन ।
ऐसे केले प्रश्र रामदासा ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP