पंचीकरण - अभंग २०१ ते २०५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥२०१॥
मूर्ख तो संसारीं माझे माझें करी ।
मृत्यु बरोबरी हिंडतसे ॥१॥
हिंडतसे काळ सांगातीसरिस ।
मनीं भरवंसा नेणोनियां ॥२॥
नेणोनियां प्राणी संसारासी आला ।
आला तैसा गेला दैन्यवाणा ॥३॥
दैन्यवाणा गेला सर्वही सांडूनी ।
ठेवील जोडूनि जनालागीं ॥४॥
लागहि लागले दोषचि सुटेना ।
अभक्ति तुटेना अंतरींची ॥५॥
अंतरींची मूर्ति अंतरली द्बारीं ।
कदाकाळीं हरी आठवीना ॥६॥
आठवीना अंतकाळीं रामाविण ।
धन्य तें मरण दास म्हणे ॥७॥
॥२०२॥
काया हे काळाची घेवोनी जाणार ।
तुझेनी होणार काय बापा ॥१॥
काय बापा ऐसें जाणोनी नेणसी ।
मी मी म्हणतोसि वायांविण ॥२॥
वायांविण शीण केला जन्मवरी ।
केली लोकाचारी नागवण ॥३॥
नागवण आली परलोका जातां ।
स्वहिताची चिंता केली नाहीं ॥४॥
केली नाहीं चिंता नामीं कानर्कारडें ।
अंतीं कोण्या तोंडें जात असे ॥५॥
जात असे सर्व सांडोनि करंटा ।
जन्मवरी ताठा धरूनियां ॥६॥
धरूनियां ताठा कासया मरावें ।
भजन करावें दास म्हणे ॥७॥
॥२०३॥
चंद्रासी उद्बेग सर्वकाळ मनीं ।
माझें पद कोणी घेईना कीं ॥१॥
घेईना कीं कोणी बळिया दानव ।
घालिना कीं देव कारागृहीं ॥२॥
कारागृह देवादिकांचें चुकेना ।
तेथें काय जना चुकवेल ॥३॥
चुकवेल भोग हें कांहीं घडावें ।
लागेल भोगावें केलें कर्म ॥४॥
केलें कर्म सुटे जरी भ्रांति फिटे ।
दास म्हणे भेटे संतजनां ॥५॥
॥२०४॥
रावणासारिखी कोणाची संपत्ति ।
तोहि गेला अंतीं एकलाची ॥१॥
एकलचि गेला वाळि तो वानर ।
कपि थोर थोर तेहि गेले ॥२॥
गेले चक्रवर्ती थोरा वैभवाचे ।
फार आयुष्याचे ऋषेश्वर ॥३॥
ऋषेश्वर गेले मार्कंडासारिखे ।
इतरांचे लेख कोण करी ॥४॥
कोण करी सर्व शाश्वत आपुलें ।
सर्व राज्य गेलें कांरेवांचें ॥५॥
कौख निमाले पांडव गळाले ।
यादवहि गेले एकसरें ॥६॥
एकसरें गेजे राजे थोर थोर ।
आणिक श्रीधर भाग्यवंत ॥७॥
भाग्यवंत गेले एकामागें एक ।
हरिश्चंद्रादिक पुण्यशीळ ॥८॥
पुण्यशीळ गेले कीर्ति ठेऊनियां ।
पापी गेले वायां अधोगतीं ॥९॥
अधोगतीं गेले देवां न भजतां ।
संसारीं म्हणतां माझें ॥१०॥
माझें माझें करी साचाचिये परी ।
अति दुराचाची एकलाची ॥११॥
एकलाची येतां एकलाची जातां
ध्येंचि दुश्चिता माया-जाळ ॥१२॥
मायाजाळीं पापीजन गुंडाळले ।
पुण्यशीळ गेले सुटोनियां ॥१३॥
सुटोनियां गेले सायुज्यपदासी ।
रामीं रामदासीं चिरंजीव ॥१४॥
॥२०५॥
स्वप्र हा संसार मायिक वेव्हार ।
म्हणोनि सा़चार मानूं नये ॥१॥
मानूं नये सर्व जायाचें आपुलें ।
त्याचें त्याणें नेलें दु:ख काय ॥२॥
दु:ख काय आतां स्वप्रसुख जातां ।
साच तें तत्त्वतां दृढ धरा ॥३॥
दृढ धरा मनीं जानकीजीवन ।
तेणें समाधान पावशीध ॥४॥
पावशील सुख स्वरूप आपुलें ।
जरी तें घडलें रामदास ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP