पंचीकरण - अभंग ८६ ते ९०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥८६॥
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली ।
भेटी हे जोडली आपणासी ॥१॥
आपणासी भेटी झाली बहुतां दिसा ।
तुटला वळसा मीपणाचा ॥२॥
मीपणाचा भाव भावें केला वाव ।
दास म्हणे देव प्रगटला ॥३॥
॥८७॥
प्रगटला देव जयाचे अंतरीं ।
तया नाहीं उरी मीपणाची ॥१॥
मीपणाची उरी तूंपणा भेटतां ।
आपणा पहातां वाव झाली ॥२॥
वाव झाली देव देखतां दाटणी ।
दास म्हणे वाणी वेडावली ॥३॥
॥८८॥
वेडावली वाणी देवचि बोलतां ।
देव बोलूं जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य देव वाचा बोलूं गेली ।
जिव्हाहि चिरली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा झालीसे कुंठित ।
दास म्हणे अंत अनंता़चा ॥३॥
॥८९॥
नित्य निरंतर सर्वांत्ते अंतरीं ।
तोचि निराकारी बोलिजेतो ॥१॥
बोलिजतो संत महंत जाणती ।
खुणेसि बाणती विवंचितां ॥२॥
विवंचितां रामनामचि होईजे ।
ये गोष्टीची कीजे विचारणा ॥३॥
विचारणा सार विचारें उद्धार ।
साधु योगेश्वर विचारेंची ॥४॥
विचारेचि जनी होतसे सार्थक ।
धन्य हा विवेक दास म्हणे ॥५॥
॥९०॥
करीं घेतां नये टाकितां न जाये ।
तैसें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप पाहतां न दिसे ।
डोळां भरलेंसे सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ भेटी कदा नाहीं तुटी ।
रामदासीं लुटी स्वरूपाची ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP