पंचीकरण - अभंग १८१ ते १८५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥१८१॥
अनाथाचा नाथ देव तो कैवारी ।
सिंहासनावरी शोभतसे ॥१॥
शोभतसे राम प्रतापी आगळा ।
दिसे सौम्य लीळा सत्वगुणी ॥२॥
सत्वगुणी होय सात्विकाकारणें ।
कोपें संचारणें दुर्जनासी ॥३॥
दुर्जन संसार सज्जनां आधार ।
भाविकासी पार पाववितो ॥४॥
पाववितो पार या मवसिंधूचा ।
राघव दीनाचा दीनानाथ ॥५॥
दीनानाथ नाम पतित-पावन ।
योगियां जीवन योगलीळा ॥६॥
लीळावेवधारी भक्ताचें माहेर ।
ध्वानीं गौरीहर चिंतीतसे ॥७॥
चिंतीतसे नाम राम पूर्ण काम ।
पावला विश्राम रामनामें ॥८॥
रामनामीं हरु विश्रांति पावला ।
हें तें समस्तांला श्रत आहे ॥९॥
श्रुत आहे व्योमयोगाचे मंडण ।
संसारखंडण महाभय ॥१०॥
महाभय कैंचें रामासी भजतां ।
हें जाणे अन्यथा वाक्य नव्हे ॥११॥
नव्हे सोडवण रामनामाविण ।
रामदास खूण सांगतसे ॥१२॥
॥१८२॥
रामाचें चरित्र सांगतां अपार ।
जाहाला विस्तार तिहीं लोकीं ॥१॥
तिही लोकीं हेंच बाहूनी दिधलें ।
तें आम्हां लाधलें कांहींएक ॥२॥
कांहींएक पुण्य होतें पूर्वजाचें ।
पापीयासी कैचें रामनाम ॥३॥
रामनामें कोटी कुळें उद्धरती ।
संशय धरिती तेचि पापी ॥४॥
पापीयाचें पाप जाय एकसरी ।
जरी मनीं धरीं रामनाम ॥५॥
रामनाम काशी शिव उपदेशी ।
आधार सर्वांसी सर्व जाणे ॥६॥
सर्व जाणे अंतीं रामनामें गति ।
आणि वेदश्रुती गर्जताती ॥७॥
गर्जती पुराणें आणि संतजन ।
करावें भजन राघवाचें ॥८॥
राघवाचें व्यान आवडे कीर्तन ।
तोचि तो पावन लोकांमांजीं ॥९॥
लोकांमाजीं तरे आणि जना तारी ।
धन्य तो संसारीं दास म्हणे ॥१०॥
॥१८३॥
क्षण एक चित्तीं राम आठविती ।
तेणें उद्धरती कोटी कुळें ॥१
कोटी कुळें वाट पहाती तयाची ।
आवडी जयाची रामनामीं ॥२॥
रामनाचें तुटे कुळाचें बंधन ।
पुत्र तो निधोन हरिभक्त ॥३॥
हरिभक्त एक जन्मला प्रर्हाद ।
जयाचा गोविंद कयवारी ॥४॥
कयवारी हरी राखे नानापरी ।
ऐसा भाव धरी आत्मयारे ॥५॥
आत्मयारे हित विचारी आपुलें ।
सर्व नाथियेलें मायाजाळ ॥६॥
मायाजाळ दिसे दृष्टीचें बंधन ।
जाणती सज्ञान अनुभवी ॥७॥
अनुभवी संत सज्जन देखसी ।
तेथें राघवासी ठांई पाडी ॥८॥
ठांई पाडी राम जीवाचा विश्राम ।
जेणें सर्व काम पूर्ण होती ॥९॥
पूर्व होती तुझे मनोरथ सर्व ।
राघवाचा भाव मनीं धरी ॥१०॥
मनीं धरी सर्व देवांचा कैवारी ।
व्यातसे अंतरीं महादेव ॥११॥
महादेव सर्वजानां उपदेशी ।
रामीं रामदासीं दृढभाव ॥१२॥
॥१८४॥
सोपें सुगम हें नाम राघोबाचें ।
सर्वकाळ वाचें येऊं द्यावें ॥१॥
क्षण एक राम हदयीं धरिजे ।
तेणे तें पाविजे निजसुख ॥२॥
येऊं द्यावें वाचें नाम निरंतर ।
तेणें हा संसार तरीजेल ॥३॥
तरीजेल रामीं रामदास म्हणे ।
सावधान होणें रामनामीं ॥४॥
॥१८५॥
प्रात:काळ झाला राम आठवावा ।
हदयीं धरावा क्षणएक ॥१॥
क्षणएक राम हदयीं धरिजे ।
संसारीं तारिजे हेळामात्रें ॥२॥
हेळामात्रें रामनामें होय गति ।
भाग्यवंत घेती सर्वकाल ॥३॥
सर्वकाळ राम मानसीं धरावा ।
वाचें उच्चारावा नामघोष ॥४॥
नामघोष वाचे श्रवण कीर्तन ।
चरणीं गमन देवालयीं ॥५॥
देवालयीं जातां सार्थक जाहलें ।
कारणीं लागलें कलिवर ॥६॥
कलिवर त्वचा जोडूनि हस्तक ।
ठेवाबें मस्तक राम पायीं ॥७॥
रामपायीं शिळा झाली दिव्य बाळा ।
तैसाचि सोहळा मानवांसी ॥८॥
मानवांसी अंतीं रामनामें गति ।
सांगे उमापति महादेव ॥९॥
महादेव सांगे जप पार्वतीसी ।
तोचि तो विश्वासीं रामदासीं ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP