पंचीकरण - अभंग ७६ ते ८०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥७६॥
दृश्यहि दिसेना अंधासि पाहातां ।
परी तया ज्ञाता म्हणों नये ॥
म्हणों नये तैसें अज्ञाना विज्ञान ।
पूर्ण समाधान वेगळेंची ॥२॥
वेगळेंचि कळे क्षीर नीर हंसा ।
दास म्हणे तैसा अनुभव ॥३॥
॥७७॥
ज्ञानाचें लक्षण क्तियासरंक्षण ।
वरी विशेषण रामनाम ॥१॥
रामनाम वाचें विवेक अंतरीं ।
अनुताप वरी त्यागावया ॥२॥
त्यागावया भोग बाह्य लोंलगता ।
पाविजे तत्त्वतां अनुतापें ॥३॥
अनुतापें त्याग बाह्यात्कारीं झाला ।
विवेकानें केला अंतरींचा ॥४॥
अंतरींचा त्याग विवेकीं करावा ।
बाह्य तो धरावा अनुतापें ॥५॥
अनुतापें भक्ति विवेक वैराग्य ।
घडे त्याचें भाग्य काय सांगो ॥६॥
काय सांगों भाग्य अचळ चळेना ।
महिमा कळेना ब्रह्मादिकां ॥७॥
ब्रह्मादिकां लाभ ज्ञानाचा दुर्लभ ।
तो होय सुलभ साधुसंगें ॥८॥
साधुसंगें साधु होईजे आपण ।
सांगतसे खूण रामदास ॥९॥
॥७८॥
मुक्तपणें रामनामाचा अव्हेरू ।
करी तो गव्हारू मुक्त नव्हे रे ॥१॥
मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणि ।
राम नाम वाणीं उच्चारितो ॥२॥
उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
बापुडे मानव देहधारी ॥३॥
देहधारी नर धन्य तो साचार ।
वाचें निरंतर रामनाम ॥४॥
रामनाम वाचें रूप अभ्यंतरीं ।
धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥
॥७९॥
नाम घेतां रामरूप ठायीं पडे ।
गूज तें सांपडे योगियांचें ॥१॥
योगियांचे गुज सर्वांटायीं असे ।
परी तें न दिसे ज्ञानाविण ॥२॥
ज्ञानाविण योग ज्ञानाविण भोग ।
ज्ञानाविण त्याग वाउगाचि ॥३॥
वाउगाचि धर्म वाउगोंचि कर्म ।
गर्भगीता वर्म बोलि-येली ॥४॥
बोलियेली वर्म ज्ञान हें सार्थक ।
येर निरर्थक सर्व धर्म ॥५॥
सर्व धर्म त्यागी मज शरण येई ।
अष्टादयाव्यायीं बोलियेलें ॥६॥
बोलियेलें ज्ञान आगमनिगमीं ।
ज्ञानें-विण ऊमीं निरसेना ॥७॥
निरसेना ऊर्मी आत्मज्ञानेंविण ।
ज्ञानाचें लक्षण निरूमणें ॥८॥
निरूपणे ज्ञान अंतरीं प्रकाशे ।
विवेकें निरसें मायाजाळ ॥९॥
मायाजाळी जन आत्मज्ञानी झाले ।
दास म्हणे गेले सुटोनियां ॥१०॥
॥८०॥
नानारंग शेखीं होताती वोरंगे ।
सर्वदा सुरंग रामरंग ॥१॥
रामरंगें कदा-काळीं वोरंगेना ।
तेथें राहें नाना रंगोनियां ॥२॥
रंगोनियां राहे तद्रूप होवोनी ।
मग वनीं जनीं समाधान ॥३॥
समाधान घडे राघवीं मिळतां ।
मग दुर्मिळता कदा नाहीं ॥४॥
कदा नाहीं खेद सर्वहि आनंद ।
सुखाचा संवाद संतसंगें ॥५॥
संतसंगें जन्म सार्थक होईल ।
राम सांपडेल जवळीच ॥६॥
जवळीच राम असोनि चुकलों ।
थोर भांबावलों मायिकासी ॥७॥
मायिकासी प्राणी सत्यचि मानिती ।
सत्य ते नेण ती जाणपणें ॥८॥
जाणपणें मनीं अज्ञान थारलें ।
तेंचि विस्तारलें ज्ञानरूपें ॥९॥
ज्ञानरूपें भ्रांति समावली चित्तीं ।
संशय-निवृत्ति नव्हे तेणें ॥१०॥
नव्हे तेणें रूप टाउकें रामाचें ।
जें कां विश्रामाचें माहियेर ॥११॥
माहेयेरें घडे संशयनिवृत्ति ।
रामसीतापतीचेनि नामें ॥१२॥
रामनाचें रूप सर्वहि निरसे ।
जो कोणी विश्वासे रामनामीं ॥१३॥
रामनामीं चित्त ठेवूनि असावें ।
दुश्चित नसावें सर्व-काळ ॥१४॥
सर्वकाळ गेला सार्थकीं जयाचा ।
धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2014
TOP