“हे बालिके, तूं आपल्या मुखकमलावर स्मिताच्या सौंदर्याचा थोडासा अंश जरी धारण केलास तरी, त्याच वेळीं, ‘मदनानें जणु सार्या जगाला जिंकून टाकलें,”
ह्या श्लोकांत, जग जिंकलें गेलें अशी संबावना केली आहे. ह्या संबावनेला उत्प्रेक्षा मानण्याचा अतिप्रसंग होऊं नये म्हणून, आमच्या उत्प्रेक्षेच्या लक्षणामध्यें, उपमेय व उपमान ह्या दोन्ही ठिकाणीं असलेला रमणीय धर्म, उत्प्रेक्षेंत, संभावना करण्याचें निमित्त होतो, असें म्ह्टलें आहे. प्रस्तुत श्लोकांत, बालिकेचें स्मित, “मदनानें जणु जगाला जिंकलें” ह्या संभावनेचें निमित्त असलें तरी, जगत् हा विषय व ‘जिंकले गेलें’ हा विषयी ह्या दोघांनाही समान असा येथील स्मित हा धर्म नाहीं. आणि म्हणून, ह्या श्लोकांतील संभावनेला उत्प्रेक्षा मानण्याचा दोष येयें प्राप्त होत नाहीं.
वरील विवेचनाच्या द्दष्टीनें पाहतां, “बहुतकरून स्वर्ग आतां खालीं कोसळणार; चंद्राच्या ठिकर्या होणार, पर्वत व समुद्र यांसह पृथ्वी आपल्या जागेवरून ढळणार; आणि सर्व दिशा पेटूं लागणार; कारण कीं, “हायरे, माझा घात झाला,” असें म्हणून द्रौपदी आतां रडू लागली आहे.”
ह्या श्लोकांतही द्रौपदीच्या रडन्याला, दु:शासनानें तिचे केस ओढणें हें कारण आहे, व त्या केस ओढण्यानें होणारें जें पाप तें, स्वर्गपतन वगैरेच्या संभावनेला निमित्त झालें आहे. तरी सुद्धां ह्या श्लोकांतील संभावनेला उत्प्रेक्षा समजण्याचा प्रसंग येणार नाहीं. (कारण स्वर्ग हा विषय, व पतन हा धर्म विषयी, ह्या दोहोंना साधारण, येथील पाप हा निमित्तरूप धर्म नाहीं.)
“बहुतकरून, हा समोरचा पदार्थ खांब असावा; बहुतकरून हा पुरुष असावा; हा दूर उभा असलेला मनुष्य देवदत्त असावा, (असें वाटतें.)” इत्यादि वाक्यांत, निश्चलत्व, चंचलत्व वगैरे साधारण धर्म संभावनेला निमित्त झाले आहेत. त्यामुळें, ह्या वाक्यांत उत्प्रेक्षा मानण्याच प्रसंग येईल. म्हणून तो टाळन्याकरतां, लक्षणांत, निमित्त होणार्या धर्माला रमणीय हें विशेषण लवलें आहे. आणि रूपकाला उत्प्रेक्षा मानण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून, लक्षणांत सभावना हा शब्द योजिला आहे. रूपकांत अभेदज्ञान निश्चित असतें; पण उप्रेक्षेंतील अभेदज्ञान संभाव्यमान, अनिश्चित असतें हा फरक.
वरील उत्प्रेक्षेच्या लक्षणांत दोन प्रकारच्या उत्प्रेक्षा सांगितल्या आहेत. (१) तादाम्यसंबंधानें होणारी धर्मिउत्प्रेक्षा व (२) तादात्म्याहून निराळ्या संबंधानें होणारी धर्म - उत्प्रेक्षा; आणि म्हणूनच वरील लक्षणवाक्यांत, दोन उत्पेक्षांच्या दोन लक्षणांची विवक्षा आहे. (असें समजावें.)