ह्या श्लोकांत मन ह्या विषयावर, प्रियकराला पाहणें ह्या क्रियारूप धर्माची उत्प्रेक्षा केली आहे. ह्या उत्प्रेक्षेला निमित्त म्हणून शरीराच्या आंतल्या भागांतून बाहेर येणें ह्या मनाच्या धर्माची अपेक्षा आहे. परंतु बाहेर येणें हा धर्म केवळ माणकाच्या ठिकाणींच संभवतो, मनाच्या ठिकाणीं संभवत नाहीं; म्हणून ‘हें मन नव्हे पण माणिक आहे,’ अशी अपहनुति करून, ‘बाहेर असणें’ हा माणकाच धर्म मनाच्या ठिकाणीं आरोपित केला आहे. बिंब - प्रतिबिंबभाव हा साधारण धर्माचा उपाय म्हणून आलेला, ‘कलिंदजानीर०’ इत्यादि श्लोकांत दाखविलाच आहे.
“माधुर्याची परिसीमा, साहित्यरूपी समुद्राचें मंथन करून उत्पन्न झालेली, आणि आस्वाद घेणारांना अत्यंत आनंद देणारी, अशी कविता, ह्या पृथ्वीवर जणु कांहीं सुधा (अमृत) आहे.”
ह्या श्लोकांत, विषय असलेल्या कवितेच्या ठिकाणीं, माधुर्य व पिण्याला योग्य असणें हे दोन धर्म, वाच्यार्थानें संभवत नाहीं; म्हणून लक्षणेनें (उपचरानें) त्यांचा अर्थ निराळा केला; म्ह० पिणें याचा अर्थ ऐकणें, या मधुर याचा अर्थ आस्वाद घेण्यास योग्य असा घेतला; आणि मग, त्या दोन्ही धर्मांना कविता व सुधा यांचे साधारणधर्म बनविले.
येथें मुख्यार्थाशीं लक्ष्यार्थाचा अभेद लक्षणेनें केला असल्यानें, साधारणधर्म बनविता आला. (लक्षणेंत मुख्यार्थाचा बाध होऊन केवळ लक्ष्यार्थच हातीं येतो. “मग कविता व सुधा ह्या दोहोंना साधारण असा धर्म म्ह० साधारणधर्म, येथें दाखविणें कसें शक्य आहे ?” अशी शंका, यावर येथें असें उत्तर दिलें आहे कीं, लक्षणा केल्यावर मुख्यार्थाचा संपूर्ण बाध होत नाहीं. तर त्या लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशीं अभेद होतो असें काव्यप्रकाशकारांनीं स्पष्टपणें सांगितलें आहे. त्याप्रमाणें मुख्यार्थ व लक्ष्यार्थ एक होऊन त्यांतून एक साधारणधर्म निर्माण झाला आहे; व अभेद हा परस्पर होत असल्यानें, कुणाचा अभेद कुणाशीं असाही प्रश्न उपस्थित होत नाहीं.)
केवळ अभेदाध्यवसायानें तयार केलेल्या साधारणधर्मरूपी निमित्ताचें उदाहरण, पूर्वीं हेतूत्प्रेक्षेचें उदाहरण म्हणून आलेल्या ‘व्यागुञ्जनमधुकरपुञ्जमञ्जुगीताम०’ या श्लोकाचें देता येंईल. या श्लोकांत खालपट शाखा असणें, व खाली मान वांकविणें या दोन धर्मांचा अभेदाध्यवसाय केला आहे. व त्रपेला (लज्जेला) हेतु करून केलेल्या उत्प्रेक्षेचें निमित्त म्हणून आलेल्या मान वांकविणें ह्या धर्माला, नीचशाखत्व ह्या धर्मांशीं अभिन्न करून, या अभेदाध्यवसायानेंच उभयांना साधारण धर्म केले आहे.
अशारीतीनें सर्व ठिकाणीं हेतूच्या व फलाच्या उत्प्रेक्षेमध्यें ज्या धर्मावर म्ह० विषयरूप धर्मावर, हेतु अथवा फल म्हणून एखाद्या पदार्थाची, विषयीची, उत्प्रेक्षा केली जाते, तो धर्म या अभेदाध्यवसायाच्या युक्तीनें, साधारण धर्म बनतो व उत्प्रेक्षेला निमित्त होतो, असें आम्ही पूर्वीं अनेकवार सांगितलें आहे.
ह्याचप्रमाणें कुठें एकादा धर्म वाक्यांत शब्दानें सांगितला असूनही तो, विषय व विषयी यांना साधारण नसल्यामुळें, किंवा तो सुंदर वाट्त नसल्यामुळे, (स्वत:) प्रत्यक्ष उत्प्रेक्षेला उभी करण्यास समर्थ होत नसला तरी, त्या उत्प्रेक्षेला उभी करण्यास समर्थ अशा दुसर्या एका धर्माला उत्पन्न करतो; व अशारीतीनें त्या दुसर्या धर्माला तुत्प्रेक्षेकरता अनुकूल करणारा तो पहिला उपात्त धर्म, उत्प्रेक्षेला अप्रत्यक्षपणें उपयोगी पडतोच. उदाहरणार्थ, पूर्वीं उत्प्रेक्षेचें उदाहरण म्हणून दिलेला ‘द्यौरञ्जनकालीभि:’ इत्यादि श्लोक. ह्या श्लोकांत ‘मेघपंक्तीने झाकून जाणें’ हा आकाशाचा धर्म शब्दानें सांगितला आहे. पण तो धर्म जगत् या विषयावर डोळ्यावांचून असलेल्या प्राण्यांची सृष्टइ, अशी जी उत्प्रेक्षा केली आहे तिला (जगत् या विषयाहून तो निराळ्या ठिकाणीं राहत असल्याकारणानें,) कारण होत नाहीं, तरी सुद्धां तो धर्म दुसर्या एका धर्माला उभा करतो, व तो दुसरा धर्म उत्प्रेक्षेला निमित्त होतो. “गाढ अंध:काराच्या योगानें डोळ्यानें पाहण्याचें सर्व सामर्थ्य नाहीसें होणें” हा तो दुसरा उत्थापित धर्म, उत्प्रेक्षेचे निमित्त होतो. या निमित्तभूत धर्माला उभा करीत असल्यामुळें, तो पहिला धर्म उपयोगी आहे.
उत्प्रेक्षेंतील विषय जेथें शब्दानें सांगितलेला असतो, तेथील उत्प्रेक्षेचा प्रकार पूर्वीं आम्ही सांगितलेलाच आहे; पण कुठें विषय शब्दानें सांगितलेला नसतो; तर त्याचा विषयीनें अपहनव केलेला असतो.
उदाहरणार्थ :---
“आपल्या अमृतमय किरणांनी सर्व जगाच्या मध्यभागाला संपूर्णपणें भरून टाकणारा हा चंद्र, ह्या हरिणाक्षीच्या मुखाच्या मिषानें, जणु कांहीं उदय पावत आहे.”
येथें रसगंगाधरांतील उत्प्रेक्षा प्रकरण समाप्त झालें.