अशी ही उत्प्रेक्षा मालाउत्प्रेक्षाही होऊं शकते. उदाहरणार्थ :---
“हा जणु कांहीं दोन डोळ्यांचा इंद्र आहे; दोन कर (१ किरण २ हात) असलेला जणु कांहीं सूर्यच आहे; जणु कांहीं दुसरा चंद्राच आहे. व शरीर धारण केलेला जणु मदनच आहे, हा मनुष्याकृति धारण केलेला जणु समुद्रच आहे आणि पृथ्वीवर आलेला जणु बृहस्पतिच आहे. अखिल ब्राम्हाणांनी ज्याला नमस्कार केला आहे अशा ह्या अवर्णनीय राजाचा जयजयकार आहे.”
ह्या ठिकाणीं राजामधील, दोन डोळे असणें, दोन हात असणें, वगैरे धर्म त्या राजाचे इंद्र वगैरेंशीं तादात्म्य करण्याच्या बाबतींत प्रतिकूल आहेत (विरोधी आहेत). म्हणून त्या विरोधाचा परिहार करण्याकरतां विषयी जे इंद्र वगैरे देव, त्यांच्या ठिकाणीं दोन डोळे असणें वगैरे धर्मांचा आरोप करून, त्याच्या योगानें, राजा व इंद्रादिक ह्यांच्यामधील, तादात्म्याकरतां समान धर्म निर्माण केला आहे. या श्लोकांत उपमा आहे असें म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, ह्यात उपमा मानली तर, दोन डोळे असलेला वगैरे विशेषणें देण्यांत कांहीं अर्थच उरणार नाहीं. “उपमेमधील साद्दश्य उत्पन्न व्हावें म्हणून, दोन डोळ्यांचा इत्यादि विशेषणें साधारण धर्म म्हणून दिलीं आहेत” असेंही म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, हीं विशेषणें श्लोकांत नसलीं तरी परम ऐश्वर्य वगैरे सूचित करणारे दूदरे (बाहेरून आणलेले) समान धर्म, उपमेकरतां लागणारे समान धर्म निर्माण करू शकतील. शिवाय (दोन डोळ्यांचा इंद्र) असें म्हणण्यांत कसलीही चमत्कृति नाहीं; आणि म्हणूनच असल्या सुंदर नसणार्या साधारणधर्माच्या बळावर उपमा निर्माण करण्याचा कवीच्या मनांत अभिप्राय (असेल असें मुळींच म्हणता येणार) नाहीं. दोन (डोळे असणें वगैरे धर्मांच्या बळावर इंद्रादिकांशीं राजाचें साद्दश्य सांगणें हा कवीच्या मनांतील अभिप्राय मुळींच नाहीं.) शिवाय, श्लोकांतील ‘दुसरा असणें’ वगैरे धर्मांच्या बळावर इंद्रादिकांशीं राजाचें साद्दश्य सांगणें हा कवीच्या मनांतील अभिप्राय मुळींच नाही.) शिवाय. श्लोकांतील ‘दुसरा असणें’ वगैरे धर्मांचा, चंद्र वगैरेच्या ठिकाणीं जो आरोप केला आहे तो, ह्या श्लोकात उपमा मानल्यास निरर्थक होऊ लागेल. परंतु ह्या श्लोकांत (जर तादात्म्योत्प्रेक्षा करायची असेल तर, त्याकरतां) आवश्यक असलेला (विषय व विषयी ह्यांमधील) अभेद, (इंद्राच्या) हजार डोळ्यांनीं, (सूर्याच्या) हजार किरणांनीं, ब्रम्हादेवाच्या सृष्टींत एकच (चंद्र) असण्यानें, (मदनाच्या) शरीररहित असण्यानें, (समुद्राच्या) जलरूप असण्यानें, व (बृहस्पतीच्या) स्वर्गांत होणार्या वसतीनें, कसा सिद्ध होईल ? म्हणून त्या अभेदाला प्रतिकूल असणारें ज्ञान दूर करण्याकरतां, विषयी इंद्र वगैरेंच्या ठिकाणीं दोन डोळे असणें वगैरे धर्मांचा आरोप करणें निश्चितच उपयोगाचें आहे. आतां (हें खरें कीं) ह्याच श्लोकांतील इव शब्द काढून टाकल्यास येथें द्दढारोपरूपक होईल. व श्लोकांतून द्विनेत्र वगैरे; विषयींचीं विषयींचीं विशेषणें काढून टाकल्यास येथें उपमा अलंकार होईल, आणि शेवटीं द्विनेत्र इत्यादि विशेषणें व उत्प्रेक्षावाचक इव शब्द काढून टाकल्यास येथें शुद्ध रूपक होईल. अशा रीतीनें, (ह्या श्लोकांतील शब्दांमध्यें फेरफार केल्यास) अलंकारांतही फरक होईल.