उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां फलोत्प्रेक्षेचें उदाहरण :---
“रात्रंदिवस गळ्याइतक्या पाण्यांत सूर्याचें आराधन करीत बसलेली ह्या सरोवरांतील कमलांची पंक्ति, (स्वत:ला) ह्या सुंदरीच्या स्तनाचें रूप प्राप्त व्हावें म्हणूनच कीं काय, तपश्चर्या करीत आहे.”
ह्या श्लोकांत, सर्व स्तनरूप अवयवांवर असणारी स्तनत्वही जाति आहे, (असें समजावें); व हा जातीचा अर्थ, ‘वक्षोजतां ह्या पदांत असलेल्या ‘तल’ या तद्धित प्रत्ययानें दाखविला आहे. ‘त्व’ व ‘ता’ ह्या दोन प्रत्ययांचें, मूळ शब्दाचें (प्रकृतीचें) प्रवृत्तीनिमित्त ह्या अर्थीं व्याकरणशास्त्रांत विधान आहे. ‘स्तनाचें रूप प्राप्त होणें’ ह्या फलाची ह्या ठिकाणीं, उत्प्रेक्षा केली आहे. आणि तें फल प्राप्त व्हावें म्हणून, ‘पाण्यांत रात्रंदिवस बसणे’ ह्या क्रियेच्या अध्यवसानानें (म्ह० अभेद निश्चयानें) प्राप्त होणारी तपश्चर्या ही क्रिया, या ठिकाणीं, निमित्त म्हणून सांगितली आहे. ह्या ठिकाणीं अशी शंका येईल कीं, “स्तनरूप होणें म्हणजे स्तनत्व, ही (केवळ) एक शुद्ध जाति आहे. या जातीची प्राप्ति होणें ही क्रिया होत नसेल तर केवळ स्तनत्व ही जाति, फल होऊ शकणार नाहीं. तेव्हांह्या श्लोकांत प्राप्तिरूपी क्रियेलाच फळ कां मानीत नाहीं ?” पण अशी शंका घेऊं नये; कारण प्राप्ति ही क्रिया ह्या ठिकाणीं संबंधरूपानें प्रतीत होत असल्यानें, तिच्या द्वारा जाति वगैरेंना फल मानणें योग्य होईल. असें न मानलें (म्ह० वक्षोजतेला फळ न मानलें) तर, ‘वक्षोजतायै’ ह्या शब्दांत, फलत्वबोधक जो चतुर्थींचा प्रत्यय आला आहे, त्याची उपपत्ति लावतां येणार नाहीं. (ज्या शब्दापुढें चतुर्थीचा प्रत्यय येतो त्याला, फल मानावे असा व्याकरणाचा नियम आहे) आणि म्हणूनच ‘ब्राम्हाण्याय तपस्तेपे विश्वामित्र: सुदारुणम्’ [विश्वामित्रानें ब्राम्हाण होण्याकरितां (म्ह० ब्राम्हाणत्व हें फल प्राप्त करण्याकरितां) कठोर तप आचरिलें] इत्यादी प्रयोग योग्यच आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP