आतांपर्यंत जाति, गुण, क्रिया व द्रव्य या चारांची हेतू म्हणून उत्प्रेक्षा होते, असें दाखविलें. आतां या चारांच्या अभावाचीही हेतू म्हणून उत्प्रेक्षा होते, त्याचीं उदाहरणें देतों :---
“अति रमणीय असलेल्या वस्तूंचा संहार, अत्यंत निष्ठुर असलेला काळ नित्य करतो तें, त्याला डोळे नसल्यामूळेंच कीं काय, (असें मला वाटते.)”
ह्या ठिकाणीं काळ वस्तूंचा संहार करतो ही गोष्ट स्वाभाविक असूनही, त्याल डोळे नसल्यामुळें तो संहार करतो, अशी डोळ्यांचा अभाव ह्या हेतूची उत्प्रेक्षा केली आहे.
“या सुंदरीचे दोन डोळे नि:सीम शोभेच्या उत्कर्षानें युक्त आहेत; परंतु ते जे चंचळ (अस्वस्थ) आहेत ते, एकमेकांना पाहण्याचा आनंद होत नसल्यामुळेंच कीं काय (कोण जाणे.)”
ह्या ठिकाणीं आनंद ह्या गुणाच्या अभावाची, हेतु म्हणून उत्प्रेक्षा केली आहे.
“हे सखी, लोकांच्या मनामध्यें मोह उत्पन्न करणारे हे तुझे केस, जणु गाढ अंधकारच आहे; आणि तो अंधकार, हे सुंदरी, तुझ्या वदनरूपी चंद्राची कांति वरपर्यंत पोंचत नसल्यामुळेंच कीं काय, तेथें काळाकुट्ट होऊन राहिला आहे.”
ह्या श्लोकांच्या उत्तरार्धांत,चंद्राची कांति न पोचणें ह्या क्रियेच्या अभावाची, हेतु म्हणुन उत्प्रेक्षा केली आहे. या श्लोकाच्या पूर्वार्धांत केसावर केलेली दाट अंधकाराची उत्प्रेक्षा, अंधकाराची जाति मानल्यास, जातिस्वरूपोत्प्रेक्षा होईल; अथवा अंधकाराला (तेजाचा) अभावरूप मानल्यास, जातीच्या अभावाची स्वरूपोत्प्रेक्षा होईल.
“तुझ्या शत्रुराजाच्या सुंदर स्त्रिया रडूं लागल्या असतां, अरण्यांतले वृक्ष, दु:खी होऊन, त्यांचे शेकदो तुकडे होत नाहींत, ह्याचें कारण, त्या वृक्षांच्या श्रवणेंद्रियाचा अभाव, अशी माझी कल्पना आहे.”
ह्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय हें जातिही नाहीं, क्रियाही नाहीं. व गुणही नाहीं. पण विचार करतां असें वाटतें कीं तें या तिघांहून निराळे असें आकाशरूपी द्रव्य आहे; व त्याच्या अभावाची ह्या ठिकाणीं हेतु म्हणून उत्प्रेक्षा केली आहे. आणि ‘शेकडो तुकडे न होणें’ हा क्रियेचा अभाव, वरील उत्प्रेक्षेचें निमित्त आहे. अशा रीतीनें हेतूत्प्रेक्षा थोडक्यांत सांगितली.