ह्या प्राचीनांच्या श्लोकांत असलेल्या हेतूत्प्रेक्षेमध्येंहि लक्ष्मीरूप विषयावर केवळ हर्षरूप हेतूची उत्प्रेक्षा केलेली नसून, ह्या ठिकणीं, स्वाभाविकपणें लक्ष्मीचें नायिकेच्या पायावर असणें’ ह्या विषयावर, हर्षानें उत्पन्न होणारे कार्य ‘लक्ष्मीचें पाया पडणें’ ह्या विषयीची, अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली आहे, हर्षहेतूचें जें कार्य (प्रस्तुत श्लोकांत) लक्ष्मीचें पाया पडणें, त्यालाच उत्प्रेक्षेचें निमित्त मानावें असें ज्यांचें मत आहे, त्यांनासुद्धां तें (निमित्त तयार करण्याकरतां) विषयांतील धर्माशीं समान स्वाभाविकालगनाशीं विषयीच्या हर्षहेतुक लगन या धर्माचें अभेदाध्यवसान करणें भाग पडतें, कारण तसें जर केलें नाहीं तर (म्ह० विषय व विषयी यांच्या धर्मांचें अभेदाध्यवसान केलें नाहीं तर), विषयी जो हर्ष त्याच्याशीं समानाधिकरण नायिकेच्या पायाला चिकटणें हा धर्म (म्ह० पद्मलक्ष्मी या एकाच अधिकरणावर हर्ष हा धर्म व त्याचें कार्य पादपतन हा धर्म हे दोन्ही एकत्र राहत असल्याने, हर्ष या कारणरूप धर्माशीं समानाधिकरण, पादपतन हा धर्म आहे) पद्मलक्ष्मी म्ह० पद्मशोभा ह्या विषयावर (तो पादपतन हा धर्म) आहे, असें म्हणतां येणार नाहीं; व म्हणून पादपतन हे हर्षाच्या संभावनेचें निमित्तही मानतां येणार नाहीं. अशारीतीनें निमित्त दाखविता न आल्यानें हेतूत्प्रेक्षाही होऊ शकणार नाहीं. (नव्यांनी मानलेल्या भेदसंबंधानें होणार्या उत्प्रेक्षेंत ही, निमित्त या अंशांत अभेदाध्यवसान केल्यावाचून भागणार नाहीं. असें प्राचीनांचें म्हणणें)
अशाच रीतीनें :---
“ज्या राजाच्या भीतीमुळें पळून गेलेल्या चोल राजाच्या कपाळावरची चामडी, काटेरी झाडांनीं भरलेल्या वनप्रदेशांनीं, अजून याच्या कपाळीं चामडी, काटेरी झाडांनीं भरलेल्या वनप्रदेशांनीं, अजून याच्या कपाळीं काय अनुभवायचें आहे तें सांगणारीं विधीचीं अक्षरें (विधिलिखित) पाहण्याकरतांच कीं काय, सोलून टाकलीं आहे, (असा राजा).”
ह्या दुसर्यानें केलेल्या श्लोकांत, फलोत्प्रेक्षा आहे; तरी तिच्यांत, काटेरी झाडांनीं भरलेले वनप्रदेश हा विषय; व त्यावर ‘कपाळाचें कातडें सोलून टाकल्यामुळें होणारें, कपाळावरच्या विधिलिखिताच्या अक्षरांचें कातडें सोलून टाकल्यामुळें होणारें, कपाळावरच्या विधिलिखिताच्या अक्षरांचें दर्शन’ ह्या विषयी फलाची संभावना, नाहीं; पण कपाळावरील अक्षरें पाहणें हें ज्याचें फल आहे, अशा, ‘कपाळावरील कातडें सोलून काढणें’ ह्या विषयीची, ‘काटयांनीं कपाळाला सोलणें’ ह्या विषयाच्या ठिकाणीं, तादात्म्यानें उत्प्रेक्षा केली आहे.
ह्याप्रमाणें सर्वत्र उत्प्रेक्षेमध्यें, विषयाच्या ठिकाणीं विषयीची अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली जाते, असें प्राचीनांचें मत.