अशा रीतीनें व्यापन वगैरेंना उत्प्रेक्षेचे विषय मानल्यास, त्या उत्प्रेक्षेकरतां दुसरें कोणतें तरी निमित्त शोधावें लागेल; अशी अडचण तुम्हीच दाखविली आहे. आतां निमित्त ह्या अंशांत अध्यवसान असणें ही गोष्ट, उपमा वगैरे अलंकारांतही प्रसिद्ध आहे. आणि शिवाय आम्ही असें विचारतों कीं. ‘नूनं मुखं चंद्र:’ (तुझें मुख जणु कांहीं चंद्रच आहे.) या उत्प्रेक्षावाक्यांत, अध्यवसाय कुठून असणार ? कारण कीं, ह्या ठिकाणीं विषय जें मुख तें वाक्यांत धडधडीत हजर आहे. तुम्ही म्हणाल कीं, “अध्यवसाय जेथें सिद्ध असेल तेथें विषय विषयीच्या पोटांत जाऊन राहिलेला असतो. पण जेथें अध्यवसाय साध्य असतो तेथें, विषयाच्या निगरणाची क्रिया चालू असल्यानें, विषयाची स्वतंत्रपणें उपस्थिति असते.” पण हें तुमचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण कीं, अध्यवसान साध्यही असतें ह्याला कुठेंच प्रमाण नाहीं. आणि अध्यवसान साध्य असतें असें म्हणाल तर, रूपकांतही अध्यवसान असतें, असें म्हणण्याची पाळी येईल. आणि शिवाय, अध्यवसान हा लक्षणेचा एक प्रकार आहे. आतां, उत्प्रेक्षेंतील विधेय या अंशांत लक्षणा मुळींच नसते. उलट, उत्प्रेक्षेंत, अभेद, समवाय वगैरे संबंधाच्या योगानें होणार्या आहार्य (म्ह० काल्पनिक) शाब्दबोधाचाच सर्व आलंकारिकांनीं स्वीकार केला आहे. तात्पर्य काय कीं, प्राचीन अथवा अर्वाचीन आलंकारिकांचें, उत्प्रेक्षेच्या बाबतींतील म्हणणें तर्कद्दष्टया टिकण्यासारखें नाही.
अशी वस्तुस्थिति असल्यानें, आतां ह्या बाबतींतील आमचें मत आम्ही सांगतों :--- धर्मिस्वरूपोत्प्रेक्षेच्या बाबतींतील आमचा निर्णय आम्ही प्राचीन मताच्या परीक्षणाच्या वेळीं स्पष्टपणें सांगितलाच आए. आतां, ‘हेतुत्प्रेक्षेच्या वाक्यांत आलेल्या पंचम्यंत पदांतील पंचमी विभक्तीचा अर्थ हेतु, व प्रकृति आणि प्रत्यय या दोहोंच्या अर्थांमधील संबंध अभेद, हा असतो, ह्या मतीं, पंचम्यंत पदाचा अर्थ (सैषा स्थली० या श्लोकांत वियोग दु:खाशीं अभिन्न हेतु (म्ह० वियोगदु:खरूप हेतु) हा आहे. या हेतूची उत्प्रेक्षा प्रयोज्यसंबंधानें (म्ह० वियोगदु:ख हें कारण व मौनित्व हें कार्य अशा कार्यकारणसंबंधानें) केली आहे; व तिचे इव वगैरे बोधक आहेत. व दुसर्या मतीं, (वरील सारख्या ठिकाणीं) पंचमीचा अर्थ प्रयोज्यत्व (कार्य) हा मानला तर, प्रकृतिप्रत्ययार्थामधील संबंध निरूपितत्व (म्ह० कारणत्व अथवा जनकत्व) हा समजावा.