आतां, धर्मस्वरूपोत्प्रेक्षेचे हें उदाहरण :---
“लावण्याचा निधी (खजिना) असलेल्या तुझ्या मुखाला निर्माण करणार्या ब्रम्हादेवाच्या मनांत (तें मुख निर्माण करीत असतांना) फार मोठा गोंधळ माजला असावा, असें मला वाटतें; कारण कीं, तुला बाजूल सारून (म्हणजे तुला निर्माण करण्याचे काम अर्धवट सोडून) त्या कुशल कारागिरानें एखाद्या भ्रांतिष्टाप्रमाणें, एकाएकी, कलाहीन व दीन असलेल्या अशा चंद्राला राजा म्ह० सर्वश्रेष्ठ बनविले.” (राजा याचा चंद्रा हा अर्थही येथें घ्यावा.)
ह्या श्लोकांतील पूर्वार्धांत ब्रम्हायाच्या ठिकाणीं ज्याची संभावना केली आहे त्या मोहरूप धर्माच्या सिद्धीकरतां (म्हणजे त्या उत्प्रेक्षेला निमित्त पाहिजे म्हणून) श्लोकाच्या उत्तरार्धांत, (विकलत्व) ‘विचार केल्यावांचून कार्य करणें’ हा धर्म शब्दानें सांगितलेला आहे, व तो मोहरूप धर्माशीं समानाधिकरण आहे. ज्या स्वरूपोत्प्रेक्षेंत धर्मिस्वरूप अथवा धर्मस्वरूप विषयी असतो, तिच्यांत निमित्त होणारा धर्म, उपमेंतील धर्माप्रमाणें, कधीं बिंबप्रतिबिंबभावरूप, तरी कधीं अनुगामिरूप असा अनेक प्रकारचा असतो; कधीं शब्दानें सांगितलेला असतो, तर कधीं शब्दानें सांगितलेला नसतो. परंतु ज्या (हेतु व फल) उत्प्रेक्षेमध्यें हेतु व फल हे विषयी असतात, तिच्यांत निमित्त होणारा धर्म कधीं कधीं कल्पित असला तरी तो, विषयाच्या स्वाभाविक धर्माशीं अभिन्न होऊनच राहतो, अर्थात तो नेहमीं उपात्तच असतो, म्ह० वाक्यांत शब्दानें सांगितलेला असतो, तो जर शब्दानें सांगितलेला नसेल तर हेतूच्या व फलांच्या उत्प्रेक्षेंतील जे हेतु व फल यांचा विषय अथवा आश्रय म्हणून त्याचा कोणाशीं संबंध जोडतां येईल ? (म्हणून हेतु व फल या उत्पेक्षेंत हतुफलांचा आश्रयभूत जो विषय त्याचा धर्म, शब्दानें सांगितलेला असलाच पाहिजे, तो तसा असेल तरच निमित्तरूप धर्म त्याच्याशीं अभेदसंबंधानें राहू शकेल.)
या उत्प्रेक्षेच्या बाबतींत प्राचीनांची व अर्वाचीनांची मतें स्पष्टपणें भिन्न आहेत. यांपैकीं प्राचीनांचें मत असें :---
उत्प्रेक्षेंत सर्वत्र विषयाच्या ठिकाणीं विषयाची उत्प्रेक्षा अभेदसंबंधानेंच केली जाते, दुसर्या कोणत्याच संबंधानें केली जात नाहीं. कसें तें पहा :---
प्रथम, धर्मिस्वरूपोत्प्रेक्षेंत ‘मुख चंद्रं मन्ये’ (मी मुखाला चंद्र मानतो.) इत्यादि वाक्यांत विषयी जो चंद्र त्याचा, विषय जें मूख त्याच्याशीं अभेद अगदीं स्पष्ट आहे. कारण कीं, दोन नामार्थ (एका वाक्यांत एकाच विभक्तींत) आले असतां, त्यांचा परस्परांशीं साक्षात् अव्नय भेदसंबंधानें करणें हें व्युत्पत्तिशास्त्राच्या सिद्धांताविरुद्ध आहे. वरील उत्प्रेक्षेंत, विषय जें मुख त्याचा वाक्यांत शब्दानें निर्देश केला असल्याकारणानें, हिला उपात्तविषया उत्प्रेक्षा म्हणावी. याचप्रमाणे ‘अस्यां मुनीनामपि मोहमूहे०’ इत्यादि नैषधीयचरितांतील श्लोकांत असलेल्या धर्मस्वरूपोत्प्रेक्षेंत ही, मुनींच्या मध्यें असलेला, ‘दमयंतीला पाहणें’ (म्ह० दर्शन) हा उपात्त नसलेला, व मोहाहून इतर असलेला जो धर्म, तो विषय आहे; व त्या विषयावर ‘दमयंतीला पाहून मुनींच्या मनांत उत्पन्ना झालेला मोह’ हा जो विषय़ी त्याची अभेदसंबंधाने उत्प्रेक्षा केली आहे. ही उत्प्रेक्षा साध्यवसान उत्प्रेक्षा असल्यामुळें (म्हणजे ह्या उत्प्रेक्षेंतील विषय, विषयीच्या पोटांत जाऊन त्याच्याशीं अभिन्न होऊन राहिल्यानें,) ह्यांतील विषय शब्दानें सांगितलेला नसला तरी, कांहीं बिघडत नाहीं, ह्या उत्प्रेक्षेंत निमित्त होणारा धर्म, दमयंतीच्या निरनिराळ्या अवयवावर मुनींची आसक्ति असणें, हा आहे, याच प्रमाणें, ‘लिम्पतीव तमोऽङगानि वर्षतीवञ्जानं नम:’ (अंधकार जणु कांहीं अंगाला लेप लावीत आहे; आणि आकाश जणु कांहीं काजळाची वृष्टि करीत आहे.) ह्या कोणाच्यातरी (शूद्रकाच्या मृच्छकटिकांत पहिल्या अंकांत आलेल्या) श्लोकांतील ‘तम;’ ह्या प्रथमा विभक्तींत आलेल्या कर्त्याचें ठिकाणीं, लेपन करणें ह्या धर्माची (भेदसंबंधानें) उत्प्रेक्शा केली आहे, असें समजू नये; कारण कीं, लेपनाचा आश्रय हा जो आख्याताचा (म्ह० येथें ति ह्या प्रत्ययाचा) अर्थ त्याचेम विशेषण जो तम: हा प्रथमान्त कर्ता, तो लेपनक्रियेचा एकदेश असल्यानें, त्याच्याशीं लेपनक्रियेचा विषयी म्हणून अन्वय होणार नाहीं, त्याचप्रमाणें, ह्या ठिकाणीं, ‘तम:’ ह्या कर्त्यावर, ‘लिम्पति’ ह्यांतील आख्याताचा अर्थ जो आश्रयरूप कर्ता, त्याचीही अभेद - संबंधाने उत्प्रेक्षा होणार नाही, कारण कीं, ह्यांतील आख्यातार्थ जो कर्ता तो लेपन (ह्या मुख्य असलेल्या) क्रियेचें (वैयाकरणमतें) विशेषण होत असल्यामुळें, गौण आहे. तेव्हां, गौण असलेला पदार्थ मुख्य विषयी कधींही होणार नाही. पण ह्या श्लोकांतील खरी उत्प्रेक्षा अशी :---
येथें अंधकाराच्या पसरणें (व्यापन) ह्या धर्मावर, तमानें (लोकांच्या) अंगांवर केलेल्या लेपनाची (अभेदसंबंधानें) उत्प्रेक्षा केली आहे; व या श्लोकार्धांतील दुसर्या उत्प्रेक्षेंत, अंधकारानें नभाला व्यापणें ह्या विषयावर, आकाशानें केलेल्या काजळाच्या वृष्टीची अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली आहे. ह्या दोन्ही उत्प्रेक्षांमध्यें अंधकारानें केलेलें व्यापनहा विषय आहे. पण तें व्यापन, लेपन व वर्षण ह्या दोन विषयींनीं गिळलें गेल्यामुळें, (शास्त्रीय भाषेंत, त्याचें निगीर्याध्यवसान झाल्यामुळें) त्याच्या वाक्यांत शब्दानें निर्देश केला नाहीं; आणि म्हणूनच अशा तर्हेच्या उत्प्रेक्षेला अनुपात्तविषया (जिचा विषय शब्दानें सांगितलेला नाहीं ती,) असें म्हणतात. प्रस्तुत उत्प्रेक्षेंत निमित्त म्हणून आलेला धर्म, ‘चोहोंकडे काळेकुट्ट करून टाकणें’ वगैरें घ्यावा, हा धर्मही वाक्यांत शब्दानें सांगितलेला नाहीं. अशा रीतीनें सर्वत्र अभेदसंबंधानेंच उत्प्रेक्षा होत असल्यानें, ‘सभावनमथोत्प्रेक्षा प्रकृतस्य समेन यत्’ (प्रकृतावर अप्रकृताची जी संभावना तिला उत्प्रेक्षा म्हणावें,) असें उत्प्रेक्षेचें लक्षण करून, मम्मटभट्टांनीं, ‘(येथें) ‘व्यापन’ वगैरे विषयावर लेपन वगैरे विषयीची संभावना केली आहे.’ असें म्हटलें आहे. अशा रीतीनें,
“ज्याला माझा विकास रात्रीं सहन होत नाहीं, अशा, जन्मापासून माझा वैरी असलेल्या चंद्राला, स्वत:च्या सौंदर्याविषयीं झालेला गर्व, नीलकमलाच्या पाकळीसारखे जिचे डोळे आहेत अशा ह्या सुंदरीनें स्वत:च्या वदनकांतीनें अजिबात नाहींसा केला,” ह्या विचारानें आनंद झाल्यामुळें कीं काय, हे सुकुमारगात्रि, ह्या पदमाची लक्ष्मी (शोभा) जणु कांहीं तुझ्या पाया पडत आहे, (शब्दश;, तुझ्या पायाला चिकटली आहे.)”