उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अथवा गुणहेतूत्प्रेक्षेचें हें दुसरें उदाहरण :---
“गुंजारव करणार्या भ्रमरांच्या समूहानें मंजुळ स्वरांत गायिलेली स्वत:ची स्तुति ऐकून, अत्यंत लाजल्यामुळेंच कीं काय, ह्या अरण्यांतील वृक्षांचे समूह, थेट जमिनीपर्यंत आपल्या माना वाकवीत आहेत, असें मला वाटतें.”
क्रियाहेतूत्प्रेक्षेचें उदाहरण हें :---
“ स्वत:चा पिता जो कलिंद पर्वत त्याचें पोट फाडल्यामुळें उत्पन्न झालेल्या अनेक महापातकांच्या संबंधानें, यमुना नदीला जणु कांहीं काळिमा आला आहे.”
द्रव्य हेतूत्प्रेक्षेचें उदाहरण असें :---
“हा पौर्णिमेच्या रात्रीचा प्रियकर आहे असें अविचारानें, कोणी बिचारे मानतात (मानोत); पण मला वाटतें कीं, हा चंद्र नसून अमृतानें भरलेलें असें देवांचें स्वच्छ तळें आहे; आणि ह्या तळ्यांतील पाण्याची अति नील अशी जी कांति ती, बघणारांना ह्या चंद्रमंडळाच्या (पलीकडे) वर अससेल्या आकाशाची सर्वत्र पसरलेली नील कांतीच आहे असें वाटतें.” ह्या ठिकाणीं, चंद्रावर ‘हे अमृताचें तळें आहे’ अशी उत्प्रेक्षा केली आहे, व त्या चंद्रावर असलेल्या, नीलत्वरूपानें कल्पिलेल्या कलंकावर, हा वरच्या आकाशाचा नीलवर्णच आहे, अशी दुसरी उत्प्रेक्षा केली आहे. द्रव्यहेतूत्प्रेक्षेच्या या उदाहरणावरून,‘हेतु म्हणून द्रव्याची उत्प्रेक्षा होतच नाहीं’ असें जें प्राचीनांचें (अलंकारसर्वस्वकार वगैरेंचे) म्हणणें, त्याचें खंडन झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP