ह्या ठिकाणीं, उत्प्रेक्षेचा विषयी सर्व ग्रहांचें आश्रयस्थान हा. ह्या उत्प्रेक्षेला निमित्त होणारे, (व) विषय व विषयी यांना साधारण असलेले असे अनेक धर्म आहेत. व त्यांतील प्रत्येक धर्म, ‘कोणत्या तरी ग्रहाचा आश्रय होणारें अंग असणें’ हा आहे. हे सर्व धर्म, विषय व विषयी यांचीं विशेषणें आहेत; व तशीं तीं विशेषणें साधारणधर्म व्हावीं म्हणून, श्लेषाचा आधार घेऊन, त्या सर्व विशेषणांचा दुसरा अर्थ राजाला लागू केला आहे. उदाहरणार्थ :--- कल्याणाचा आश्रय असा, संभृतमङ्गला ह्या पदाचा दुसरा अर्थ केला आहे. व अशा रीतीनें विशेषण म्हणून आलेल्या पदांच्या दोन अर्थांचें तादात्म्य मानलें गेलें आहे. व त्या योगानें, त्या त्या श्लिष्ट पदांनीं अनेक साधारणधर्म निर्माण केले आहेत व ते सर्व धर्म उत्प्रेक्षेला निमित्त झाले आहेत.
अथवा हें दुसरें उदाहरण :---
“हे सुंदर राजकन्यें, मनोहर केसांनीं युक्त अशा ज्या तुझ्या (कपोलप्रांताच्या) ठिकाणीं, कानांची रमणीय शोभा भासते, तो तुझा कपोलप्रांत, जणुं कांहीं, अलका जिच्यांत आहे व जिच्यांत कुबेराची लक्ष्मी आहे अशी उत्तर दिशाच आहे असें मला वाटतें.”
ह्या ठिकाणींही विषय व विषयी ह्यांच्या धर्मरूप विशेषणांच्या श्लेषाच्या योगानें होणार्या, दोन दोन अर्थांचा अभेद करून, त्यांचा साधारण धर्म बनविला आहे.
अथवा :---
“ज्या अर्थीं तुझ्या वचनांच्या ठिकाणीं असत्याचा मुळींच संबंध नाहीं (दुसरा अर्थ - आश्विनीकुमारांचा संबंध आहे.), ज्या अर्थीं कीर्तीच्या विषयांत तूं धवल आहेस (अर्जुन आहेस), ज्या अर्थीं कर्माच्या बाबतींत तूं साक्षात् धर्म आहेस (धर्मराज युधिष्ठिर आहेस), आणि ज्या अथीं तूं आपल्या चित्तांत जगाचा प्राणभूत जो भगवान शंकर त्याला बाळगतोस, (वायूचा पुत्र भीम आहेस); त्या अर्थीं पांडव तुला वशा आहेत कीं काय (असें मला वाट्तें.) ह्या श्लोकांत पांडव ह्या विषयावर, ‘राजाच्या ताव्यांत असणारे’, ह्या विषयीची तादात्म्योत्प्रेक्षा केली आहे. ह्या उत्प्रेक्षेंतील निमित्त ‘राजाश्रितत्व - राजाच्या आश्रयाला येऊन राहणें’ हा (केवळ विषयिगत) धर्म आहे; (पण हा धर्म विषयगत झाल्याशिवाय त्याला निमित्त म्हणतां येणार नाहीं म्हणून) श्लोषमूलक अभेदाध्यवसायानें त्या विषयिगत धर्माला विषयगत धर्म करून, साधारण धर्म केले आहे; (व अशा रीतीनें नासत्ययोग वगैरे धर्म पांडवांच्या ठिकाणींही आल्यानें, राजाश्रितत्व धर्मही पांडवांच्या ठिकाणीं आला; आणि मग तो उभयगत झाल्यानें सरळ निमित्त झाला.)
“स्तनांच्या मधोमध रुळणार्या माणकाच्या मिषानें बाहेर आलेलें हें तुझें अनुरागयुक्त मन, हे सुंदरी, जणुं कांही, तुझ्या प्रियकराकडे पाहत आहे. असें मला वाटतें.”