अथवा (वैयाकरणाप्रमाणें) आम्ही फल व व्यापार हा धातूचा अर्थ, व आश्रय हा तिङचा अर्थ (दुष्यतुदुर्जनन्यायानें) मानला तरी, ‘देवदत्ता: पचमान:’ या वाक्याप्रमाणें, ‘देवदत्त: पचति’ या वाक्यांतही देवदत्त या प्रथमान्तार्थाचे ठिकाणीं पचनक्रियाश्रय ह्या तिडर्थाचा विशेषण म्हणून अभेदान्वय करणें योग्य होईल; (पण) तिडर्थ आश्रयाचा, धात्वर्थ जो व्यापार त्याच्याशीं, भेदानें अन्वय करणें योग्य होणार नाहीं; कारण तसे केल्यास, सर्व लोकांत प्रसिद्ध असलेल्या उद्देश्यविधेयभावाचा भंग होण्याचा प्रसंग येईल. आणि होता होईल तो (सत्यां हि गतौ ) ‘प्रत्ययार्थाचें प्रकृत्यर्थ हें विशेषण असतें’ हा सामान्य नियम पाळणें हेंच योग्य आहे. आता, (पूर्वी आम्ही केलेल्या ‘भावप्रधानमाख्यातम्’ या यास्कवचनाच्या अर्थाशीं विरोध येत असेल तर) ‘भावप्रधानमाख्यातम्’ या वाक्याचा, ‘भावना म्ह० व्यापार हा आख्याताचा (म्ह० धातूचा) अर्थ,’ असा अर्थ केल्यास, विरोध येणार नाहीं. यावर ‘पण असा या वाक्याचा नवा अर्थ केल्यास, विरोध येणार नाहीं. यावर ‘पण असा या वाक्याचा नवा अर्थ केल्यास, वैयाकरणांच्या मताशीं विरोध येईल याची वाट काय ?’ असें मात्र म्हणून नका. कारण अलंकारशास्त्र हें अगदीं स्वतंत्र शास्त्र असल्यानें वैयाकरणांच्या मतांशीं आम्हा आलंकारिकांचा विरोध आल्यास, आम्ही ते दूषण मानीत नाहीं, ह्या गोष्टींची विस्तारानें चर्चा आम्ही पुढें केव्हांतरी करणार आहों. तूर्त, प्रस्तुत मुद्याकडे वळूं या.
अशा रीतीनें (नव्यांचें मतें) ‘लिम्पतीव०’ इत्यादि श्लोकांत, भेदसंबंधानें असो किंवा अभेदसंबंधानें असो, आख्यातार्थाचीच म्ह० तिडर्थ जो लेपनकर्तृत्व अथवा आश्रय याची प्रथमा विभक्तीच्या प्रत्ययार्थावर (तम:वर) उत्प्रेक्षा केली जाते; धात्वर्थाची (लिम्प या धातूच्या अर्थाची) स्वत:नें निगीर्ण (म्हणजे गिळलेला) जो व्यापन धर्म त्याच्या ठिकाणीं संभावना होणार नाहीं. कारण तशी केली तर, सर्व लोकांत प्रसिद्ध असलेली जी इवच्या अर्थाची विधेयता (म्ह० संभावना या इवार्थानें दाखविलेली विषयीची विधेयता) उद्देश्य हजर नसल्यानें जुळणार नाहीं. आणि उद्देश्य नसूनही उत्प्रेक्षा होत असेल तर, ‘तम:कर्तृकं लेपनम्’ या उद्देश्यबोधक पद नसलेल्या वाक्यांतूनही, उत्प्रेक्षेची प्रतीति होते, असें मानण्याचा प्रसंग येईल. यावर तुम्ही (प्राचीन) म्हणाल कीं, “आमच्या या (तमोव्यापन या विषयावर तमोलेपन या विषयीची अभेदसंभावना असलेल्या) उत्प्रेक्षेंत निमित्त कांहीं तरी पाहिजे म्हणून आम्ही तम याच्याशीं संबद्ध असलेल्या व आमच्या उत्प्रेक्षेंत विषय अससेल्या व्यापनालाच निमित्त बनविलें आहे, (व्यापन या धर्मालाच निमित्त बनविलें आहे.) व तें खरोखरीचें तसें व्हावें म्हणून (म्ह० तो धर्म विषय व विषयी या दोहोंतही असेल तरच तो निमित्त म्हटला जातो म्हणून) त्या व्यापन धर्माचा, तम:संबंधीं लेपनाशीं, व्यापनाला (निगीर्ण करून) अभेदाध्यवसाय केल आहे; म्हणून आम्ही आमच्या य उत्प्रेक्षेंतील विषयाचें अनुपात्तत्व व अध्यवसायमूलत्व आवश्यक व योग्य आहे.” तर यावर आमचें (नव्यांचें) उत्तर असें कीं, “तर मग रुपकालाही अनुपात्तविषय व अध्यवसानमूलक म्हणा” कारण, ‘लोकान हन्ति खलो विषम्’ या रूपकांतही खलाशीं संबंध असणारें दु:खदान हा विषय अनुपात्त आहे, व त्या दु:खादानाचें, विषयीच्या हनन या धर्माशीं अभेदाध्यवसान ही आहे. (खरें म्हणजे, उत्प्रेक्षेंत किंवा रूपकांतही अनुपात्तविषयत्व व अध्यवसानमूलकत्वा आवश्यक आहे, असें म्हणणें योग्य नव्हे) म्हणून, सामान्यपणें उत्प्रेक्षेंत निमित्ताच्या भागांत अतिशयोक्ति असतेंच (असें माना म्हणजे झालें.) अशाच रीतीनें, ‘उन्मेषं यो मम न सहते.’ ह्या श्लोकांतही लक्ष्मीरूप विषयाच्या ठिकाणीं, पायाला चिकटणें या क्रियेचा हेतु जो हर्ष त्याची उत्प्रेक्षा केली आहे; व या उत्प्रेक्षेंत, पदमलक्ष्मीचें पाया पडणें हीजी क्रिया, तिच्याशीं अभेदाध्यवसायानें अभिन्न होणारी जी स्वाभाविक लगनक्रिया हीच निमित्त आहे. त्याचप्रमाणें :---
“हीच ती जागा कीं, जेथें तुझा शोध करीत हिंडत असतां, तुझ्या पायांतन जमिनीवर गळून पडलेला एक पैंजण मी पाहिला. तो (पैंजण) तुझ्या चरणकमलाच्या वियोगामुळेंच कीं काय, मौन धरून बसला होता.”