ह्या श्लोकांतील उत्प्रेक्षावाक्याचा, प्रथमान्तविशेष्यक शाब्दबोध मानणार्या नैय्यायिकांच्या मतें, खालीलप्रमाणें शाब्दबोध होतो :--- येथें यमुनेच्या पाण्यांत अर्धे बुडलेले व अतिशय मोठा आवाज करणारे असे बगळे हा विषय. या विषयाशीं, अंधकारानें वैरामुळें ज्यांना गिळले आहे अतएव जीं त्या निगरणक्रियेचें कर्म झालीं आहेत त्या (विषयी असलेल्या) चंद्राच्या पिल्लांचें प्रथम अभेदसंसर्गानें तादात्म्योप्रेक्षण केलें गेलें आहे. व त्यानंतर ह्या उत्प्रेक्षेंतील धर्मी असलेल्या विषयावर आक्रोश करणें ह्या धर्माची उत्प्रेक्षा केली गेली आहे. (व ही धर्मोत्प्रेक्षा ह्या श्लोकांत प्रधान आहे.) ह्या दोन उत्प्रेक्षांपैकीं पहिल्या तादात्म्योत्प्रेक्षेंत (म्ह० धर्मिस्वरूपोत्प्रेक्षेंत) बक व चंद्र (विषय व विषयी) यांना साधारण असलेला धर्म (धवलत्व हा अनुपात्त धर्म) निमित्त आहे. दुसर्या (म्ह०) धर्मोत्प्रेक्षेंतील, तादात्म्याहून दुसर्या संबंधानें (म्ह० आश्रयाश्रयिभावसंबंधाने) होणार्या संभावनेंत, क्रोशन ह्या उत्प्रेक्षित धर्माच्याच अधिकारणावर (म्ह० चंद्रावर) राहणारा दुसरा एखादा धर्म (उदाहरणार्थ ‘गिळला जाणें’ हा धर्म) विषयावरही (येथें बकावर) राहत असेल तरच, तो या धर्मोत्प्रेक्षेंत निमित्त म्हणून घेतां येईल; पण (या द्दष्टीनें पाहतां) ‘गिळला जाणें’ हा धर्म बगळा या विषयावर राहत नाहीं. आणि तो विषयावर राहतो असें सिद्ध केल्याशिवाय, त्याला या उत्प्रेक्षेचें निमित्त मानतां येणार नाहीं; म्हणून त्याकरतां प्रथम येथें (विषयगतत्वसिद्धये) बकावर शशिकिशोरांच्या तादात्म्याचीएक गौण व प्रधान धर्मोत्प्रेक्षेला मदत करणारी व अनुवाद्य (म्ह० पूर्वीं तयार केलेली, अतएव गौण) प्रत्प्रेक्षा केली आहे. या उत्प्रेक्षेमुळें, बक व शशिकिशोर हीं दोन्हीं अभिन्न झाली; ‘गिळणें जाणें’ हा धर्म बकावरही (विषयावर) आहे हें सिद्ध झालें; व त्याला ह्या धर्मोत्प्रेक्षेचें निमित्त होता आले. आतां ज्याप्रमाणें विशिष्टोपमेंत, उपमेय व उपमान यांच्या विशेषणांत आर्थ साद्दश्य असतें, व ह्या विशेषणाच्या विशेषणांतही आर्थ साद्दश्य मानलें जातें, ह्या प्रमाणें येथेंही समजावे. म्हणजे बक या विषयाचें अर्धमग्न हें विशेषण; व त्या विशेषणाचें, यमुनेचें पाणी हें विशेषण, त्याचप्रमाणें विषयी जी चंद्राचीं पिल्लें त्यांचें, ‘गिळणें जाणें’ हे विशेषण, व त्या विशेषणाचें, अंध;कार हें विशेषण. आतां बगळे व चंद्राचीं पिल्लें ह्या (अनुक्रमें) विषय व विषयींची ज्याप्रमाणें येथें म्ह० प्रधानधर्मोत्प्रेक्षेला मूळ असलेली तादात्म्योत्प्रेक्षा केली आहे; त्याप्रमाणें, त्या दोघांच्या विशेषणांचीही (म्ह० अर्धमज्जन व निगरण या दोहोंची) येथें तादात्म्योत्प्रेक्षा आहे. इतकेंच नव्हे पण त्याच्या दोन विशेषणांची (म्ह० यमुनाजल व ध्वान्त या दोन विशेषणांची) येथें तादात्म्योत्प्रेक्षा होते; (हें ध्यानांत ठेवावें). मात्र ह्या विशेषणांची तादात्म्योत्प्रेक्षा शब्दांनीं सांगितली नसून ती अर्थावरून समजायची आहे. अशा रीतीनें, प्रथम, विषय जें बगळे त्यांच्यावर, विषयी जीं चंद्राचीं पिल्लें त्यांची तादात्म्योत्प्रेक्षा झाल्यानंतर, तिच्या मदतीनें नंतरची मुख्य धर्मोत्प्रेक्षा तयार झाली आहे; (व ही मुख्य उत्प्रेक्षा ‘अंध:कारानें गिळलें जाणें” ह्या धर्माला निमित्त करून त्या निमित्ताच्या बळावर केली गेली आहे.)