गुणरूपी फलाची उत्प्रेक्षा केल्याचें उदाहरण :---
“हे विरहिणी स्त्रिये, वियोगरूपी अग्नीचें कुंडच अससेल्या तुझ्या ह्रदयावर रुळत असलेला मोत्यांचा हार, प्रियकराच्या समागमाच्या सुखाकरतांच कीं काय तपश्चर्या करीत आहे ? (मुक्ताहार; ह्या शब्दाचा, ‘ज्यानें आहार टाकून दिला आहे’, असा दुसरा अर्थही येथे श्लेषानें घ्यावा).
आतां क्रियारूपी फलाची उत्प्रेक्षा अशी :---
“शंकराच्या मस्तकावर असलेला चंद्र हा हालाहल विष, (शंकराच्या तृतीय नेत्रांतील अग्निरूप) कालानल व वासुकी (वगैरे सर्प) यांची संगति, त्या तिघांच्या जवळ असलेल्या ठार मारण्याच्या विद्येचा अम्यास करण्याकरतांच कीं काय, अजूनही करीत आहे (असें वाटतें ).”
ह्या श्लोकांत एका विरही मनुष्याचे उद्गार आहेत व त्यात ठार मारण्याच्या विद्येचा अभ्यास करण्याकरतांच कीं, काय, अशी फलोत्प्रेक्षा केली आहे. ‘अध्यसितुम्’ ह्या शब्दांतील ‘तुमुन’ ह्या प्रत्ययानें फल हा अर्थ दाखविला आहे. अशारीतीनें होऊ शकणार्या प्रत्यक्ष उदाहरणाला जुळतील व शक्य असतील ते उत्प्रेक्षेचे दुसरे प्रकार शोधून काढावे.
आम्ही येथें उत्प्रेक्षेचें जाति, गुण, क्रिया वगैरेंवर आधारलेले प्रकार सांगितले. ते प्राचीनांच्या (म्ह० अलंकारसर्वस्वकार वगैरेंच्या) मताला अनुसरून सांगितले व त्यांचीं उदाहरणेंही दिलीं, खरें पाहिलें असतां ह्या उत्प्रेक्षेच्या सर्व प्रकारांत असलेल्या चमत्कारांत कांहीं विशेष फरक नाहीं; म्हणून खरोखरी त्यांचीं उदाहरणें देण्यासारखींच नाहींत, पण चमत्काराची खरी विशेषता हेतु, फल व स्वरूप ह्या तीन उत्प्रेक्षांच्या प्रकारांतच आहे.
आतांपर्यंत, उत्प्रेक्षेचीं उदाहरणें म्हणून दिलेल्या श्लोकांतून उत्प्रेक्षेचे इव वगैरे वाचकशब्द काढून टाकले असतां, ती प्रतीयमान उत्प्रेक्षा होते. (म्हणजे तिला प्रतीयमाना उत्प्रेक्षा म्हणावें.) कारण कीं, इवादि शब्द काढून टाकल्यावर, उत्प्रेक्षा केवळ वाक्यार्थाच्या बळावरच ओळखली जाते. पण प्रतीयमाना म्हणजे व्यंग्या अशी मात्र चुकीची समजूत करून घेऊ नये, कारण कीं, व्यंग्य उत्प्रेक्षा सांगण्याचा येथें प्रसंगच नाहीं.