ह्या श्लोकांतही मौनाचें कारण म्ह० हेतु म्हणून, नूपुराच्या (पैंजणाच्या) ठिकाणीं वियोगदु:खाची उत्प्रेक्षा केली आहे. या उत्प्रेक्षेला मौन हें निमित्त आहे. कारण, तें मौन, नूपुर ह्या अधिकरणावर आहे, व विश्चेषदु:खही त्याच अधिकरणावर आहे; म्हणून तीं दोन्ही समानाधिकरण; व निश्चल पडल्यामुळें नूपुराचें जें नि:शब्द होणें, त्याच्याशीं हें मौन, अभेदाध्यवसानानें एकरूप झालें आहे; आणि म्हणूनच तें, अचेतन नूपुरावरही आहे, असे म्हणतां आलें. पण ‘ह्या श्लोकांत निश्चलत्व हें निमित्त आहे व नि:शब्दत्व या विषयावर वियोगामुळें उप्तन्न होणारें दु:ख ज्याला कारण आहे त्या मौनरूप विषयीची येथें अभेदसंबंधानें उत्प्रेक्षा केली आहे’ असें मात्र समजूं नये, कारण कीं, उत्प्रेक्षेंत ज्याच्या बरोबर इव शब्द येतो, त्यालाच उत्प्रेक्षेंतील विषयी म्हणावें असा या बाबतींत सामान्य नियम आहे. या उत्प्रेक्षेतील नि:शब्दत्व हा विषय, मौन या विषयीनें निगीर्ण झाला असल्यानें, पुन्हा मौनरूपी विषयीला विधेय करणें जुळणार नाही. (कारण उद्देश्य व विधेय असे स्वतंत्र पदार्थ येथें नाहींत.) आणि शिवाय, (या दु:खहेतुक मौनाच्या तादात्म्योत्प्रेक्षेंत) तुम्हांला निमित्त दुसरें (बाहेरचें) शोधण्याची पाळी येईल, (कारण, तुम्ही नि:शब्दत्व या संभाव्य निमित्ताला उत्प्रेक्षेचा विषय केले आहे.)
आतां, अशा तर्हेच्या उत्प्रेक्षेंत, ‘विषय व विषयी हे एकाच वेळीं असणें’ (एककालप्रभवत्व) या साधारण धर्माला निमित्त करणें शक्य आहे; तरी पण अशा निमित्तांत (म्हणजे एककालिकत्व वगैरे निमित्तांत) कसलाही चमत्कार नाहीं; त्यामुळें अशा तर्हेचा साधारण धर्म ज्याप्रमाणें, उपमेला उपयोगी पडत नाहीं, त्याप्रमाणें, उत्प्रेक्षेलाही उपयोगी पडणार नाहीं. वरील हेतूत्प्रेक्षेच्या बाबतींत आम्ही जे सांगितलें, तें फलोत्प्रेक्षेच्या बाबतींतही लागू आहे असें समजावें; अशा रीतीनें हा विषय स्पष्ट झाल्यामुळें, ‘किंवा हेतु फल आणि धर्मस्वरूपोत्प्रेक्षा ह्या तिन्हींच्याही उदाहरणांत, तादात्म्यसंबंधानेंच उत्प्रेक्षा होते.’ असें प्राचीनांचेंमत अनुसरणार्या द्रविडश्रेष्ठ (द्रविडलोकांतील बैलोबा हा निंदार्थ ही, येथें सूचित आहे.) अप्पय्य दीक्षितांनीं जे म्हटलें आहे त्याचाही निरास झाला (असें समजावें.)
आतां (अर्वाचीनांनीं उदा०) अलंकारसर्वस्वकारांनीं उत्प्रेक्षेचें जें लक्षण सांगितलें आहे तें असें :---
“ विषयीनें विषयाचें निगरण केल्यामुळें, विषयीच्या आभेदाची जी प्रतीति होते तिला शास्त्रीय भाषेंत विषयीचा अध्यवसाय म्ह० अभेदनिश्चय म्हणतात. हा अध्यवसाय दोन प्रकारचा. (१) सिद्ध व (२) साध्य. ह्या दोहोंपैकीं साध्यत्वाची प्रतीति होत असल्यानें, जेथें संभावनाव्यापार प्रधान असतो, त्या ठिकाणीं उत्प्रेक्षा होते. वरील विधानाचा स्पष्ट अर्थ असा :--- ज्या ठिकाणीं, विषय संपूर्णपणें विषयीकडून निगीर्ण झाला असेल, त्या ठिकाणचा अभेदनिश्चय - अध्यवसाय - सिद्ध आहे असें समजावें. व ज्या ठिकाणचा विषय विषयीकडून गिळला जात असेल म्ह० गिळण्याची क्रिया चालू असेल, त्या ठिकाणीं अभेदनिश्चय साध्य आहे असें समजावें. या द्दष्टीनें पाहतां ज्या ठिकाणीं अध्यवसानाचें सिद्धत्व असतें तेथें अभेदनिश्चयाचें प्राधान्य असतें. उदा० :--- अतिशयोक्तींत. पण ज्या ठिकाणीं अध्यवसानाचें साध्यत्व असतें त्या ठिकाणीं, अध्यवसानक्रियारूप व्यापाराचेंहि प्राधान्य असल्यानें, उत्प्रेक्षा होते. (असें समजावें.)” अशा रीतीनें अभेदार्भ उत्प्रेक्षेचें लक्षण करून, अलंकारसर्वस्वकारानीं पुढें असें म्हटलें आहे कीं, “सैषा स्थली यत्र०’ इत्यादि श्लोकांत, नूपुरांत अससेल्या मौनाचा हेतु म्हणून दु:ख या गुणाची (धर्माची) उत्प्रेक्षा केली आहे. ह्या उत्प्रेक्षेंत मौनित्व हें निमित्त आहे; कारण तें मौनित्व नूपुराच्या नि:शब्दतेशीं अभेदसंबंधानें एकरूप झालें आहे.” याशिवाय, यापुढें अलंकारसर्वस्वकारांनीं, धर्मोत्प्रेयेच्या कर्तृत्वाच्या उत्प्रेक्षेंत, व्यापन हा धर्म निमित्त झाला आहे”, असेंहि म्हटलें आहे. पण अलंकारसर्वस्वकारांचें हें सर्व म्हणणें परस्पर विरुद्ध आहे. दु:ख ह्या धर्माच्या उत्प्रेक्षेंत, अभेदगर्भ अध्यवसाय मुळींच नाहीं. तो, निमित्त म्हणून आलेल्या मौन ह्या अंशांत असला तरी, तो (अध्यवसाय) सिद्ध असल्यामुळें, खरें म्हणजे अतिशयोक्तीचा विषय होणेंच योग्य आहे; उत्प्रेक्षेचा विषय होणें योग्य नाहीं, कारण कीं, तुमच्या मतानें होणार्या उत्प्रेक्षेत मौन हें निमित्त असल्यानें त्याची उत्प्रेक्षा करतां येणार नाहीं. (म्हणजे तें मौन उत्प्रेक्षेंत विषयी होणार नाहीं.) अशाच रीतीनें लिम्पतीव ह्या वाक्यांतही लेपन ह्या अंशानें (निगरण केल्यामुळें) व्यापनाचा जो अभेदाध्यवसाय झाला आहे, तोही उत्प्रेक्षेचा विषय होऊं शकत नाहीं. पण अतिशयोक्तीचा विषय होऊ शकतो. कारण कीं, व्यापनाचा, निगरणानें होणारा जो अध्यवसाय तो सिद्ध असून तुम्ही त्याला, श्लोकांत होणार्या लेपनकर्तृत्वाच्या उत्प्रेक्षेंत, निमित्त म्हणून सांगितला आहे.