उदाहरणार्थ :---
“नयनरूपी भ्रमरांच्या आनंदाचें मंदिर आणि शोभेनें युक्त, असें हें तुझें मुख, हे सुंदरी, नीलकमलच आहे कीं काय असें मला वाटतें.”
ह्या श्लोकांच्या पूर्वार्धांतील पहिला धर्म जो आनंदमंदिर तो, नयनरूपी भ्रमर या रूफकाच्या उपायानें, विषय व विषयी यांचा साधारण धर्म केला गेला आहे. याच पूर्वार्धांतील दुसरा धर्म ‘शोभेनें युक्त असणें’ हा, विषय व विषयी यांच्या द्दष्टीनें प्रत्येकीं निराळा (स्वतंत्र) असला तरी, त्यांच्या अपूर्व शोभांना अभेदाध्यवसायानें एक मानणें, ह्या उपायानें, त्याला साधारणधर्म बनविला आहे. उत्प्रेक्षेंतील साधारणधर्म केवळ शब्दात्मकही असू शकतो. उदाहरणार्थ :---
“अक्षसंघातांनीं [ दोन अर्थ :--- (१० इंद्रियांच्या समूहानें, व (२) कमलबीजांनीं] युक्त व सदा सरोग [अर्थ :--- (१) सरोवरामध्यें उगवलेलीं व (२) रोगांनीं पीडलेलीं] अशीं प्राण्यांचीं शरीरें जणुं कमळेंच आहेत अशी माझी कल्पना आहे.”
शब्दात्मक साधारणधर्म वाक्यांत शब्दानें सांगितलेला असलाच पाहिजे असा नियम. पण अर्थात्मक साधारण धर्म उत्प्रेक्षा वाक्यांत शब्दानें सांगितला नसला तरी चालतो. उदाहरणार्थ :--- ‘द्विनेत्र इव वासव:०’ इत्यादि श्लोकांत, राजा व इंद्र ह्या दोहोंमधील जगदीश्वरत्व हा साधारण धर्म शब्दानें सांगितलेला नाहीं. यावर कुणी म्हणतील कीं, “द्विनेत्र इत्यादि श्लोकांत द्विनेत्रत्व (म्हणजे दोन डोळे असणें) हा साधारण धर्म माना व तो वाक्यांत शब्दानें सांगितलेला आहे असें म्हणा. कारण कीं, राजा व इंद्र या दोहोंना साधारण धर्म मिळावा, म्हणूनच विषयी जो इंद्र त्यावर द्विनेत्रत्व या धर्माचा आरोप केला आहे” पण असें म्हणणें योग्य नव्हे. कारण द्विनेत्रत्वाचा विषयीवर आरोप करून त्याला साधारणधर्म जरी बनविला तरी, तो कांहीं सुंदर नाहीं. म्हणून त्याच्यानें उत्प्रेक्षेचें उत्थापन होणार नाहीं. द्विनेत्रत्वाला जो ह्या श्लोकांत साधारणधर्म बनविला आहे तो केवळ, राजाप्रमाणें इंद्राला दोन डोळे नाहींत ही जी वस्तुस्थिति, तिचा उत्प्रेक्षेला होणारा विरोध दूर करण्याकरतांच आहे, असें आम्हीं पूर्वीच सांगितलें आहे.
“हे पूर्ण पराक्रमी राजा, तुझी द्दष्टी मंगलानें युक्त (दुसरा अर्थ - मंगळ ह्या ग्रहानें युक्त) आहे; तुझी सभा, बुधांनीं म्हणजे शहाण्या लोकांनीं भरलेली आहे. (बुधग्रहानें शोभणारी आहे ); तुझा सुंदर अधरोष्ठ रक्तवर्णाचा आधार (सूर्याचा आधार) आहे; तुझा क्रोध वज्राघात करणारा आहे. (शनिग्राहाला स्थान देणारा); तूं अत्यंत बुद्धिमान आहेस (साक्षात् गुरुग्रह आहेस.); तुझ्या अंत:करणांत, पार्वतीसहित शंकराचें अधिष्ठान आहे (चंद्र ह्या ग्रहाला स्थान आहे.) अशा रीतीनें हे राजा, तूं सर्व ग्रहांचें आश्रयस्थान आहेस.”