प्रकाशित कविता - बाळाचें आजोळीं जाणें
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द वैकण्ठ]
आगगाडीने हें सोनें आजोळीं जायचें
बाळावीण माझें घर सुनेंच व्हायचें.
हुरळून पाडस हें घरांत बागडे
कैसें कळावें त्या माझ्या जीवींचें साकडें ?
झोपायला घेऊं त्याला मी माझ्याजवळीं.
न कळे त्या झोपेमध्ये कोण कावळी ?
जाऊ तेथे मायेचाच घास हा खाऊल.
उगीच हें मायमन चिन्तेंत राहील.
पुरणाची पोळी माझ्या बाळाला रुचतें.
आज भपभप गाडी - पुढे न सुचतें.
घेतला मी जेवायला माझिया ताटांत
कालविला अदमुर्या दहयांत मी भात.
कुठे बाळ दोन घास घाऊने जेवून
म्हणे सारजाऊला ‘जा टाङगा ये घेऊन.’
न कळे त्या सारजाऊ का गप्प अदास,
याचा अधीर आनन्द चालला अतास,
चिमुकल्या पेटीमध्ये ठेवीले कपडे.
बाळपोथी पाटी यांचा विसर न पडे
दिली सङगें चेण्डूफळी आणखी पिपाणी,
चिमुकला संसार तो ठेविला ठिकाणीं.
बाळ टाङग्यांत बसतां आनन्दें बावरे
खाली सारजाऊ उभी हुन्दका नावरे.
बाळापुढे आगगाडी आणखी अञ्जीन.
धक्क्यावर आवरणें त्याला तं कठीण.
भपभप गाडींतून जाण्याचा आनन्द,
करी प्रश्न, झालें आऊ अञ्जीन का बन्द ?
दोन्ही गालीं दोन पापे घेऊ तो सुस्पष्ट,
कळावेत त्याला केवी जीवाचे या कष्ट ?
हासरें तें मुख पाही मी डोळे भरून -
अमङगल अश्रूंना मी न देऊं झरून.
घण्टा झाली. शीट झाली डबाली हालला,
ठेवा माझिया मायेचा दूरच चालला !
कोठवर नादाने हा गम्मत पाहील ?
घडिभरामध्ये गाढ झोपून जाऊल !
तशी झोप कोठुनि हो मजला लागेल ?
देह विसावला तरी जीव हा जागेल.
२७ ऑगस्ट १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP