[जाति भूपति]
१
पाठीस लागुनी पोट छळी मनुजाला
प्रच्छन्न जगावर अपकारच हा झाला.
पोटाची चिन्ता ज्यां न असे किति थोडे !
त्यांचाही स्वास्थामधे न जाऊ वेळ,
मग लावुनि जगतीं आग पाहती खेळ.
२.
कोणाची करितां स्तुति, देतां लव दोष
विरजूनी टाकी तो त्याचा सन्तोष;
स्तुति ती तर न्याय्यच, तो अपुकार कशाचा ?
तो दोष तेवढा गमे अवस्त्वारोप -
चर्चिशी व्यक्ति का ? गप्प बैस वा झोप.
३.
मित्राशी करितां, पैक्याचा व्यवहार
का बरें खचावा मैत्रीचा आधार ?
जर पैका गेला क्षिति न तयाची मोठी -
अघडकीस येतां वृत्ति हीन अनुदार
स्वारस्य न सख्यीं अरे, तुटे हृत्तार.
४.
[जाति लीलाराति]
मानवी मनाला दुर्बलता पावली
अन दोन जन्मलीं अन्ध मुलें जावळीं;
मात्रेचें ऐका अन्तर दोघांमधे,
हो प्रसन्न म्हणती देव स्तुतिला तरी
बहिरेंच दैव पण, घ्या करुनी खातरी.
५.
तत्त्वार्थ झगडतां झाले जे जे अरी
अगवूनि घेतला सूड तयांनी तरी
त्या वज्राघातें काळीत न हें पिचे -
सहकार्य जयांशी केलें तत्वास्तव
ते कृतघ्न ठरतां होय जिणें रौरव.
६.
जे कुकर्म करिती लाज न त्याची तयां
की घडुनि जाऊ तें प्रकृति - लीलया;
अन्याय जयाला झाला पण तो जर
मन मरिल मोकळें तर त्याचा राग ये,
चिरडिती तया खल मग दुर्लौकिक - भयें.
७.
का करिशी, म्हणती, शोक असा सम्भ्रमें ?
हेमन्तामागुनि वसन्त येऊ क्रमें.
पण काय तयाचें त्याजला
ग्रीष्मांत जलाविण मेल्यावरी
ओढयास पूर जरि वर्षा आणी तरी ?
८.
अमक्यास मिळालें अमुक अकतां जर
वाऊट वाटलें तर तो का मत्सर ?
नृपपदहि तयाला मिळो न वैषम्य तें !
पण देशमुखीची असुनि करीं पात्रता
कशि महारकी ही सुसहय व्हावी अता ?
९
वाहशी कशाचा गर्व रूपसुन्दरी ?
हें रूप निर्मिलें तूच काय गे तरी ?
पति तुझा असे श्रिमन्त, सर्व जाणती
त्यानेहि मिळविलें तसें स्वकष्टें धन -
अन चञ्चल रूपावरीच त्याचें मन
१०.
चारुत्व अमललें ज्यावरती मन भुले
कोणास न वाटे की व्हावें आपुलें ?
पण पहा ध्रुवान्तर रसिका - र्सिकामधे -
कुणि हरी, न लव तो कुसुममनाला गणी,
पाहिजे तर कुणा लागणीस लागणी.
११.
मत्सरी मनुष्या, तू काहीही लिही,
हे व्यर्थ शब्द तव, कोण तयांना भिऊ ?
वाटतेपरिमला तुझीच ही काळजी -
गणितील रसिक तुज हीन शारदा - गुणें.
मत्सरक्लेश तरि तव होती का अणे ?
१२.
नव तरुणि, फुलाहुनि तू सुन्दर कोवळी,
भाळून तुझ्यावर हरी तुला जो बळी
राहून तयाच्या अङकित आनन्दुनी
रिझवूनि तयाला होणें सुपतिव्रता
याहूनि अधिक का नसेच तव पात्रता ?
१३.
प्रियतमा तुजवरी प्रेम करीना कुणी
स्वानन्द म्हणुनि तू का देशी टाकुनी ?
अन प्रेम कधि कुणा त्राग्याने का मिळे ?
काहीहि घडो, स्मित करणें श्रेयस्कर,
का करावी कुणी कीव ? करो मत्सर !
१४.
तुज वादविवादे नच माझी द्दष्टि ये,
अन श्रद्धा आता विदुषींस न ती प्रिये;
तू अबला, तुजवर भार कसा लादुं मी ?
आश्रितालता तू असुख तुला कासया
द्यावीच तिलाञ्जलि मग स्वतत्त्वास या.