प्रकाशित कविता - साशीर्वाद निरोप
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[सुनीत]
‘ताता’ ! मारित हाक लाडिक अशी धावूनि आलास तू,
होतो वाचित मी चिडूनि म्ह्टलें ‘जा ! देशि का त्रास तू ?’
झालें खर्कन तोण्ड वाऊट तुझें, तत्काळ येऊ रडें,
अन वेगें फिरलास तू परतुनी जायास कोणीकडे -
तों पाठीवरती कडाडुनि बसे चाबूक तैशापरी
मी खुर्चीवरुनी त्वरेंच उठलों दुक्खावुनी अन्तरीं.
घेऊ मी अचलूनि अङग तंव तों थोडें दिसे तापलें.
जीवा चैन नसे तुझ्या म्हणुनि ना आलास ‘ताताकले ?’
आता तू असशी सुखी, विसरुनी गेलास तें मागलें.
मी मोठा, मजला न तें विसरवें, जीवास तें लागलें;
घ्यावी धाव तुवा अशी मजकडे अन मी करावें दुरी ?
- बाळा जाऊं नको दुरी भरभरे रे प्रेम माझे अरीं !
जातां ख्यात करावया पण पुढे तू जा दुरी. खन्त न.
साशीर्वाद निरोप घे, करिन मी तूझें यशश्चिन्तन.
६ जुलै १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP