प्रकाशित कविता - रामद्वारीं
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[वृत्त शालिनी]
काशीहूनी मी अयोध्येस जाऊं
श्रीरामाच्या मन्दिरीं ध्यान पाहीं,
पाहीं तेथे मी महाराष्ट्रियास,
आनन्दाने चित्त पावे विकास.
पृच्छा केली मीं मराठींत त्याला
वृद्धाचा त्या जीव अत्फुल्ल झाला,
वाटे कोणी लाभला आप्तमित्र
त्या भेटीची माधुरी ती विचित्र.
होतां पूर्वी काय गोदातटींचे ?
सेवेसाठी येथ आला कधीचे ?
वर्षे गेलीं कानपूरांत काही
अन वार्धक्यां राहतां रामपायीं ?
पोरेबाळें ती कुठे ? कोण कोण ?
साङग पत्ते ठेवितों मी टिपोन,
यात्रेमाजी भेट त्यांचीहि घेतों -
त्याची चर्या पालटे जों वदे तो :---
‘माता रामो मत्पिता रामचन्द्र:
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र;
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु -
र्नान्यं जाने नैव जाने न जाने’
होती मातें पाठ ती रामरक्षा,
चित्तीं आता बाणली ती विवक्षा;
दोघांचीही सम्पली येथ भाषा
लागे रामीं द्दष्टि येथेच आशा.
२९ जानेवारी १९३९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP