मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
शिवरामस्वामिकृत पदें

शिवरामस्वामिकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
भय कासयाचें आत्म अनुभवीं योगिया ? ॥ध्रुवपद.॥
देह अहंभाव त्यागी । मृत्यु मारुनीयां अंगीं ।
देव आपणचि झालिया ॥भय०॥१॥
योग कर्मातें गाळी । ज्ञान संशयातें टाळी ।
आपुल्या ठायांसी आलिया ॥भय०॥२॥
पूर्णानंदें पूर्णपणीं । दुजयातें दृष्टी नाणी ।
शिवरामचि होउनी ठेलिया ॥भय०॥३॥

पद २ रें
माझा गे ! तोचि माझा गे ! । सखा जीवलग देव माझा गे ! ॥ध्रुवपद.॥
नामरूपासी अतीत । नामें तारिले पतीत ।
रूपें बिंबला मतींत । नटनाटक तो हरी ॥१॥
त्याचें गे ! ध्यान त्याचें गे ! लागलें तें काय बोलूं वाचे गे ! ॥ध्रुवपद.॥
जैसा चुंबक लोहा साह्य । दाहक अग्नी व्यापी बाह्य ।
तैसा अंतर खेळे बाह्य । तैसा अंतर खेळे बाह्य । व्यतिरेक अन्वयें ॥२॥
काई गे ! बोलूं काई गे ! । क्रियाचि न दिसे आतां कांहीं गे ! ॥ध्रुवपद.॥
पूर्ण पाहतां ऐसें त्यास । नेलें पाहण्यानें पाहल्यास ।
सर्व विसरलें कृत्यास । पूर्ण शिवरामीं पाहीं ॥३॥

पद ३ रें
निजीं निज लागलि मज माये ! ।
स्मरणाचा आठव तोहि नोहे नोहे ॥ध्रुवपद.॥
जागृति स्वप्न सुषुप्ति हरपली ।
तूर्या तेथें विरोनियां गेली ॥निजीं०॥१॥
ब्रह्माविष्णुहरिहरादिक मूर्ती ।
मजमाजी स्मरोनि उठताती ॥निजीं०॥२॥
पूर्णानंदीं मी सहज निजों गेल्यें ।
शिवरामीं उठोंचि विसरल्यें ॥निजीं०॥३॥

पद ४ थें
चरणपल्लवीं ठेविं दयाळा ! ॥ध्रुवपद.॥
चरणपल्लवीं ठेविं मज हरी ! । मरण महाभय दूर निवारी ॥चरण०॥१॥
भाग्यबळें बहुतां दिवसां मन । पाहिन म्हणतें तुज गोपाळा ! ॥चरण०॥२॥
हृदय जाणत्या काय मी चोरूं ? । क्षमा करीं अपराध दयाळा ! ॥चरण०॥३॥
पूर्ण गुरू शिवराम दयाळा ! । अखंड गातो तव गुणमाला ॥चरण०॥४॥

पद ५ वें
कटिं कर ठेवुनि विठो ! काय मौज पहासी ? ।
हांसति आम्हांसि लोक हे तुझे निवासी ॥ध्रुवपद.॥
सिंहाचे बाळकासि गांजिताति कोल्हीं । हे लाज कोणा आली ? ।
पतितपावन दिनानाथ ब्रीद प्रतिपाळीं ॥कटिं कर०॥१॥
हरिणी वनीं पाडसासि मोकलोनि जाये । मग ल्यासी गती काये ? ।
पक्षिणिचीं पिलें स्मरति तेंवि तुतें बाहें ॥कटिं कर०॥२॥
तूंचि बंधु तूंचि बहिण तूंचि तातमाता । तुजवीण कोण त्राता ? ।
शिवराम पुंडलिक वरद गणेशनाथा ॥कटिं कर०॥३॥

पद ६ वें
नेघें रे ! जन्मा नेघें रे ! जन्मा नेघें रे ! ॥ध्रुवपद.॥
जननीतें गरोदर । कफदुर्गंधी विवर ।
तप्त जननीजठर । माजी उकाडा होये ॥नेघें रे०॥१॥
जंतुकिडियांचा सुकाळ । तोडिताती अंतरमाळ ।
वरि वरि जठराग्नीचा ज्वाळ । वाहे नवमासवरी ॥नेघें रे०॥२॥
वरि वरि होतां श्वासोच्छ्वास । नाहीं तिळभरी अवकाश ।
ऐसा यातनेचा त्रास । पूर्ण शिवराम पाहीं ॥नेघें रे०॥३॥

पद ७ वें
आत्मा अनुभवी योगियां रे ! भय कासयाचें ? ॥ध्रुवपद.॥
देहे अहंभाव त्यागें । मृत्यु सारोनिया आंगें ।
देव आपणचि झालिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥१॥
योग कर्माकर्म गाळी । ज्ञान संशयातें टाळी ।
आपुले ठायां आलिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥२॥
पूर्णानंद पूर्णपणीं । दुजयातें दृष्टी नाणी ।
शिवरामचि होउनि ठेलिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥३॥

पद ८ वें
सांवळा श्रीघनश्याम श्याम चला पाहूं ।
काम धाम त्यजूनियां रामपदीं राहूं ॥ध्रुवपद.॥
स्वस्थ माझे मस्तकीं हस्तकक्षी ठेवी ।
उदय अस्तरहितवस्तु प्रस्तुतची दावी ॥सांवळा०॥१॥
वासवादिपदा नाश वासनावियोगें ।
श्रीनिवासदेवपदीं वास करूं अंगें ॥सांवळा०॥२॥
त्यजुनि छंद करुनि मंद कर्ण वृंद काम ।
पूर्णानंद आनंदकंद भजूं शिवरामा ॥सांवळा०॥३॥

पद ९ वें
गुरुच्या उपकारा उपकारा । नाहीं पारावारा ॥ध्रुवपद.॥
देउनि आपुला डोळा । डोळा दाखविला घननीळा ॥गुरुच्या०॥१॥
देउनि आपुली दृष्टी । दृष्टी दाखविली निजसृष्टी ॥गुरुच्या०॥२॥
जिकडे पाहे तिकडे । अवघें ब्रह्मचि बहसे उघडें ॥गुरुच्या०॥३॥
स्वरूप नयनीं जडलें । डोळस शिवरामासी केलें ॥गुरुच्या०॥४॥

पद १० वें
गुंग मला केलें, गुरुनें गुंग मला केलें ।
येकायेकीं भुरळ घालुनि मीपण माझें नेलें ॥ध्रुवपद.॥
वहिल्या देशीं पावक आला काय चेटक केलें ? ।
वागुं काणुं सांगुन त्याणें उलटें चालविलें ॥गुंग मला०॥१॥
जातां जातां नवल जाहलें मन पांगुळलें ।
नामातीत पुरुष त्याचें दर्शन तें झालें ॥गुंग मला०॥२॥
गपकन अंधार पडला बाई ! झपकन उजाडलें ।
चंद्रसूर्य नसतां तेथें तेज प्रकाशलें ॥गुंग मला०॥३॥
अर्धचंद्र अमृत बाई ! पिउनियां धालें ।
ब्रह्मानंद शिवरामीं जन्ममरण चुकवीलें ॥गुंग मला०॥४॥

पद ११ वें
संत दयाळ कसे ? । राजा रंक जया सरिसे ॥ध्रुवपद.॥
देउनि भेटी तोडिति माया । नेउनि दाविती निजपदठाया ॥संत०॥१॥
श्रवणीं पाजुनि अमृतवाणी । नेउनि दाविती चिन्मयखणी ॥संत०॥२॥
शिवरामाचें अभिनव लेणें । लेवविलें मज पूर्ण कृपेनें ॥संत०॥३॥

पद १२ वें
तेचि गत बाई  ! आचार तिचे ठायीं ।
जाणिवेचा बोल आंगीं येऊं दिला नाहीं ॥ध्रुवपद.॥
सत्कर्माचा सडा बरा घालुनियां द्वारीं ।
माजघरची वोज बरी दावि लोकाचारी ॥तेचि०॥१॥
निष्कामाचे चहुंकोनीं सारविलें घर ।
सुरंग रंग रंगमाळ घाली निरंतर ॥तेचि०॥२॥
घवघवित प्रेमकुंकूं लावुनियां भाळीं ।
पूर्णानंदीं शिवरामीं विचरे वेल्हाळी ॥तेचि०॥३॥

( पान नं. १८१ वरील पदे. )

पद १३ वें
तोचि गेला पाहिं रे ! । ज्या रामीं दृष्टि नाहिं रे ! ।
रामीं आरामल्या मग तया कैंचें काय रे ! ॥ध्रुवपद.॥
मातीमाजी घट रे ! । तंतूमाजी पट रे ! ।
मातीतंतू निर्धारितां कैंची खटपट रे ! ॥तोचि०॥१॥
हेमीं अलंकार रे ! । पाण्याची ती गार रे ! ।
हेमपाणी पाहों जातां कैंचा तो आकार रे ! ॥तोचि०॥२॥
मिथ्या भवबंध रे ! । नामरूप द्वंद्व रे ! ।
शिवरामीं पाहों जातां अवघा पूर्णानंद रे ! ॥तोचि०॥३॥

पद १४ वें
प्रीति धरीं हरिपायीं । मना रे ! ॥ध्रुवपद.॥
या नरदेहीं सार्थक हेंचि । संतसमागमिं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥१॥
सारासारविचार करोनी । ब्रह्म सनातन होईं । मना रे ! ॥प्रीति०॥२॥
धाला धाला बोध निमाला । शिवरामचरणीं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥३॥

पद १५ वें
कपींद्रा ! सुखी असे कीं प्राणसखी सीता । जनकदुहिता ॥ध्रुवपद.॥
नवनीतापरि अतिकोमळ तनु । गिळिलि न कीं पिशिता - । शनानें ॥सुखी०॥१॥
विरह सतीला पळही न सोसे । झालासे कशिता । विधाता ॥सुखी०॥२॥
धन्य मित्र तूं या दोघांतें । झालासे पुशिता । नेत्रजळ ॥सुखी०॥३॥
शिवरामासी कधीं भेटसी । करीतसे प्रणिता । निशिदिनीं ॥सुखी०॥४॥

पद १६ वें
देवचि मानव तो । न मनीं केवळ दानव तो ॥ध्रुवपद.॥
मी माझें हें नेणे स्वप्नीं । सुखदुःखेंविण खेळें भुवनीं ॥देवचि०॥१॥
इच्छामात्र पदार्थीं नाहीं । कर्म तयाप्रति बाधिल कायी ॥देवचि०॥२॥
वृत्तिरहित व्यवहार जयाचा । पूर्णशिशू शिवराम तयाचा ॥देवचि०॥३॥

पद १७ वें
निवालों निजसुखें या या महाराजांचे पायीं ।
येथुनी मागुती आह्मां फिरणेंचि नाहीं ॥ध्रुवपद.॥
सप्रेम येऊनि येथें करीतसे थारा ।
तात्काळ तोडिला चहूं देहांचा उभारा ।
कृपायुक्त ठेवितां तेणें मस्तकिं अभयकरा ।
कैशा खुंटुनि गेल्या नाना जन्म येरझारा ॥निवालों०॥१॥
पुष्टी झाली कैशी अपुल्या आनंदें मी धालों ।
अंगोंअंगीं उतती गगनीं न माय ऐसा झालों ।
परेच्या ऊपरी मौन ग्रासुनीयां गेलों ।
शब्दचि पारूषला आतां काय ह्मणोनि बोलों ॥निवालों०॥२॥
असो हें बोलणें फळलें सद्गुरूचें पायीं ।
जिवशिव हा यावरूनि आतां ओवाळीन बाई ! ।
जिवशिव न दिसे कांहीं, तरि म्यां कुरवंडावें कायी ? ।
शिवरामीं तटस्त पूर्णानंदीं निज राहोही ॥निवालों०॥३॥

पद १८ वें
जीवगांठी समुळ छेदुनीयां । उभा कैसा सन्मुख येउनीयां ॥ध्रुवपद.॥
कवण भाग्य न कळे मज माझें । दिल्ही भेटी दयाल गुरुराजें ॥जी०॥१॥
दृश्य देखणें सर्व हिरुनि नेलें । मन माझें संकल्पशून्य केलें ॥जी०॥२॥
स्फुरणाची मोडलि सर्व वाट । शिवरामीं शिव राम असें दाट ॥जी०॥३॥

पद १९ वें
ऐसा नवस वृत्तिसि होता बाई ! ।
आजि फळला या सद्गुरूच्या पायीं ॥ध्रुवपद.॥
सद्गुरुतीर्थीं सप्रेमभावें न्हाऊं ।
सर्व तेणें चित्ताचा मळ धूऊं ।
अंतरिं बरवें सहजात्मरूप पाहूं ।
पाहाण्यामाजी सुख तेंचि होउनि राहूं ॥ऐसा०॥१॥
सर्वां भूतीं श्रीराम यावा भेटी ।
उघडुनियां भक्तीची भूषणपेटी ।
लेणें लेतां पावे न शोभा मोठी ।
स्वामी अपुला कवळी न दृढ पोटीं ॥ऐसा०॥२॥
मग मी त्यासीं बोलेन कांहीं गूज ।
त्याच्या सेजेसि घेइन मी नीज ।
पूर्ण सुखें स्मरेन मी हो मज ।
शिवरामीं इतकेंचि माझें काज ॥ऐसा०॥३॥

पद २० वें
महाराजा सद्गुरु मायबापा ! । तुझ्या संगें संसार गमे सोपा ॥ध्रुवपद.॥
तुझा हस्त धरूनि जातां वाटे । पदोपदीं समाधिसुख दाटे ॥महा०॥१॥
प्रबोधाची देखोनि जीव वाढी । देहबुद्धिधाकेंचि प्राण सोडी ॥महा०॥२॥
शिवरामीं लागला तुझा छंद । प्रगटला सबाह्य पूर्णानंद ॥महा०॥३॥

पद २१ वें
तुझे पाय तारक दीनबंधू । कवळोनि तरेल भवसिंधू ॥ध्रुवपद.॥
प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही तीर । मायामोहें भरूनि वाहे नीर ॥तु०॥१॥
अहंकाराच्या आदळती लाटा । बळें नेताती आपुलिया वाटा ॥तु०॥२॥
शिवरामीं हा धाक होता फार । पूर्णानंदीं पावलों पैल पार ॥तु०॥३॥

पद २२ वें
धन्य दिवस आजि वर्णूं काय ।
संतांचें पाय देखिलिया सन्मुख माय ॥ध्रुवपद.॥
आळशावरी जैशी वाहे गंगा । त्रितापभंगा ।
तैसे तुम्हीं उद्धरिलें जगा । दर्शनें कीं गा ! ॥धन्य०॥१॥
सकळ हीं मंगळें आजि जाहलीं । व्रतें तपें घडलीं ।
सकळही तीर्थस्नानें केलीं । पातकें गेलीं ॥धन्य०॥२॥
एका शिवरामासि धन्य झाला । वर्णवे न बोला ।
पूर्व संचित ठेवा फळासि आला । सत्संग घडला ॥धन्य०॥३॥

पद २३ वें
देवचि तो नर कीं तो नर कीं । न मनीं त्यासि गति नरकीं ॥ध्रुवपद.॥
मी माझें नेणें स्वप्नीं । सुखदुःखाविण खेळे भवनीं ॥देव०॥१॥
इच्छा पदार्थमात्रीं नाहीं । चित्त सदा चिन्मात्रीं ॥देव०॥२॥
वृत्तिविना व्यवहार जयाचा । पूर्ण शिष्य शिवराम तयाचा ॥देव०॥३॥

पद २४ वें
हुकूम साहेबका । हम तो चोपदार बांका ॥ध्रुवपद.॥
ब्रह्माविष्णुमहेशा । प्रभुका अवतार खासा ॥हुकूम०॥१॥
दशचारोपर सत्ता । ब्रह्मा सत्यलोकका दाता ॥हुकूम०॥२॥
पूर्णगुरू शिवराम बंदा । बंदगी करले येखादा ॥हुकूम०॥३॥

पद २५ वें
बंदे ! क्यौं भूला क्यौं भूला ? आखर खावेगा झोला ॥ध्रुवपद.॥
कवडीकवडी माया जोडी । आखर जावेगा खूला ॥बंदे०॥१॥
भाई बहिन जोरू लरके । कोन किसीका साला ॥बंदे०॥२॥
शिवराम कहे समाल बंदे । कर साहेबसों सल्ला ॥बंदे०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP