मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
गुरुदासकृत पद

गुरुदासकृत पद

अनेककविकृत पदें.


नटवर नट नागर, अतिसुंदर, अधरिं धरूनि वाजवी पावा ।
तो माधव बहुतचि बरवा ॥ध्रुवपद.॥
ठेउनि देहुडा पाये, उगडा उभा ग माय, पाहे दुरून अवलोकून ।
कसी केली वाकडी मान ॥
सांवळी सुरत बरि, कवळी साजरी, तनु ज्याची श्यामवर्ण ।
दोन्ही डोळे आकर्ण ॥
सुंदर त्रिवली पोट, पोवळ्यासारिखे होट, मंदस्मित हास्यवदन ।
पाहतां निवती नयन ॥
चाल ॥ किरीट कुंडल वनमाळा हो ! ।
कांसे पितांबर पिवळा हो ! ।
कटीं शोभत असे मेखळा हो ! ।
भाळीं केशरिचा टीळा हो ! ।
उठाव ॥ पायिंचीं भूषणें, वाकि बाळी पैजन, खणणण गज चाले जेव्हां ।
रुणझुणझुण वाजति तेव्हां ॥नटवर०॥१॥
वाजवि सुंदर मंद मधुर मुरली सप्तस्वर अतिस्वानंदें ।
तों नादें अंबर कोंदे ॥
करितां गायन डोले आपण डोलि थैथै नाचे प्रभु स्वानंदें ।
हरी घागुरियाचे छंदें ॥
हाव भाव दाव धरूनि ताल थकथक तोडितो गोविंदे ।
डोले शिव ब्रह्मानंदें ॥
चाल ॥ झाले मनिं लज्जित गंधर्व हो ! ।
नारद तुंबर हे सर्व हो ! ।
ह्मणती गायन अपूर्व हो ! ॥
हरिला सर्वांचा गर्व हो ! ॥
उठाव ॥ नकळे तयाचे गुण कळा तो सकळकुळींचा कुळठेवा ।
हरि विश्वाचा विसावा ॥नटवर०॥२॥
मदनमोहन घनश्याम सुंदर हरि हातीं घेवोनी काठी ।
उभा कालिंदीतटीं ॥
पांघरुनि घोंगडी काळी बरी साजरी धांवत असे धेनुपाठीं ।
पळती गाई आव्हाटी ॥
वळुनि गाई सार्‍या बर्‍या आपण मग सांगे गोपाळां गोष्टी ।
बाप माझा जगजेठी ॥
चाल ॥ नकळे कीं ज्याचा महिमा ।
पार अगमा निगमा ।
शिणला चातुरमुख ब्रह्मा ।
तो भुलला भक्तिप्रेमा ॥
उठाव ॥ गुरुदास म्हणे नकळे माव तुझी धाव पाव उद्धरिं देवा ! ।
येऊं द्यावी माझी कणवा ॥नटवर०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP