मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
मध्वनाथस्वामिकृत पदें

मध्वनाथस्वामिकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
गोविंदा रामा येईं रे ! । गोपाळा रामा येईं रे ! ॥ध्रुवपद.॥
दुर्जन मारुनि अर्जुन सारथी, होउनि धरिशी दोरे ।
तुरंग तेव्हां नाचति जेव्हां करिशी हो रे ! हो रे ! ॥गोविंदा०॥१॥
भक्तवत्सल ह्मणविशि देवा, शबरिचीं खाशी बोरें ।
गवळ्याघरीं वत्सएं रक्षिसि मिळवुनि लहानपोरें ॥गोविंदा०॥२॥
अंबर्षीकार्यास्तव धरिशी, दशावतारफेरे ।
जळचरवनचर रूप दावुनि उरलें दर्शन देइं रे ! ॥गोविंदा०॥३॥
दीनदयाळ मां परिपालय, कालियशशाकिशोरे ! ।
मध्वनाथ ह्मणे तो चुकवीतो, चौर्‍यांशींचे फेरे ॥गोविंदा०॥४॥

पद २ रें
जिवलग मायबाप विठोबा मज तारीं पांडुरंगा रे ! ॥ध्रुवपद.॥
नटलों नाहीं कीर्तनरंगीं घेउनि तालमृदंगा रे ! ।
विटलों नामस्मरणीं हरिच्या घालुनि वीट पलंगा रे ! ॥जिवलग०॥१॥
खाउनि जेवुनि विड्या सेवुनी पानसुपारी लवंगा रे ! ।
भुललों शृंगारादी सेवुनि अंगनेच्या रंगा रे ! ॥जिवलग०॥२॥
अरविंदाच्या मकरंदाची आवडि जैशी भृंगा रे ! ।
दीपकलीका आलंगीतां नकळे मरण पतंगा रे ! ॥जिवलग०॥३॥
संसाराच्या पायीं तो अवघा धांगडधिंगा रे ! ।
म्हणोनि शरण तुज या चरणा सोडुनि सर्वहि संगा रे ! ॥जिवलग०॥४॥
गंगास्नान करुनी येइ लिंग भंगा रे ! ।
मध्वमुनेश्वर याची भावें पूजी ज्योतिर्लिंगा रे ! ॥जिवलग०॥५॥

पद ३ रें
दयानिधे गोविंदा रामा ! ॥ध्रुवपद.॥
विकसति इंदिवरदललोचन कलिमलमोचन पावननामा ॥दया०॥१॥
गोवर्धनोद्धर दीनजनोद्धर मदनमनोहर मेघश्यामा ! ॥दया०॥२॥
मध्वमुने(नी)श्वरवरद परात्पर ब्रह्म सदोदित निजसुखधामा ! ॥दया०॥३॥

पद ४ थें
नरहरि ! थांब पाव रे ! । राजीवनयन राघवा रामा ! ॥ध्रुवपद.॥
तुजविण मला आतां कोणचि तारी ? । तारक हरि ! तूं आम्हां ॥पाव रे !०॥१॥
मी बुडतों भवसागरडोहीं । नेउनि पार आह्मां ॥पाव रे !०॥२॥
मध्वमुनी(नी)श्वर प्रार्थितसे तुज । आठवुनियां तुझ्या नामा ॥पाव रे !०॥३॥

पद ५ वें
हरिकीर्तन ऐका । काय ह्मणावें लोकां ? ॥ध्रुवपद.॥
सगुणचरित्रें ऐकुनि साधू । गेले परलोका ॥हरि०॥१॥
व्यर्थ जना ! तुम्हि कळिकाळाचा । मानितसां धोका ॥हरि०॥२॥
मध्वनाथा भवसिंधु तराया । सांपडली नौका ॥हरि०॥३॥

पद ६ वें
संतसंगे अंतररंगें नाम बोलावें ।
कीर्तनरंगीं देवासंनिध सुखें डोलावें ॥ध्रुवपद.॥
सगुणचरित्रें परमपवित्रें सादर परिसावीं ।
निराभिमानें संतवृंदें आधीं वंदावीं ॥संतसंगें०॥१॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कळाव्या ।
मनोभावें वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥संतसंगें०॥२॥
श्रवणें मननें नामघोषें वाजवि करताळी ।
मध्वनाथ जीवन्मुक्त होये तत्काळीं ॥संतसंगें०॥३॥

पद ७ वें
सद्गुरु मायबहिणी ! । माझे सासुचे विहिणी गे ! ।
परिसा मंगळदायका अभिनव एक काहाणी गे ! ।
कोठें नाहिं देखिली कोणी ऐसी हाणी गे ! ।
तिहीं त्रिभुवनिं नाहीं तुज ऐशी शाहाणी गे ! ॥सद्गुरु०॥१॥
सद्गुरुकाया पुरी देखिली दोघें भाऊ गे ! ।
दंडीं त्याचे ताइत सोनियाचा डाऊ गे ! ।
दळितां कांडितां त्याजवर ओंव्या गाऊं गे ! ।
टिपरि खेळ खेळितां पंढरिला जाऊं गे ! ॥सद्गुरु०॥२॥
सद्गुरुविद्या विद्या ह्मणती दोघी जणि जाया गे ! ।
धाकुटिसि नावडे वडिल आपुला भाऊ गे ! ।
परस्परें अबोल्याचा चालविती दावा गे ! ।
जळो इचा स्वभाव बाई ! तुजही आहे ठावा गे ! ॥सद्गुरु०॥३॥
सद्गुरु वडिल भाऊ ह्मणवी तो उदासी जोगी गे ! ।
धाकुटा देखिला तो कर्मफळें भोगी गे ! ।
कर्मफळें भोगितां झाला क्षयरोगी गे ! ।
याला कशा भाळतील राजकन्या चौगी ( घी ) गे ! ॥सद्गुरु०॥४॥
सद्गुरु जैसा नाच नाचवी तैसा मेळा नाचे गे ! ।
माझें माझें म्हणतां घाव आंगीं लागे गे ! ।
वडिलाचें नांव कधीं यत नाहीं वाचे गे ! ।
आंगावरि वोझें पडतां आतां कैसा वांचे गे ! ॥सद्गुरु०॥५॥
वडील भाऊ त्याचें कधीं घेइना हा नांव गे ! ।
याचा त्याचा सरकतीचा आहे एक गांव गे ! ।
त्याही गांवामध्यें बाई एक धरा ठाव गे ! ।
त्याही ठावामध्यें याचा पडतो उणा डाव गे ! ॥सद्गुरु०॥६॥
सद्गुरुवडिलाची समबुद्धि सांगूं आतां कैशी गे ! ।
एका देतो गाई घोडे बैल आम्हां ह्मैशी गे ! ।
संतति संपति सुंदर वनिता दासी गे ! ।
एक आपुल्या पोटासाठीं लोकां दांत वासी गे ! ॥सद्गुरु०॥७॥
सद्गुरु महाद्वारीं गरुडपारीं घालूं ऐसा बार गे ! ।
पुंदलिक भाई माझा गौरविला फार गे ! ।
माझ्या गळ्यांत घालिल बाई चिद्रत्नांचा हार गे ! ।
मध्वनाथ शरण आतां मागे चरणीं थारा गे ! ॥सद्गुरु०॥८॥

पद ८ वें
जीवन पंढरिराय । माझें ॥ध्रुवपद.॥
कटिं कर ठेवुनी नीटचि उभा । जोडुनियां सम पाय ॥माझें०॥१॥
भीमातीरीं कीर्तनिं नाचे । सज्जन वंदिती पाय ॥माझें०॥२॥
मध्वमुने(नी)श्वर जोडुनी पाणी । घेत अलाय बलाय ॥माझें०॥३॥

पद ९ वें
चिंता सर्वांची हरीला दुश्चित कां रे ! उगला. ॥ध्रुवपद.॥
पक्षिया पदरीं संचय कैंचा । चारा पुरवी त्याला ॥चिंता०॥१॥
पाषाणापोटीं दर्दुर राहे । तेथें जिववी त्याला ॥चिंता०॥२॥
सिंहाचा बहु आहार जाणुनी । कुंजर निर्मी त्याला ॥चिंता०॥३॥
मध्वमुने(नी)श्वर ह्मणतो सखया ! । कधीं नुपेक्षी भक्तांला ॥चिंता०॥४॥

पद १० वें
हरिची मला लागली गोडी ॥ध्रुवपद.॥
सुंदर रूप पाहूनी डोळां । जालें मी वेडी ॥हरिची०॥१॥
गृह धन आशा सर्वहि त्यजुनी । कृष्णपदीं जोडी ॥हरिची०॥२॥
मध्वमुने(नी)श्वर स्वामी दयाघन । चरणसरोज न सोडी ॥।हरिची०॥३॥

पद ११ वें
काय करावा योग ? । साजणी ! ॥ध्रुवपद.॥
यादवरायें कागद लिहिला । केव्हढा आमचा भोग ॥साजणी०॥१॥
रेचक पूरक कुंभक करितां । आंगीं जडतो रोग ॥साजणी०॥२॥
मध्वमुने(नी)श्वर ह्मणतो याचा । कोणाला उपयोग ? ॥साजणी०॥३॥

पद १२ वें
उद्धवा ! शांतवन कर जा त्या गोकुलवासि जनांचें ॥ध्रुवपद.॥
बा ! नंद यशोदा माता, मजसाठीं त्यजितिल प्राण ।
त्यागुनी प्रपंचा फिरती, मनिं उदास रानोरान ।
अन्नपाणि त्यजिलें, रडती, अतिदुःखित झाले दीन ॥
चाल ॥ जन्मलों तैंहुनी झटले ।
मजलागीं तिळतिळ तुटले ।
कटि खांदे वाहतां घटले ।
चाल पहिली ॥ आटलें रक्त देहाचें ॥उद्धवा०॥१॥
आइबाप त्यजुनी बाळें मजसंगें खेळत होतीं ।
गोडशा शिदोर्‍या आणुनी, आवडिनें मजला देती ।
रात्रंदिस फिरले मागें, दधिगोरस चोरूं येती ॥
चाल ॥ मी तोडुनि आलों तटका ।
तो जिवा लागला चटका ।
मजविण त्या युगसम घटका ।
चाल पहिली ॥ आठवतें प्रेम जयांचें ॥उद्धवा०॥२॥
पतिसुताहि गृहधन त्यजिले, मजवरती धरुनी ममता ।
मानिलें तुच्छ अपवर्गा, मजसंगें निश्चळ रमतां ।
मद्दत्तचित्त त्या गोपी, नेत्रांतरिं लेवुनि समता ॥
चाल ॥ तिळतुल्य नाहिं मनिं डगल्या ।
दृढ निश्चय धरुनी तगल्या ।
बहुधा त्य अनसतिल जगल्या ।
चाल पहिली ॥ भंगले मनोरथ ज्यांचे ॥उद्धवा०॥३॥
हरि आहे सुखरूप म्हणुनी, भेटतांचि त्यां सांगावें ।
सांग कीं समस्तां पुशिलें, प्रत्युत्तर त्यां मागावें ।
करुनियां ज्ञान तयांतें, सांग कीं शोक त्यजावे ॥
चाल ॥ हें कार्य नव्हे तुजजोगें ।
मजसाठिं जावें वेगें ।
हें मध्वमुनीश्वर सांगे ।
चाल पहिली ॥ त्या नपवे ज्ञान जयाचें ॥उद्धवा०॥४॥

पद १३ वें
चिंतावा रघुवीर । प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
नासिक त्रिंबक रूप मनोहर । पावन गंगातीर ॥प्राण्या०॥१॥
पंचवटीमधें पर्णकुटी करी । सेवुनि राहें नीर ॥प्राण्या०॥२॥
लौकिक लज्जा सांडुनि अवघी । पांघरें भगवें चीर ॥प्राण्या०॥३॥
मधुर हरीच्या नामाविरहित । न रुचे साकर क्षीर ॥प्राण्या०॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो येथें । चित्त करावें स्थीर ॥प्राण्या०॥५॥

पद १४ वें
दशरथनंदन बाळ सीते ! । याला घालीं माळ ॥ध्रुवपद.॥
मदनमनोहर रूप जयाचें । दानवकुळिंचा काळ ॥सीते०॥१॥
रामसखा हा मन्मथपुतळा । दिसतो सुंदर बाल ॥सीते०॥२॥
काळा डोंगर अंतरिं ओंगळ । रावण हा फटकाळ ॥सीते०॥३॥
मध्वमुनीश्वर स्वामि रमापति । करिल तुझा प्रतिपाळ ॥सीते०॥४॥

पद १५ वें
अचडें बछडें छकुडें । माझें ॥ध्रुवपद.॥
विकसितपंकजलोचन ज्याचें । जननि म्हणे हें चिपडें ॥माझें०॥१॥
त्रिभुवनपाळक बाळक त्याला । पांघुरविति घोंगडें ॥माझें०॥२॥
आंगणिं रांगत मंजुळ बोलत । सोन्याचें टिकडें ॥माझें०॥३॥
मध्वमुने(नी?)श्वर खेळवि अंकीं । ब्रह्मसनातन उघडें ॥माझें०॥४॥

पद १६ वें
निजलिस काय गे ! । होय जागि तमाखू खाय गे ! ॥ध्रुवपद.॥
चंचिंत नाहिं तरि बटव्यांत पाहिं गे ! । बटव्यांत नाहिं तरि गाडग्यांत पाहिं गे ! ।
गाडग्यांत नाहिं तरि फडक्यांत पाहिं गे ! ॥निजलिस०॥१॥
तमाखु आणुन करतेस काय गे ! । माझे कोइंत चुन्याच नाहिं गे ! ।
रात्रीं मजला झोंपचि नाहिं गे ! ॥निजलिस०॥२॥
पहांटेस उठून शेतांत जाईं गे ! । वांयशी पदरीं घेउन येईं गे ! ।
वांयशी मध्वनाथाला देईं गे ! ॥निजलिस०॥३॥

पद १७ वें
रामकथारस पी पी पी । प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
रामकथारस सेविसि जरि तूं । काळ करिल मग जी जी जी ॥प्राण्या०॥१॥
संतति संपत्ति जाय जिणें मग । मीपण धरिसी हे छी छी छी ॥प्राण्या०॥२॥
मध्वमुने(नी)श्वर सांगतसे तुज । दुष्टजनाप्रति भी भी भी ॥प्राण्या०॥३॥

पद १८ वें
लोभ हरीचा लटका । गे बाई ! ॥ध्रुवपद.॥
अक्रूर आला घेउनि गेला । काळजाचा कुटका ॥गे बाई !०॥१॥
उद्धव शाहाआण घेउनि आला । कागदाचा कुटका ॥गे बाई !०॥२॥
कुब्जा दासी केली पटराणी । कैशी होइल सुटका ॥गे बाई !०॥३॥
मध्वमुने(नी)श्वर स्वामि रमापति । तोडुनि गेला तुटका ॥गे बाई !०॥४॥

पद १९ वें
मनमोहन वाजवि वेणू रे ! ॥ध्रुवपद.॥
कुंजवनीं ध्वनि ऐकुनि कानीं । मोहित झाल्या धेनू रे ! ॥मन०॥१॥
रंजविल्या व्रजसुंदरि सर्वहि । पार तयाचा नेणूं रे ! ॥मन०॥२॥
कल्पद्रुमातळिं मध्वमुने(नी)श्वर । वंदि पदांबुजरेणू रे ! ॥मन०॥३॥

पद २० वें
याचें हातींचा वेणु कुणीं घ्या गे ! ॥ध्रुवपद.॥
गृहीं आपल्या मी करित होत्यें धंदा । वेणु वाजविला नंदाचिया नंदा ।
तल्लिन झाल्यें या मुरलिच्या नादा नादा ॥याचे०॥१॥
याचा नवलावा सांगुं मी काई ? । चित्तप्रवृत्ती वेधिलि याणें बाई !।
संसृतीसी ठाव उरला नाहीं नाहीं ॥याचे०॥२॥
गृहीं सासुरवास मला भारी । जावा नणंदा गांजिति परोपरी ।
याचे वेणूनें ठकविल्या कि पोरी पोरी ॥याचे०॥३॥
तान्हें बाळक टाकुनि आल्यें घरा । गृहीं सासू सासरा म्हातारा ।
ल्याणें केला या जीविंचा कि वारा वारा ॥याचे०॥४॥
वेणु नोहे हें विष मला वाटे । नाद ऐकोनि काम हृदयीं दाटे ।
मध्वनाथाचे हृदयीं मूर्ति भेटे भेटे ॥याचे०॥५॥

पद २१ वें
मनमोहन यादवराया रे ! ॥ध्रुवपद.॥
वामन होउनि दान तूं मागसी । लहान मानवी काया रे ! ॥मन०॥१॥
दंड कमंडलु मंडितसे तनु । पूजितसे नृपजाया रे ! ॥मन०॥२॥
यमुनाजळामाजी खेळ तुं खेळसी । चेटकि नाटकि माया रे ! ॥मन०॥३॥
कीर्ति सदोदित मध्वमुने(नी)श्वर । मागतसे गुण गाया रे ! ॥मन०॥४॥

पद २२ वें
तो नर गति चुकला गति चुकला । स्वानंदातें मुकला. ॥ध्रुवपद.॥
सद्गुरुवरदा वाणी । नाहीं नाहीं ज्याचे श्रवणीं ॥तो नर०॥१॥
शास्त्रें पाहुनि वक्ता । बोलत फार अनुभव नसतां ॥तो नर०॥२॥
धर्मवासना कांहीं । ज्याचे मानसिं तिळभर नाहीं ॥तो नर०॥३॥
संतसंग हरिभक्ती । क्षणभरि नये मनांत विरक्ती ॥तो नर०॥४॥
मध्वनाथ म्हणे भाव । सद्गुरुवांचुनि कैंचा देव ? ॥तो नर०॥५॥

पद २३ वें
दत्तात्रय चतुराक्षरि मंत्र संतसख्यापासीं ।
शरण रिघोनि जरि घे तरि तुज नित्य घडे काशी ॥ध्रुवपद.॥
दर्पण दाविति संत समर्थ कीं तें त्वंपद ।
दगड पुजावे नलगे कांहीं सहज सुखानंद ।
दरवाजे नव बंध करावे हा मिथ्या वाद ।
दम शम केल्या दर्शन देतो स्वामी अभेद ॥दत्तात्रय०॥१॥
तारक विश्व कदंबा पाहतां मग कैंची अहंता ।
ताठा सरला जाणिव झाली सहज आली लीनता ।
तामस हा गुण सहज निमाला मनिं आली समता ।
तांडव करणें नलगे कांहीं अवघी गुरुसत्ता ॥दत्तात्रय०॥२॥
तृणपाणी सर्वांभूतीं भरला एकचि पवित्र ।
त्रैलोक्यींचें मंडण स्वामी केवळ सत्पात्र ।
त्रिगुणरहित निरंतर ध्यान परम पवित्र ।
त्रिपदा जप गायत्री करणें वेदाचें अत्र ॥दत्तात्रय०॥३॥
यत्र भूमंडळ उभारिलें हें जोडाक्षरु मायें ।
एकचि असतां द्विविधा झाली साम्या ते काये ।
येणें जाणें नलगे कांहीं अपाय उपाय ।
एकचि मध्वनाथ वंदी सद्गुरुचे पाय ॥दत्तात्रय०॥४॥

पद २४ वें
तूं माझा यजमान । रामा ! ॥ध्रुवपद.॥
जननीजठरीं रक्षियलें मज । पोसुनि पंचहि प्राण ॥रामा०॥१॥
बाहेर निघतां मातेचे स्तनीं । पय केलें निर्माण ॥रामा०॥२॥
इतर जनाची गणना नाहीं । दृढ आमुचा अभिमान ॥रामा०॥३॥
ऐसें असतां या पोटाची । व्यर्थचि चिंता जाण ॥रामा०॥४॥
मध्वमुने(नी)श्वर स्वामि रमापति । धरि माझा अभिमान ॥रामा०॥५॥

पद २५ वें
अवघें जग ब्रह्म दिसे उघडें ॥ध्रुवपद.॥
एकचि माती बहु घटीं शोभे । रांजन परुळ सुघडें ॥अवघें०॥१॥
एकचि कापुस पेळू(?) तंतू । जोठ पागोटें लुगडें ॥अवघें०॥२॥
एकचि सोनें बहु नगीं शोभे । कंठ्य बाळ्या बुगडे ॥अवघें०॥३॥
मध्वमुने(नी)श्वरवरद परात्पर । सद्गुरुसेवा घडे ॥अवघें०॥४॥

पद २६ वें
जिवलग प्राण तूं प्राण । सख्या हरि ! ॥ध्रुवपद.॥
श्यामकोमल रूप तुझें हरी ! । चिद्रत्नांची खाण ॥सख्या०॥१॥
तुजविण आणिक कांहीं मी नेणें । श्रीहरि ! तुझी आण ॥सख्या०॥२॥
मध्वमुने(नी)श्वरहृदयविहारी । होशिल सर्व सुजाण ॥सख्या०॥३॥

पद २७ वें
दत्तराज महाराज बैसले औंदुबरतळवटीं ।
हातीं कमंडलु दंड कडासन बैसले कृष्णातटीं ॥ध्रुवपद.॥
स्वामीचा महिमा नेणवी नकळे ब्रह्मादिकां ।
यति संन्यासी येउनि वंदिति स्वामींच्या पादुका ॥
अनुसयेचे उदरिं जन्मले दत्तदिगंबर देखा ।
त्रीमूर्ति अवतार दत्त हा आहे जना ठाउका ॥
भोळ्या भाविकासि वळला भो(भ?) जनाचा हा सखा ।
भक्ती करितां मुक्ती देतो वैकुंठींच्या सुखा ॥
भावाचा भुकेला येउनि राहिला संगमतटीं ॥हातीं०॥१॥
नरहरिनामें प्रर्‍हादादिक तरले भोळेजण ।
नक्रगजेंद्रादिक उद्धरिले भोळे अवघेजण ॥
घडूं नये तें घडूनि आलें, कृपावळी परिपूर्ण ।
नमितां भावें वंदी स्त्रियांसी केली सुवासी कल्याणें ॥
ऐसी महिमा ऐकुनि तेथें नजीक आला धावुनि ।
कर जोडुनियां करितों विनंती स्वामिपदालागुनी ॥
त्यासि स्वामिनें निरोप देऊन पावन केला शेवटीं ॥हातीं०॥२॥
माघमासीं यात्रा येती स्वामींच्या दर्शना ।
स्नानदानधर्म आवडीनें करिती प्रदक्षिणा ॥
कोणी वाचिती पुस्तक कोणी करिति समाराधना ।
कोणी बांधिती पुजा कोणी ............॥
...................................................।
...................................................॥
मध्वनाथ म्हणे यांच्या पायीं घालावी मिठी ॥हातीं०॥३॥

पद २८ वें
कानु ! संबाल ले ! संबाल आपुल्या गाई ।
आम्हीं आपुल्या ले ! घलांसिं जातों भाई ! ॥ध्रुवपद.॥
काल गौली ले ! गौली गाय य्याली ।
तिचा खलुच ले लय लय गोल झाला ।
सगल्या गौल्यांला गौल्यांला लय दिला ।
मी गलीब ले ! म्हनून थोला दिला ।
आतां काम ले ! कलतो माजा......... ॥कानु०॥१॥
तुम्ही थोल ले ! पातलाचे लेकु ।
तुम्हांमध्यें ले ! मी गलीब आहें येकु ।
माजी कैसी ले ! तुम्हास आवय नाहीं ।
काय थांगु ले ! काते मोलले पायीं ।
तुझे काशेस ले ! पीतांबल पीवला ।
हात जोलितों ले ! मध्वनाथ भोला ॥कानु०॥२॥

पद २९ वें
भज मन  ! शंकर भोलानाथ ॥ध्रुवपद.॥
एकहि लोटाभर जल चाही । चावल बेलकि पात ॥भज०॥१॥
अर्धांगिं गौरी जटामें गंगा । महिमा बरनत जात ॥भज०॥२॥
बदे व्याघ्रांबर साई विश्वंभर । त्रिशूल पेहरत हाता ॥भज०॥३॥
आंग बभूत स्मशानमें खेलत । मध्वमुने(नी)श्वर सात ॥भज०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP