मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
माधवकविकृत पद

माधवकविकृत पद

अनेककविकृत पदें.


कौसल्या म्हणे बा रामा ! नको वना जाऊं जाऊं ।
माझीया रे ! तान्ह्या बाळा तुला कोठें पाहूं पाहूं ॥ध्रुवपद.॥
अयोध्या ही ओस पडली तुजविण आजि रामा ! ।
मला गमेना कीं कांहीं साधूमनविश्रमा ! ।
श्रावणारि मूर्च्छित पडला आग लागो तुझ्या कामा ।
किती तुझ्या मागें मागें कोठवरी धावूं धावूं ? ॥कौसल्या०॥१॥
हरणीचें पाडस वनीं चुकलें गे ! बाइ बाई ।
तैसें मन झालें रामा ! रडतें मी धाइधाई ।
नको आतां टाकुन जाऊं मजकडे पाहिं पाहीं ।
तुजसाठीं रामा ! आजी विष कीं मी घेऊं घेऊं ॥कौसल्या०॥२॥
स्तनीं फुटलासे पान्हा बाला ! जवळि येईं येईं ।
किती कष्टविशी मजला सुखीं गृहीं राहीं राहीं ।
त्यजूनियां राज्य ऐसें वनीं कांहीं नाहीं नाहीं ।
कैकयीचे सदनीं कैसी एकटी मी राहूं राहूं ॥कौसल्या०॥३॥
सीताहि स्वरूपानें अति सुकुमार खाणी ।
खडे रुततील तिजला वनीं माझे मायबहिणी ।
तृषाक्रांत झाल्या रामा ! उभा रहा पाज पाणी ।
चतुर्दश वर्षे दुःख कोठवरी साहूं साहू ॥कौसल्या०॥४॥
वनीं करी साऊलीये दिनकरकूळदीपा ! ।
सरोवर जवळीं ठेवीं वरुणा ! तूं मायबापा ! ।
पदोपदीं रक्षीं तान्ह्या नव्हे वनवास सोपा ।
निशीदिनीं माधव तुझे गुण सदा गाऊं गाऊं ॥कौसल्या०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP