आत्मारामकविकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
जे (जय?) शिवसांब त्रिपुरारी । असा तारक ना संसारीं. ॥ध्रुवपद.॥
धरीं सत्संग, त्यजीं दुःसंग, करीं अघभंग, गा तूं रे ! ।
कृपानिधीसा तो जाणोनी व .......संकटास तो हारी ॥जे शिव०॥१॥
धरीं विश्वास, करीं भवनाश, असे अविनाश, जगीं बा रे ! ।
किती अवतार घेउनी सदा दासांशि तो तारी ॥जे शिव०॥२॥
धरी शिरिं गंग, भूषण भुजंग, पदीं मन भंग, हो तूं रे ! ।
जगीं आत्माराम भावुनि.........म संकटाशि तो वारी ॥जे शिव०॥३॥
पद २ रें
सखया ! येईं उदारा रे ! । आजि नंदकुमारा रे ! ॥ध्रुवपद.॥
सदया ! तुझि हे कीर्ति पुराणीं । यमुनातीरविहारा रे ! ॥सखया०॥१॥
कालियफणिवर नाचे मनोहर । पदद्वय दावीं सुकुमारा रे ! ॥सखया०॥२॥
आत्मारामा मनविश्रामा ललितलीलाचि अपारा रे ! ॥सखया०॥३॥
पद ३ रें
सुखकर साधूसंग । प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥
क्षणभंगुर तनु जाणुनि हरिगुणीं । श्रवणीं कीर्तनीं रंग ॥प्राण्या०॥१॥
जाइजणें हें सर्वहि जाइल । रथगजधेनुतुरंग ॥प्राण्या०॥२॥
वस्त्रें भूषणें कैंचीं अंतीं । कोठें छपरपलंग ? ॥प्राण्या०॥३॥
आत्मारामबोध ठसावुनी । दृढतर राहें अभंग ॥प्राण्या०॥४॥
पद ४ थें
नको छंद घेऊं कृष्णा ! आला रे ! बागुलबाबा ॥ध्रुवपद.॥
दशभुज पंचमुख माथां मोठा जटाभार ।
गजचर्म पांघुरला कटीं वेष्टी व्याघ्रांबर ।
विभूति चर्चिली आंगीं नीलकंठ दिगंबर ।
त्रिलोचन उग्ररूपी भयंकर आबाबाबा ॥नको०॥१॥
घरधनी येतिल आतां भोजना सत्वर घरीं ।
पाकनिष्पत्ति जे त्वरें केलि पाहिजे कीं बरी ।
जिलिबि दळ्या मांडे लाडू दुधपाक शिरापुरी ।
ताताचिया ताटीं जेवीं संगीं बैसोनीयां बाबा ॥नको०॥२॥
उगा राहें नाहीं तरी बोलावित्यें बागुलाला ।
येईं रे ! बागुला ! ह्मणतां गौरीवर द्वारीं आला ।
डुगु डुगु डमरू शिंगीनाद आंगणांत केला ।
आरूढला नंदीवर अर्धांगी ते जगदंबा ॥नको०॥३॥
कृष्णासी तैं घेउनि कडिये यशोमती द्वारीं आली ।
होईल जोग्याची दृष्टी बाळासी ह्मणऊनि भ्याली ।
लपविला कृष्ण अचळ वस्त्र मुखावरती घाली ।
भिईल कीं उग्ररूपा देखोनी लावण्यगाभा ॥नको०॥४॥
जोगी ह्मणे कां हो ! बहु रुदतो हा तूझा बाळ ।
दृष्टी झाली यासी ह्मणुनी घेत असे बहु आळ ।
विभूति घेउनी हस्तीं मंत्रितसे पशुपाळ ।
लावुनियां भाळीं कृष्णा म्हणे रुदतोसि कां बा ! ॥नको०॥५॥
तदा बहु हर्षे हास्य केलें बालमुकुंदानें ।
यशोदाही वोसंडली संतोषली आनंदानें ।
जोगीयासीं पूजीयेला प्रीतिभावें बहुमानें ।
म्हणे माझ्या बाळा देईं दर्शन तूं नित्य ये बा ! ॥नको०॥६॥
श्रीराम शिवाचे हृदयीं विष्णूच्या हृदयीं शिव ।
शिव विष्णु एकरूप नसे कांहीं द्वैतभाव ।
आत्माराम एक लीलानाटकी तो झाला सर्व ।
शिवप्रिती गोपाळासी गोपाळक प्रीति सांबा ॥नको०॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP