गोसावीनंदनकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
भूक मोठी मज लागली देवा ! भोजन देईं ।
याचक मी तुझे द्वारिंचा वेगीं प्रसन्न होईं ॥ध्रुवपद.॥
सहज स्थितीची गुळवरी स्वानंदाचा मांडा ।
वैराग्याची कढी पातळ नामी शाका उदंडा ॥भूक०॥१॥
भक्तीच्या शेवया मोकळ्या ज्ञान दुग्ध हें फार ।
घृत भक्तीची शर्करा वडा उपमा थोर ॥भूक०॥२॥
तुर्या तुरीचें वरण साहंबोधाचा भात ।
गोड पुरणपोळी उन्मनी नित्य जेविती संत ॥भूक०॥३॥
जेणें तृप्त होसी तूं बरा जेथें सुख ना त्रास ।
गोसावीनंदन जेविला घेतो प्रेमाचा ग्रास ॥भूक०॥४॥
पद २ रें
देखुनि निवती डोळे । या रघुरायाचे ॥ध्रुवपद.॥
कांचनमय जनकाची नगरी काय वदों मी वाचे ।
दारवटे अति सुंदर देखुनि उंच हुडे दुर्गाचे ॥या रघु०॥१॥
सुवर्णपत्रें छत्रें देखा घोष बहु वाद्यांचे ।
सेना सर्व मिळाली जेथें थाट अचाट नृपा ॥या रघु०॥२॥
प्रवेशले महाद्वारीं जेव्हां मंत्र स्ववेदाचे ।
आनंदें गोसावीनंदन वंदित पाय त अयाचे ॥या रघु०॥३॥
पद ३ रें
प्रसन्न केला शिव भोळा । माझें भय रे ! कळिकाळा ।
इंद्राहातीं गुंफविल्या माळा । म्यां रावणानें ॥ध्रुवपद.॥
ब्रह्मा होउनियां वेडे । वाची मजपुढें पातेडें ।
देवाची केलीं खुळ खुळ हाडें ॥म्यां रावणानें०॥१॥
द्वारीं दिनकर कर जोडी । धाकें वायू घर झाडी ।
अग्नीहातीं धुविलीं लुगडीं ॥म्यां रावणानें०॥२॥
त्र्यंबकधनुष्य हें काय । मजपुढें मशक दिसताहे (य?) ।
गोसावीनंदन पूजी प्रभुचे पाय ॥म्यां रावणानें०॥३॥
पद ४ थे
वंदूं देव गजानन रे ! ॥ध्रुवपद.॥
सर्वारंभीं आधिं पायपूजन ज्याचें । करतील पूजन रे ! ॥वंदूं०॥१॥
ज्याच्या स्मरणें हरतिल विघ्नें । पूर्ण दयाघन रे ! ॥वंदूं०॥२॥
ज्याला ध्यातां सुखरूप जाहला । गोसावीवंदन रे ! ॥वंदूं०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP