निरंजनकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग । चढतां एकवीस स्वर्ग ।
हातीं घेउनियां ज्ञानखर्ग । घ्यावा अलक्षदुर्ग ॥ध्रुवपद.॥
हृदयीं प्रकटति तीन वाटा । दोन गेल्या नीटा ।
एक गेलीस अव्हाटा (?) । भेदुनि ब्रह्मकपाटा ॥सूक्ष्म०॥१॥
सप्तसिंधूंचें आवरण । त्या दुर्गाकारण ।
तेथें जाईल बा ! कोण । योगींद्रावांचून ? ॥सूक्ष्म०॥२॥
धारा शस्त्राच्या तीक्षण । त्या दुर्गाकारण ।
त्याहुनि करिती बा ! गमन । ब्रह्मनिष्ठ जाण ॥सूक्ष्म०॥३॥
सुईच्या रंध्राहूनि लहाण । त्या दुर्गाची खूण ।
त्यांतुनि करिती बा ! गमन । आत्मनिष्ठ जाण ॥सूक्ष्म०॥४॥
जेथें रिघ नाहीं मुंगीला । ठाव कैंचा पक्ष्याला ।
मीन माघारा परतला । कपीशेष राहिला ॥सूक्ष्म०॥५॥
सद्गुरु एकांतासि नेतो । हस्त शिरीं ठेवितो ।
तनुमन घेऊनीयां जातो । जिव मारुनि जिववीतो ॥सूक्ष्म०॥६॥
प्रभु निरंजन समर्थ । आमुचा सद्गुरुनाथ ।
तयानें दाखविला निजपंथ । बोलविला सिद्धांत ॥सूक्ष्म०॥७॥
पद २ रें
या रे सखयांनो ! हरिगुण गाऊं ।
संतसंगानें पैलतिरा जाऊं जाऊं ॥ध्रुवपद.॥
हरीभजनाविण काळ व्यर्थ गेला ।
वृथा संसारीं काय भुलुनि ठेला ।
पीयुष टाकुनियां कांजी कां रे ! प्याला प्याला ॥या रे!०॥१॥
पैल भवसिंधूपूर आला भारी ।
कामवीजा चमकती अनिवारी ।
त्यांणीं दंडिल्या बहुत नर नारी नारी ॥या रे!०॥२॥
गुरूचरणाची थडी आहे नौका ।
वरी बैसुनीयां जाउं परलोका ।
निरंजनीं रघुनाथ आहे सखा ।
तया प्रसादें मारु काळ भोंका भोंका ॥या रे!०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP