मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
हरिकविकृत पद

हरिकविकृत पद

अनेककविकृत पदें.


नेदी चित्ता शांती ऐशी विद्या काशाला ? ।
न घे हरिचें नाम ऐशी जिव्हा काशाला ? ॥ध्रुवपद.॥
अप्रिय बोले पतिला ऐशी बाइल काशाला ? ।
बाइलिला जो व्यर्थ गांजितो तो पति काशाला ? ।
हृदयीं कृत्रिम अशाशीं ती मैत्री काशाला ? ।
मनचा खोटा फिरोनि शिणला तीर्थें काशाला ? ॥नेदी०॥१॥
भावाविरहित नर जो त्याला दैवत काशाला ? ।
एक धड ना भाराभर त्या चिंध्या काशाला ? ।
एक गुणी ना दुर्गुणि बेटे शंभर काशाला ? ।
आदर न करी त्याच्या घरचें भोजन काशाला ? ॥नेदी०॥२॥
गर्वें ताठुनि जाय तयाशीं भाषण काशाला ? ।
अभाग्याचें समर्थासीं वैर काशाला ? ।
करणी नसतां ज्ञान व्यर्थ बडबड काशाला ? ।
हृदयीं षड्रिपु वसती त्याला जपतप काशाला ? ॥नेदी०॥३॥
गुरुपदिं निष्ठा न धरी ऐसा शिष्या काशाला ? ।
शिष्याला जो वाइट चिंती तो गुरु काशाला ? ।
वाद्या अथवा भेद्या ऐसा सेवक काशाला ? ।
प्रबोध निर्मळ न करी ऐसा स्वामी काशाला ? ॥नेदी०॥४॥
प्रीत धरीना सहोदराची आशा काशाला ? ।
पोट भरेना जेथें ऐसा देश काशाला ? ।
हरिकवि बोले सद्गुरुवचनीं संसृतिपाशाला ?।
छेदी ना तो मानव जन्मा आला काशाला ? ॥नेदी०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP