बडबडगीत - खारुताईच्या घरी कावळोब...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
खारुताईच्या घरी
कावळोबा गेले
काव काव करीत
खारुला म्हणाले
"नारळाच्या झाडाखाली
साधु आहेत मोठे
भगवी कफनी अंगावर
भस्माचे पट्टे
हात पाहून भविष्य
सांगतात छान
सगळे प्राणी देतात
त्यांना मोठा मान
नाव त्यांचे कोल्होबा
लांब दाढीवाले
काशीला, रामेश्वरी
जाउनीया आले."
"चल पुढे कावळोबा
तुझ्यामागे येते
साधु महाराजांना
माझा हात दाखवते."
लठ्ठ खारुताईला
पाहून झोकात
कोल्होबाने फिरविला
दाढीवर हात
कोल्होबा म्हणाले,
"होता मला उपास
बरे झाले आता तुझा
करतो एक घास !"
"थांब, थांब कोल्होबा"
खारुताई म्हणते,
"झावळीची दोन पाने
खाऊनिया येते !"
झाडावर सरसर
खारुताई चढली
फार उंच, फार उंच
नारळाजवळ गेली.
भला मोठा नारळ
पटकन् खाली आला
कोल्होबाच्या डोक्यावर
धपकन् आदळला
हात पाहणार्या कोल्होबाचे
पाडुनिया दात
खारुताईने दाखविला त्याला
चांगलाच हात !
N/A
References :
कवी - मा. गो. काटकर
Last Updated : January 17, 2018
TOP