निवेदक - या, या मुलांनो बसा, अता
सांगतो तुम्हाला मजेदार कथा
एक होता जादूगार, त्याचा दरारा होता फार
त्याची छोटी जादूची काठी
होती बरं का करामती मोठी
एकदा काय झाले,
जादुगाराच्या घरात वानरोबा शिरले
जादूची काठी घेऊन झाडावर चढले
काठीच्या स्पर्शाने झाड पळू लागले
वानरोबा थक्क होऊन हसतच बसले
कोरस - असे कसे झाले, पुढे काय झाले ?
निवेदक - तेवढयात घरातून जादूगार धावला
पळणार्या झाडाच्या मागे पळू लगाला
झाड पळू लागले उडया मारीत लांब
जादूगार ओरडला, ’काळ तोंडया थांब !’
कोरस - असे कसे झाले, पुढे काय झाले ?
निवेदक - चिडलेले वानरोबा खेकसले, ’काठी
जा, जा धावून जा, जादुगारापाठी
काठी आली वेगाने जादूगार घाबरला
गरकन् मागे वळून बेफाम पळू लागला
कोरस - पुढे काय झाले, पुढे काय झाले ?
निवेदक - पुढे काय झाले, पुढे काय झाले
मला माहीत असते तर -
नसते का सांगितले !