मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
अगा ते परम शुभ ऐक । लाभ द...

भारूड - अगा ते परम शुभ ऐक । लाभ द...

Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


अगा ते परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एक । नांदतें धर्माचें घर । सद्विविकाचें विवर । विवरांत विश्रांती थोर । अपार सुख तें ॥१॥
ऐसा नरदेह परम सुखाचा । घे मज पिंगळ्याची वाचा । मी संदेह सांगेन साचा । ऐका गा राजकुमार हो ॥२॥
डुग डुग डुग शंभु महादेवा । काशी विश्वानाथा । पंढरीच्या विठोबा । कानड्या खंडेराया । दिगंबरा दत्तात्रया । इतुकें बोलतां ठाया । परी ते एकची यती ॥३॥
लडबड लडबड । नवनाथ सोरटी सोमनाथ । श्रीहिंगळजा भगवती । वीणापुस्तकधारिणी । ये मूळ पीठींची । जिचेनी वस्तु महिमा साची । आदि अंत भरले स्वतंत्र । म्हणोनि कारण वाचेसी । अत्यंत बोलत आहे ॥४॥
नमो परम पुरुष । जो भाष ना आभास । जो स्वयंप्रकाश । अखिल मूर्ति ॥५॥
जो वर्ण व्यक्तिहीन । दृश्यादृश्य दरुशन जाण । जो आदिमायेचें आवरण । अनादिसिद्ध ॥६॥
धन्य धन्य तो सदगुरु । जो साक्षात परब्रह्म अवतारु । नामस्मरणें जगदुद्धारु । करी सदा ॥७॥
आतां समस्तां नमीत स्वानंदें । देहीं स्फुरलें स्वात्मसुख छंदें । डुल्लतां आपुलेनी आनंदें । सहजीं सहज ॥८॥
आधीं एकाग्र करुनी मन । सांडी बद्ध मुक्तीचा अनुमान । वृत्ति सदा समाधान । स्वरुपीं असावी ॥९॥
हजार गोष्टींचीये परी । मज सरोद्याचा विश्वास धरीं । अंतीं बोलणें वचन वरी । गोड लागे ॥१०॥
एक खटपट एक तळमळ । एक वळवळ एक कळकळ । परि तो अवघाचि कोल्हाळ । करिताती ॥११॥
तैसा नोहे मी पिंगळा । शब्दासहित बोध सकळां । एका अनेकी नोहे वेगळा । शोधोनि पाहे ॥१२॥
दिसे बावन्नाची कडसणी । एका सूत्रें वोविले मणी । जैसें गंगेचें पाणी । निर्मळ पाहे सर्वदा ॥१३॥
पूर्व उत्तर दोन प्रत्यक्ष । अक्ष होते कां नेणा ॥१४॥
एक तृप्ति व्हावया । आणिक ग्रास घ्यावया । तरी ते आन ठाया । गेले न म्हणा ॥१५॥
तरी त्याचे मुखें अर्थ कांहीं । ज्ञात्यासी सांगतां भरला नाहीं । विवेक संचुनी ठायीं । ऐका गा राजेनु ॥१६॥
नावं काय रायाचें । मेष कीं वृषभ कीं मिथुन कीं कर्क कीं सिंह कीं कन्या कीं तूळ कीं वृश्चिक की धन कीं मकर कीं कुंभ कीं मीन । ऐका गा राजकुमर हो ॥१७॥
येवो मेष तो कैसा । हुरळक हुसके थल तैसा । बुद्धिमंद विवेकलेशा । दैन्यवाणा सदाचा ॥१८॥
आतां वृषभ बोलावा । प्रकृति बुद्धि आम्हां सवा । हानी लाभ नोहे ठावा । या गर्वराशी ॥१९॥
माया ईश्वर मिळोनी । जैसे सुखावती दोन्ही । तरंग तेंचि पाणी । ज्ञानप्राप्ति मिथुन जाणावा ॥२०॥
अहं बुद्धीचे सर्वक । तोचि ओळखावा कर्क । देहाभिमान गर्क । कुवृत्ती सदाचा ॥२१॥
मद गज वनांतरीं । धूर्त सिंहाचिये परी । मोहे महिमा विस्तारी । ऐसी कन्या जाणावी ॥२२॥
बुद्धी सत्त्वाची साम्यता । प्रपंच परमार्थ ऐक्यता । स्थूळधारी देखता । तो सत्त्वाचा ओतिला ॥२३॥
जो कुर्वाळील कृपा करी । विषयशक्ति नांगी मारी । फणका लागतां दुःख करी । तो मळीन वृश्चिक जाणावा ॥२४॥
शब्द कैसा तीक्ष्ण । ह्रदयीं जैसा लागे बाण । मोडी भलत्याचें समाधान । तोचि धन ओळखावा ॥२५॥
एक होटीं एक पोटीं । सदा भोंवयासी घाली गांठी । मळीन देखें सर्व सृष्टी । तो मकर जाणावा ॥२६॥
नुचंबळे पूर्ण कुंभ । जो आत्मसाक्षात्कार स्वयंभ । तो प्रत्यक्ष जाणावा थोंब । ऐशी वृत्ती जाणावी ॥२७॥
सदा चंचळ चपळ स्थिति । दृष्टी झेपावे ती विवृत्ती । ऐसी मीनाची गती । आपुलेनि वर्ते ॥२८॥
एवं स्थिति मतिद्वये । प्रेमळें मनीं वोळखोनी घ्यावें । ऐके सत्यव्रती भावें । नांव काय रायाचें ॥२९॥
तुझिया बाळा देखी न शके काळा । भुरळ डोळ्याचा आंधळा । झडपोनी जातो त्याला ।
भिऊं नको घरीं येऊं देऊं नको । मन मुष्टीमाजीं धरी । मी सांगेन तैसेंचि करी रे राया ॥३०॥
एक वोवाळुनी देई । साबण सरकी गाईचे शेण । तांबड्या गुंजा मुष्टिये एक लोन । तांबे नाणें कालवून । तिहीं ठायीं टाकी ॥३१॥
एक मती बोलून जातो । जळीं राख स्थळीं राख । आपुला शेजार राख । बाजार राख । आब्रह्मस्तंभपर्यंत रखरक्ष हुं फट स्वाहा ॥३२॥
ही नंददेशीची विद्या खरी । तुझ्या बाळाचें विघ्न निवारी । काळकंटक दूर करीं । मग नांदलीस स्वानंदें ॥३३॥
आतां बाळाचें नांव सांगें स्पष्ट । तुझिया पोटींची आत्मनिष्ठ । जेव्हां झाली ॐ प्रतिष्ठ । जांवई तो सुलक्षणी साळंकृत ॥३४॥
परि तो सत्त्वगुणाची राशी । सप्रेमता लावीं रुची । निजवाक्यार्थ परम साची । महिमा इची देवगणी ॥३५॥
देवगणी असे । प्रकृत गुणीं विषमशमा नसे । राक्षसगणीं आशेषे । वोळखोनी घ्यावें ॥३६॥
आतां घरधन्याचें नांव काय । केशव कीं माधव कीं गोविंद । कीं विष्णु कीं प्रद्युम्न । कीं पुरुषोत्तम । कीं अधोक्ष कीं रामु । देवबुद्धीसंगें घटवावा । उतरलें नांव घरधन्याचें ॥३७॥
जरीं तो म्हणू काळानिळा । परि तो वर्णव्यक्ती वेगळा । दिठीचा चुकवोनी डोळा । दिसतो सोहळा घरधन्याचा ॥३८॥
नामें व्युत्पत्ति बोध । आपणा घेतां शोध । उरला तो सोहं बोध नामरुपें ॥३९॥
अगा बायको एक आहे । उगीच आदळीं हातपाय । चोरुनी परघर जाये । ती मोठी जगभ्याड होई राया ॥४०॥
प्रसिद्ध जो अविवेक । तोचि जाण तिचा लेक । सरळ वाढलासे फोक । महा ठकु ॥४१॥
चउथ पंचमीचे आइतवारीं । एक हळदीचा मुटकुळा करी । ओवाळूनि टाकीं बाहेरी । तिहींसांजा ॥४२॥
एक घरचा माणुस वाकडे पायाचा । पिचक्या डोळ्याचा । लटक्या बोलाचा । त्यास झणी पतकरसील तर ॥४३॥
बापुडा नारदु पाहिला । घडीमध्यें गाभणा केला । चंद्रासी कलंक लाविला । तयाचेनी ॥४४॥
शंकराचा जाला वीर्यपात । रावणाचा करविला घात । विष्णु विचकुनी दांत । वृंदा वृंदा वोसणतसे ॥४५॥
ब्रह्मा धांवे सरस्वतीमागें । इंद्र जाला सहस्त्रभगें । भस्मासुर भस्म जाला वेगें । वाली निमाला रामबाणें ॥४६॥
आतां धनघट दे कण । एक तोळा दे दान । दे मज नको करुं अनुमान । घे मज पिंगळ्याची वाचा ॥४७॥
काय देतील कुडें । रितें अवघेंचि उघडें । खोटें नाटें जटे मुटे । अविवेकी ॥४८॥
अतिताची आशा हरे । दात्यांचे तो दुणे भरे । जें दिधलें तें कल्पांतीं न सरे । ऐसें कांहीं देइजे ॥४९॥
आजी धन्य पावलों सभा । जीवें जन्माची आली शोभा । कर जोडूनि राहीन उभा । महाद्वारीं देवाचें ॥५०॥
एक छत्रांचें राणिव । मोक्ष मोकाशी दिला गांव । जगविख्यात विश्वासी नाम । वाचेन आवडी गाउनी ॥५१॥
एका जनार्दनीं संतांचा लडिवाळ । पोटीं रिघोनि जाला बाळ । कृपा केली सर्वकाळ । अभय वर देउनी ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP