मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गारुड - सद्‌गुरु विघ्नहरु ब्रह्म ...

भारुड - गारुड - सद्‌गुरु विघ्नहरु ब्रह्म ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

सद्‌गुरु विघ्नहरु ब्रह्म लंबोदरु भावें केला प्रणिपातु । भक्ति सरस्वती चैतन्य शक्ति तिचा मी झालों अंकितु । संत सज्जन जनीं जनार्दन अवधान त्यासी मागतु । गारुडाची गती गाईन तुम्हांप्रती सादर परिसा दृष्टन्तु ॥ १ ॥

जा जा जा रे जा जा जा रे जा वादी वादका कायसा तुझा पाडु । तुजवरी बोधे दोबुक वाहील घेईल मागला सुडू ॥ध्रु०॥

अहं गांवगुंड वादक खरा परदेशी बोध दुसरा । संत सभेपाशीं गर्जत आलों आमुचा निवाड करा । बोधातें देखुनी वादक कैसा क्रोधें कांपे थरथरां । हा जीव हत्यारा येथें कोठें आला दांत खाय करकरां ॥ २ ॥

या या या रे या या या रे या मदगर्वीं हो भिऊं नका तुम्ही पोटीं । केवळ ज्ञान तें विषयीं वेंचले बोधाची कायसी गोष्टी ॥ध्रु०॥

पंचभूतांमाजीं अहं गांवगुंड ब्रीदे वाहे वितंड । देहबळें कैसा सबळ जाला आकळिलें ब्रह्मांड । जो जो भेटे त्यासी पंचभूतें लावी जिंतिले वादी उदंड । त्यावरी बोधें विडा उचलिला ठेंचिन बयाचें तोंड ॥ ३ ॥ जा जा जा० ॥

चैतन्याचा यावा आणूनि देहभावा बंदी म्यां घातले जीवा । त्याचें सोडवणें थोर थोर आले न सुटे तयाच्या देवा । देवां दानवां दैत्यां मानवां न साहवे माझा यावा । विवेकासारखा बंदी म्यां घातिला बोधाचा कायसा केवा ॥ ४ ॥ या या या० ॥

विवेक बंदी हे मिथ्या उपाधी विवेकीं बोधिली बुद्धी । जीवा जीवत्व बंधन ते मिथ्या ज्ञान तें विवेक छेदी । इंद्रियांचे कर्म न कळे तुज वर्म विवेकीं विषयसिद्धी । अहो भुली तू जालासी वादका जिंतिलासी त्रिशुद्धी ॥ ५ ॥ जा जा जा० ॥

विषयाची उंडी लावीन तोंडीं पाडी त्याची मुरकुंडी । उंडी सगळी गिळी ऐसा बळी कोणी नाहीं ब्रह्मांडीं । इंद्र पराशर ब्रह्मादिशंकर लोळविली थोरथोर धेंडी । तेथें बोध ते बापुंडें कायसे मजपुढें केंवि राहे पडिपाडी ॥ ६ ॥ या या या० ॥

कपिलें हनुमंतें भीष्में नारदें गट केली तुझी उंडी । राज्य करूनियां विदेही जनक उंडी केली तेणें मुंडी । शुक देवें तुज रंभे देखतां मारिलें तोंडिच्या तोंडीं । एवढी मज बोधाची ख्याति मा केंवि तुकसी तूं पडिपाडी ॥ ७ ॥ जा जा जा० ॥

कामाचा चेडा लाविन पुढा हालों नेदि मागा पुढा । समूळ काम गिळी ऐसा बळी कोणी नाहीं निधडा । संन्यासी वनवासी दिगंबर तापसी भेणें रिघति गिरीकडां । तेथें स्वप्नदृष्टि खरकोटि लंगोटी विर्याचा होतसे सडा ॥ ८ ॥ या या या० ॥

तुझ्या कामाची गोष्टी समूळ खोटी परतोनि पाहे पां दिठी । आत्मा आत्मीं मुळींच नाहीं काम क्रिया केंवी उठी । विषयाचें गोडपण तेंचि ब्रह्म पूर्ण हें न कळें कामा कामाठी । कामाचा निजकाम जाला आत्माराम चेडा उपडिला ब्रह्मदृष्टी ॥ ९ ॥ जा जा जा० ॥

क्रोध ह्मैसासुर करी गुरगुर लाविन तुझे पाठी । जिव्हारीं झोंबेल कवणा न सुटे मारियले जगजेठी । दुर्वास कपिलमुनि बळें घोळसिलें सनकादिक वैकुंठी । तया क्रोधापुढें सदा बोध दडे त्यासी कोण आणी दृष्टी ॥ १० ॥ या या या० ॥

माझी शांति गाय तुझा क्रोध खाय त्याचें तूं बल वानिसी । शांतिचेनि मंत्रें मंत्रोनियां कीं पंचाक्षरी केलें ऋषि । बद्रिनारायणापुढें सदा क्रोध रडे तैं तूं काय झालासी । कामक्रोध जित भिक्षूनें धरिले आतां तूं कोठें पळसी ॥ ११ ॥ जा जा जा० ॥

ममता लाठी अत्यंत खोटी फोडिन तुझी घाटी । हे लाठी उपडी अथवा तोडी ऐसा नाहीं जगजेठी । माझें ज्ञान मोठें तुझें ज्ञान खोटें ममता ठाकिलें कोट्यानकोटी । ममतेपुढें बोध बापुडें पळाले उठाउठी ॥ १२ ॥ या या या० ॥

देहीं देहाची ममता माझें म्हणतां कोण तूं नेणसी फुडें । देह तंव बापुढें अचेतन मढें माझें कोण जाणे कुडें । मूळ मुळीं पाहतां देही देह मिथ्या ममता समूळ उडे । ममतेचें बळ पडिलें पोकळ लाठी स्वयें उपडें ॥ १३ ॥ या या या० ॥

मोहाचें खेडें पाहतां कुडें मरण आलें रोकडे । विवेकाचे बळ मोहेंचि सकळ आवरिले धडफुडे । मोह विकल्पें गाढा लाविल्या फुडा बोध काय बापुडें । विकल्पाचा मारा बोध केला पुरा जैत आले आम्हां गाढें ॥ १४ ॥ या या या० ॥

विकल्प बळें मोह सबळ सांगसी तयाचें रूप । हें बोलणें फुडे समूळ कुडे न कळे मोहो स्वरूप । संकल्प विकल्प मनाचें रूप मन तें चिद्‌ रूप । चिद्‌रूपा पुढा मोहाचा रगडा खेडें मोडिलें सहित विकल्प ॥ १५ ॥ जा जा जा० ॥

असत्याची कढी लोभें । गाढी पाडितां पाडीन कुडी । सत्यवादी परम म्हणविता हे धर्म त्यासिही चढली फुडी । असत्याची गांठी बांधिली सृष्टी ते गांठी कवण सोडी । असत्याचें बळें जाहले प्रबळ बोधाचे दांत मी पाडी ॥ १६ ॥ या या या० ॥

आहे तें देखे नाहीं तें देखे त्या नांव असत्य पाही । रज्जुसर्पे खोदला कोण पां मेला हें समूळ मुळींच नाहीं । असत्याची गोठी समूळ खोटी तेणें तूं जिंकिसी कायी । सत्याचेनि बळें बोध प्रबळला जिवेंचि मारिला ठायीं ॥ १७ ॥ जा जा जा० ॥

दातेविण नुसधि प्रमदा व्याधि लाविल आधोद्वारा । दृष्टिचि देखतां विख चढें भुलविलें सुरनरां । विखाचि लहरी चढे घरोघरीं कांपताती थरथरा । व्याधीचेनि विखें जिंतिला देख बोध मारिला पुरा ॥ १८ ॥ या या या० ॥

प्रमदा व्याधी अधों संधि अधःपात्याते बाधी । देहावयव प्रमदा नांव हे आत्मत्वीं नाहीं शुद्धी । प्रमदा बोध नाहीं प्रबुद्धा हे तंव वेद प्रसिद्धी । बोधे वादक तळासि आणिला मारिलासि त्रिशुद्धी ॥ १९ ॥ जा जा जा० ॥

बोधा तुझें बळ कळलें सकळ गुरुत्व तुझिये गांठीं । गुरुशिष्य म्यां धनलोभासाठीं जिंतिले कोट्यानकोटी । धनलोभावरी गुरुचें आसन शिष्य सोडी त्यांच्या गांठीं । गुरुशिष्यामाजीं विकल्प नांदे बोध पळे उठाउठी ॥ २० ॥ या या या० ॥

गुरुशिष्याचा भेद छेदी बोध धनलोभाचा छेदी कंदी । धन मान प्रतिष्ठा केवळ विष्ठा हाही झाला प्रतिबोध । गुरु तो चैतन्य शिष्य तो चैतन्यघन दोहीं मुळीच नाहीं भेद । वादका विरुद्धें सोडविलीं रंगीं गर्जत उभा बोध ॥ २१ ॥ जा जा जा० ॥

जिवित्व सांडूनि शिवत्वामाजीं वादकें लपणी केला थारा । अंग लपवूनि डोळा चुकवूनि दडोनि ठेला पुरा । तेथ सद्‌गुरु कृपा शोधूनि पहातां धाके कांपे थरथरां । सबळ केवळ परदे तोडूनि देहा नागविला खरा ॥ २३ ॥ जा जा जा० ॥

वेदा वादाचा डाबुक वाजत होता त्याचा त्यानेंचि सांडिला नादु । शब्द होता तो निःशब्द झाला सहजी खुंटला अनुवादु । वादकाचा सखा जिवलग देखा जिवेंचि मारिला भेदु । साधानाच्या कोटी सरल्या आटाआटी विजयी झाला बोधु ॥ २४ ॥

जा जा रे जिंतिले बोधें वादें बोधिला अद्वैत वदे । जीव शिव पदें जाणोनियां कीं आनंदें कोंदें आनंदें ॥ ध्रु० ॥

अहं सोडूनियां सोहं भावे वादकें बोधाचे धरिले पाय । शरण आलों आतां मारूं नको केवळ तुसी मी गाय । गाय गारुड गाय त्यासी मी मस्तकीं वाहे । बोधा वादा दोघा ऐक्यता जाली समाधानें सुख होये ॥ २५ ॥ जा जा रे जिंतिले० ॥

शरण आले त्यासी मरण नाहीं बोधें आलिंगिला अहंभाव । संकल्प विकल्प जन्मदुःख दरिद्र केलें वाव । स्वराज्य देऊनि स्वपदीं स्थापिला फिटला देह संदेह । एका जनार्दनीं ऐक्यता पावोनि ब्रह्म झाला स्वयंमेव ॥ २६ ॥ जा जा रे जिंतिले० ॥


N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP