मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार पाटील बाजी । चावडीव...

भारुड - जोहार - जोहार पाटील बाजी । चावडीव...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

जोहार पाटील बाजी । चावडीवर चलाना का जी । सांगू आला आजी । बाकी बहुत सेकली की जी मायबाप ॥ १ ॥

कोपटामध्यें लपतां काई । हाडाचा खोडा पडेल पायीं । दांत विचकून इज्जत जाई । संसारीं वांचून काईं की जी मायबाप ॥ २ ॥

पाप दुराई बांधिती पदरीं । तुमचा प्राण वांचेल जरी । तोंड दाखवाना दरबारीं । सभेमाजीं संतांच्या की जी मायबाप ॥ ३ ॥

वरचेवर खातां पीक । धनी लावील तुम्हां सीक । मग मागवील भीक । तेव्हां साचे लटकें कळेल की जी मायबाप ॥ ४ ॥

शेत अवघें पांच कोस । तेंही तुम्ही पाडिलें ओस । ही पुंडाई कीती दिवस । तुमचें तुम्हांस । बरे वाटे की जी मायबाप ॥ ५ ॥

यंदा आली देवाची पाळी । कां जी तोंडे करितां काळीं । चावडी चला एक वेळीं । शिव्यागाळीं देऊं नका की जी मायबाप ॥ ६ ॥

आज कुळकर्णी स्वाधीन करा । आड खर्चाचा ताळा धरा । गायाळ मायाळ माप करा । तेणें निवांत व्हातु की जी मायबाप ॥ ७ ॥

आजी शेकदारी बरी करा । केल्या कमाईस नेऊं नका घरा । येईल हुजूर दरसाल करा । अव्वल साधण्याला की जी मायबाप ॥ ८ ॥

उगीच कां कोंडितां गुरें । गांवींचीं कां बुजवितां द्वारें । झाडा फाडा बरे जोरे । उणें पुरे चुकेना की जी मायबाप ॥ ९ ॥

बाप शुद्धी बाळी आली । फिकीर पाहिजे लौकर केली । कितीक मारीत झोडीत नेली । माझी बोली साच माना की जी मायबाप ॥ १० ॥

यम गचांडी धरी । तेव्हां तुमची फिर्याद कोण करी । डोळे फिरती वरच्यावरी । व्हा लवकरी सावध की जी मायबाप ॥ ११ ॥

बाकी शेकली फार । घरोघरीं आडवितां दार । घडिघडींतून बोला उत्तर । धन्याचे की जी मायबाप ॥ १२ ॥

हें माझें ऐकाना कांहीं । धन्याची तुम्हां देतां दुराई । वरते पाय खालती डोई । होईल की जी मायबाप ॥ १३ ॥

लिहीतच होती रोखे । गुरुवचनीं करविले शिक्के । गांड गुडगे खाल धक्के । प्रपंच धाके की जी मायबाप ॥ १४ ॥

यम जमाखर्च कीती । ऐसें विचारा जी चित्तीं । कबुलायत करुनी नुस्ती । तीही रीति बरी नव्हे की जी मायबाप ॥ १५ ॥

वार्ता जाया आली फार । कोण कोणाचा सोसला मार । टाकून द्यावा अहंकार भार । चला हुजूर एकाएकीं की जी मायबाप ॥ १६ ॥

लाच घेतां कान कोंडें । तेव्हां बोलाल कोण्या तोंडें । चहूंकडून पडतील धोंडें । श्वास कोडे बोलतां की जी मायबाप ॥ १७ ॥

बाप शिल्लक वाढली फार । चौर्‍यांयशी लक्ष वरातदार । यमाजी बाजी हुजूरचा महालदार । त्याचा मार पुरे पुरे की जी मायबाप ॥ १८ ॥

हा टाकून द्यावा गांव । पैसे वाटून पालटा नांव । घर सोडून देवळाचा ठाव । हातीं काठी असो द्यावी की जी मायबाप ॥ १९ ॥

धरणें येईल एकाएकीं । तेव्हां अवघे परके लोकीं । माझें तेचि निजे सुखीं । पाटिलकी सोडून भोगाना की जी मायबाप ॥ २० ॥

ब्रह्मानंद करितों जोहार । जनार्दन बावाचा विचार । लाभ तुरुत काय बोलू की जी मायबाप ॥ २१ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP