मराठी पदें - पदे ११ ते १५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ११
चला जाऊं पाहूं डोळा रामरूप सावळें ॥धृ॥
गंगेचिये परतटीं । अरुणा - वरुणा - मध्यबेटी ।
रम्यस्थळ पंचवटी । शोभताती राउळें ॥१॥
लक्षुमण बंध पाठीं । अंकीं सीता गोरटी ।
रत्नाचिये हार कंठीं । अलंकार पीवळे ॥२॥
उभें ठकाराचें ठाण । घेऊनिया धनुर्बाण ।
पुढें उभा हनुमान । रूप शोभे कोंवळें ॥३॥
निरंजनीं रघुवीर । तो हा रणरंगधीर ।
न पवेचि अंतपार । वेदमती चावळे ॥४॥
पद १२.
भक्ताचिये प्रेमासाठी सोडिली म्यां लाज रे ॥धृ॥
धुवी पांडवांचे घोडे । सदा राहे मागेपुढें ।
घाली आंगणींचे सडे । बांधुनिया मा रे ॥१॥
सुयोधना रागें आलों । विदुराचे घरा गेलों ।
आवडीनें कण्या प्यालों । जोंधळ्याचें प्याज रे ॥२॥
वेडीं गोवळ्याचीं पोरें । त्यांचें ताक प्यालों बा रे ।
खाईं भिल्लटिचीं बोरें । आवडीचें चोज रे ॥३॥
शुद्ध निरंजनवासी । तो मी आलों आकारासी ।
बांधियलों प्रेमपाशीं । करी भक्तकाज रे ॥४॥
श्रीदत्त पद १३.
ऐका रे सखयांनो तपसुनि घ्या अपुलें नाणें ।
संशय दूर करावा अंतरिं सांडुनि अभिमान ॥धृ॥
चौर्यासी खर्चुनिया मोलें घेतलें सोनें ।
तसेंच न ठेवावें आपणा कळतें म्हणवून ।
चवकोनी कसवटीस पुरतें पहा जें घांसून ॥१॥
आपणापेक्षां वडील त्याला सद्गुरु ह्मणवून ।
दाखवावें सोनें अंतरगाठी सोडून ।
सरसनिरस पाहुनिया त्याची सांगेल तो खूण ॥२॥
तपसुनि न पाहतां शेवटीं होईल कीं हान ।
टाकुनि हेमा बेगड धराल झगझग पाहून ।
बरें बरें शोधा हें सांगतसे निरंजन ॥३॥
पद १४.
गंगा बाई तव महिमा वर्णूं काई । प्रगटूनि शिवमौळाचे ठायीं ।
दाऊनि गौतमऋषि मी साई । त्र्यंबक अब्धि मध्यें प्रवाहीं । पूजा घेसी ठाईं ठाईं ॥१॥
गंगा गंगा हे शब्द आई । प्राणी वदतां कोणे ठाईं ।
विझवीसि भवदुरिताची खाई । वर्षुनि कृपामेघ लवलाहीं ॥२॥
पाहतां त्रैलोक्याचे ठाईं । तुझिया ऐसें दैवत नाहीं ।
प्रत्यहीं सिंहस्थाचे ठाईं । तीर्थें नाहाती तुझिये पायीं ॥३॥
सांडुनि हृदयींची द्वयिताई । निरंजन टेकितसे डोई ।
क्षेत्रीं भिक्षा मागुनी खाई । बसला तुझिये सन्निध ठाइ ॥४॥
पद १५
म्या सद्गुरूसी लाविलें लग्न ॥धृ॥
पश्चात्तापीं व्याळ करित आग जाळ माझे आंगीं जाळिला मदन ॥१॥
गुरुकृपा निजबोध करित भवछेद सद्गुरुरूप पाहिलें सघन ॥२॥
सोहं बुद्धीचे शेजे पहुडुनि आत्मबुद्धीचा शेला ।
वोढुनि सुखी निरंजन मगन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP