मराठी पदें - पदे २११ ते २१५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २११
गेली रे वयासा गेली रे । विषयचोरांनीं बुद्धी नेली रे ॥धृ॥
सोडुनिया हरिनामामृत रे नामामृत रे ।
विषय सेविले श्वानमूत रे ॥१॥
नेणोनि स्वहित आपुलें कांहीं रे आपुले कांहीं रे ।
साधूची संगति केली नाहीं रे ॥२॥
सोडोनिया चिदात्मा शुद्ध रे आत्मा शुद्ध रे ॥
देहाचिया सवें होती बद्ध रे ॥३॥
निरंजय ह्मणे प्राणी वेडे रे प्राणी वेडे रे ।
नेणति स्वहित जैसे रडे रे ॥४॥
पद २१२
भवमोचका हरि तूं सत्वरि धाउनि ये ॥धृ॥
कामादिक रिपु छळिती मातें दुर्धर हाय हाय ॥१॥
या भवडोहीं वाहुनि जातों न सुचेचि उपाय ॥२॥
तूं तव दीनजनाचा त्राता आणि बहु सदय ॥३॥
निरंजन तवदर्शनइच्छुक दाखवि चरणद्वय ॥४॥
पद २१३
दयाळा करुणाघना लक्षुमिरमणा ये ये ये ।
तारुनिया मज वेगीं देवराया पायापाशीं ठाव दे ॥धृ०॥
बुडतों या भवडोहीं पडलो प्रवाहीं कामक्रोध खळाळी ॥१॥
पतित मी पापी दुष्ट खळ मोठा निष्ठुर ।
परि तूं दीनाचा बंधू देवराया न धरि मज दूर ॥२॥
अजामेळ पापी आणि गणिका ते कुंटीनी ।
उद्धरिले रामा तुवां अंतकाळीं लागवेगीं येऊनी ॥३॥
निरंजन दीन पावे शीण तुजवीण कीं ।
ऐसियातें न तारितां येऊं पाहे ब्रीदालागीं उणें कीं ॥४॥
पद २१४
धन्य तेचि आजि उदासीन मानोनि शीण ।
संसाराचे ठाईं ज्याचें मन त्रासले जाण ॥धृ॥
पहा पहा कैसा हा संसार आहे दुर्धर ।
ज्याच्या योगें जन्म वारंवार जाहाले फार ॥१॥
वस्त्रपात्र धोत्र देतो जव तव करीती आर्जव ।
नाहीं तरि मग दारासुत बांधव ह्मणती गर्दभ ॥२॥
आशा तृष्ना मनिं अनिवारा करिति भडिमारा ।
अंतरिं बाहेरि नाहीं थारा सुखाचा वारा ॥३॥
न कळे मी आहे निरंजन जहालों दीन ।
विषयाचे साठीम वनवन करितो जाण ॥४॥
पद २१५
धन्य धन्य त्या गोकुळीच्या नारी । प्रेमभावें स्वाधिन केला हरी रे ॥धृ॥
जो कां नये योगीयाचें ध्यानीं । यज्ञयागीं न जाय अभिमानी ॥
दानधर्मीं जयाची बहुत वाणी । गोपी धरिती स्वकरें त्याचा पाणि रे ॥१॥
चारी वेद जयाची कीर्ति गाती । साही शास्त्रें वर्णिति ज्याची ख्याती ।
अष्टादश पुराणें ज्यातें ध्याती । तो हा करी स्वमुखें गोपीस्तुति रे ॥२॥
नेणो काय तपासि आचरल्या ।
तया योगें हरिच्या सख्या झाल्या ॥
अंतरबाह्य श्रीकृष्णरूपीं ठेल्या ।
नेत्र द्वारें गोविंदमूर्ति प्याल्या रे ॥३॥
असो आतां फारसें सांगूं काई ।
गोपि आणि गोपाळा भेद नाहीं ॥
अद्वयत्वें निरंजन पाहीं ।
लीलामात्रें दाविताति नवाई रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP