मराठी पदें - पदे ४१ ते ४५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ४१.
सद्गुरुला शरण रिघा रे । दुस्तर भवसिंधु तरा रे ॥धृ॥
उदास होउनिया संसारा आजि सारा घेउनि सोडुनि द्या घरदारा । आजि दा रा धन हे दृष्टी मागे सारा । आजि सारा मनिं विषयाला विन्मुख व्हा रे ॥१॥
सोडुनि द्या सर्व पिपासा आजि पाशा तोडुनि सोडा सर्वहि आशा । आजि आशाश्वत नरदेहे जाइल नाशा आजि नासाग्रासी लक्षुनि मागें पहारे ॥२॥
उगेचि कां रे भ्रमतां वाया आजि वाया जातो ऐसे पाडुनि ठाया । आजि ठाया लक्षुनि निरंजन रघुराया । गुरुरायाचें पद पावुनि सुखरूप व्हा रे ॥३॥
पद ४२
नोहे नोहे रे तो ब्रम्हज्ञानी ॥धृ॥ ब्रम्हज्ञानी गोष्टी ।
बोले निशिदिनीं होउनि कष्टी ॥१॥
पाहुनीया वेदांती । तैसि बळेंचि धरितो शांती ॥२॥
सोडुनिया चित्ताला । बळेंचि दंडितसे देहाला ॥३॥
धरोनिया ध्यानासि । दृष्टि पाहे झगमगरासी ॥४॥
निरंजन गुरुकिल्ली । जरि ते ठाउक नाहीं झालीं ॥५॥
पद ४३
सद्गुरु मार्तंडा मार्तंडा । अखंड झळके खंडा ॥धृ॥
भाजुनिया द्वैताला । निश्चयभरति रोडगा केला ॥१॥
चिद्रस पूर्ण स्वयंभा । भरला औटहात कोठंबा ॥२॥
येळकोट संसारा । बोलुनि उधळू दहे भंडारा ॥३॥
साकळदंड मोहाचा । दिधला सोडुनि श्वानजिवाचा ॥४॥
निरंजन हा वाघा । सोहं भुंकुनि स्वरुपीं जागा ॥५॥
पद ४४
मारतंड चतुराक्षरी मंत्र उच्चारा वाचे । अखंड हृदयीं ध्याता पर्वत जळतिल पापाचे ॥धृ॥
मार्गेश्वर षष्ठीला प्रगटुनि वाढविला महिमा । महादेव अवतार प्रगटला भक्तांचे कामा ।
महाळसा निजशक्ति जाउनि पर्णीली रामा ॥१॥
रजनीचर दुष्टांचा केळा समूळ संहार ।
रक्षाया निजदासांलागुनि झाला अवतार ॥
रमताहे अश्वारुढ होउनि तो हा मल्हार ॥२॥
तगतगीत भंडार पडुनिया झालारे पति ।
तडिद:प्राय शोभे वस्त्र भूषणमंडीत ।
तत्पर होउनि श्वान जयाचे संगें धांवत ॥३॥
उळमळिलें भूमंडळ स्वरुपा धरितां प्रचंड ।
डमरू त्रिशूळ त्यागुनि धरिला खंडा अखंड ।
डमरू वाद्यपरि निरंजन हा स्मरतो मार्तंड ॥४॥
पद ४५
गुरू नव्हे गुरें ह्मणावी पुष्कळ भरला हाट रे ।
स्वस्त मिळाले तरी त्यजावे अडक्याचे गुरु साठ रे ॥धृ॥
साधु साधु ह्मणवोनि लोकीं बहुतसा बोभाट रे ।
भलत्यालागी शिष्य करुनि धन घ्यावें अचाट रे ।
प्रतिवर्षी शिष्याघरि जावें मोठा पलपलाट रे ॥१॥
टोपी माळा घालुनि पुष्कळ टाळविण्याचा थाट रे ।
चौबारा बैसुनिया गावें मेळवुनी जन दाट रे ।
मोठ्यानें आरडुनि सांगावें केलें जें कां पाठ रे ॥२॥
ऐसे गुरु जरि कोणीं केले त्याला लाभला नाट रे ।
नरदेहासी येउनि चुकले निजप्राप्तिची वाट रे ।
निरंजनपद सांडुनि चढले यमपुरीचा घाट रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP