मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १४६ ते १५०

मराठी पदें - पदे १४६ ते १५०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १४६
सावध होउनि प्राण्या करि कांही उपाय ।
नरतनु गेल्या वरुते करसिल मग काय ॥धृ॥
बहुपुण्याचें फळ हे नरदेहे जाण ।
तें तूं दवडिसि वायां पशुपक्षीसमान ॥१॥
मिथ्या धनसुत जाया अवघा संसार ।
ऐसें समजुनि भुलसी कां वारंवार ॥२॥
अयुष्य सरल्यावरुते यमाचे दूत ।
दंडन तुजला करतिल ते श्रम अद्भूत ॥३॥
सद्गुरुवचनें हरिची धरि कांहीं सोय ।
नरतनु असतां बरवि निरंजन होय ॥४॥

पद १४७
पाहे रे प्राण्या मिथ्या हा संसार । समजुनि वांया रे भुलसि वारंवार ॥धृ॥
अवघी लीला ईश्वराची माया । चालति दुजेपणीं जैसी छाया ।
तैसें जग नानात्वें व्यक्ती ह्या । ऐकुनि घेईरे वैदिक उपाया ॥१॥
लौकिकिं नित्य डोळ्यानें पाहसी । जन्मलें जग न आलें राह्यासी ।
पूर्वज मेले त्या पाणी देसी । पोटींचे पुत्र रे जाळोनिया येसी ॥२॥
ऐसा क्रम मिथ्या हा पाहून । सांडिसी विषयाच्या साठीं प्राण ।
नेणसी कांहीं अपूणा लागून । ह्मणवूनि तूंते रे लागे जन्म घेणें ॥३॥
कैशापरि संसारि तरावें । हें तुज जरि नाहिं कांहिं ठावें ॥
तरि त्वां शरण सद्गुरुला जावें । त्याचिया कृपें निरंजन व्हावें ॥४॥

पद १४८
मानवा अतां तरी होई जागा रे । मानवा ॥धृ०॥
साठी बुद्धी जाली नाटी । हातीं घेउनि उठसी काठीं ॥
एक जाली नाक हनवटी रे ॥१॥
तुझ्या घरची रांडापोरें । तुज बोलुनिया निष्ठूर ॥
जाय म्हणती कीं मरमर रे ॥२॥
नाहीं सुटला हातचा बाण । गाई तंववरि हरिचे गूण ॥
तुज लौकरि आहे जाणें रे ॥३॥
गुज सांगे निरंजन । कांहीं तरि करि साधन ॥
ठेंवि हरिपदिं निश्चळ मन रे ॥४॥

पद १४९
मानवा असा कसा तूं पिसा रे ॥धृ॥
ज्या पासुनि होतें दु:ख्ह । त्याला तूं ह्मणसी सुख ॥
हें विषय नव्हेती विख रे ॥१॥
बहुपाणचे स्वामिनी । स्त्री केवळ राक्षसिणी ॥
तिज ह्मणसी तूं पद्मिनी रे ॥२॥
प्रिय ह्मणसी अपुला देहे । तरि नरकाचें तें गेहे ॥
श्रमदायक त्याचा स्नेहे रे ॥३॥
सांडुनिया मी तूं पण । जाई रघुनाथा शरण ॥
होई अद्वय निरंजन रे ॥४॥

पद १५०
धन्य धन्य तूं पंढरीच्या राया रे । धन्य धन्य तूं ॥धृ०॥
निकभीमातट दिंडुर वनवासी हो । मुनी पुंडलिक भक्त पुण्यरासीहो ।
तयासाठीं तूं धाउनिया जासी हो ॥
चरणीं विट धरुनी नीट कटिकर ठेवुनि उभा होसी हो ॥१॥
सखा मानुनिया नामदेव शिंपी हो ।
घेऊनि त्याचे प्यालासि दुग्ध पीसी हो ॥
सुरदासा दाउनि वाट सोपी हो ।
जनाबाई म्हणुनि आई धरुनि डोई केशकुरळा चोपी हो ॥२॥
चिखुल तुडविता तुडविले पोरा हो ।
भक्त शोकाकुळ पाहुनिया गोरा हो ॥
जीवें उठविलें त्याच्या कुमारा हो ।
ह्मणुनि माहार करुनि जोहार चोख्याचे वोढियले ढोरा हो ॥३॥
हे तों मागें बहुभक्त रक्षियले हो ।
निरंजनाचें ग्रंथ भस्म जाले हो ॥
सप्तश्रृगिं त्वां अणुनिया दिलें हो ।
कृपासिंधु दीनबंधू ब्रिद साच केलें हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP